आपले म्हणून जा..कधीतरी

ही गझल इतर संकेत-स्थळावर प्रसिद्ध झालीय, त्यात काही बदल करून इथे प्रकाशित केलीय.

एवढे करून जा..कधीतरी,
..आपले म्हणून जा..कधीतरी

विस्तवा,.. कळेल दाहणे तुला,
..वास्तवामधून जा.. कधीतरी

कैक जीव टांगणीस लागले,
हे ऋणा,.. फिटून जा कधीतरी!

आस्तिकास सांत्वना मिळेल का?
ईश्वरा,..असून जा कधीतरी!

पांढरे कपाळ हाय स्फुंदते,
मांडवा, सजून जा कधीतरी!

स्वप्न सांगते " अरे,.. खरेच रे"
वास्तवा,.. भुलून जा कधीतरी

काय तीच मिळमिळीत भाषणे!
..वादळी ठरून जा कधीतरी!

वाहणे कितीक काळ आणखी?
सागरा,.. मिळून जा कधीतरी

पाहशील दिव्य रत्न-माणके!
खोल तू अजून जा कधीतरी

दार ठेंगणे अश्यामुळेच की,
मस्तका लवून जा कधीतरी

ऐकतेस का मुकाट नेहमी?
वादही करुन जा कधीतरी!

चेहरे खरे तुला बघायचे..?
..वेष पालटून जा कधीतरी!

-मानस६

गझल: 

प्रतिसाद

वाव्वा..!

मानसराव, अप्रतिम गझल. इथे प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद देतो.
सगळे शेर आवडले. अगदी सगळेच्या सगळे !

वादळी ठरून जा, वेष पालटून जा, खोल तू अजून जा.. आहाहा !
मजा आ गया!

वा !

मानस

एवढे करून जा..कधीतरी,
..आपले म्हणून जा..कधीतरी

विस्तवा,.. कळेल दाहणे तुला,
..वास्तवामधून जा.. कधीतरी

स्वप्न सांगते " अरे,.. खरेच रे"
वास्तवा,.. भुलून जा कधीतरी

पाहशील दिव्य रत्न-माणके!
खोल तू अजून जा कधीतरी

दार ठेंगणे अश्यामुळेच की,
मस्तका लवून जा कधीतरी

आवडले .

काही ठिकाणी काफिया व रदीफ तसेच वृत्ताच्याबंधनामु़ळे सानी मिस-यांत वाचताना (माझा) गोंधळ उडाला . उदा.:-

ईश्वरा असून जा कधीतरी
मांडवा सजून जा कधीतरी ... वगैरे.

असो.

@मानस- एक बारकासा बदल सुचवतो-

"ईश्वरा असून जा" ऐवजी ईश्वरा दिसून जा कधीतरी" करून पाहिले तर?

आस्तिकास सांत्वना मिळेल का?
ईश्वरा.. दिसून जा कधीतरी !

वास्तवामधून जा व वादही करून जा हे शेर फार आवडले.

वैभव यांच्याप्रमाणेच मलाही काही शेर वाचताना किंचित खटकले.

चु.भु.द्या.घ्या.

व्वा.....मस्त.
एखादा अपवाद वगळता...सारेच शेर छान.
गझल आवडली.

डॉ.कैलास

अप्रतिम!
आपण निवडलेल्या रदीफ-काफियामुळे मजा आलीये!

सुंदर .. आवडली गझल.

आस्तिकास सांत्वना मिळेल का?
ईश्वरा,..असून जा कधीतरी!

हा शेर फार फार आवडला. एकंदर छानच झाली आहे गझल.

मानस......आधीही आवडलीच होती. बदलांमुळे जास्त आवडली :)

गझल आवडली.

छानच गझल.

एवढे करून जा..कधीतरी,
..आपले म्हणून जा..कधीतरी

ऐकतेस का मुकाट नेहमी?
वादही करुन जा कधीतरी!

चेहरे खरे तुला बघायचे..?
..वेष पालटून जा कधीतरी!
हे तीनही शेर मस्तच.

पांढरे कपाळ हाय स्फुंदते,
मांडवा, सजून जा कधीतरी! ... ते 'हाय' मुळे पटले नाही.

मानस,

सर्व गझल आवडली...हे दोन शेर तर फारच छान जुळले आहेत. !!

दार ठेंगणे अश्यामुळेच की,
मस्तका लवून जा कधीतरी

चेहरे खरे तुला बघायचे..?
..वेष पालटून जा कधीतरी!

छानच गझल.

दार ठेंगणे अश्यामुळेच की,
मस्तका लवून जा कधीतरी

चेहरे खरे तुला बघायचे..?
..वेष पालटून जा कधीतरी!

हे दोनही शेर मस्तच.