गर्दी

गावात माकडांची गर्दी बरीच झाली
माझी भविष्यवाणी आता खरीच झाली

पाण्यात लाकडांची साले निघून आली
मीही तसाच झालो, तीही तशीच झाली

आव्हान देत होती ही जात देवतांना
स्वर्गात माणसांची चर्चा बरीच झाली

वाडे उभारताना झाडे जळून मेली
देवास मानवाची बुद्धी उगीच झाली

काळोख वासनांचा भारी मुजोर होता
बेधुंद लांडग्यांची नुस्ती सुगीच झाली

केल्या कितीतरी मी पायी बळेच यात्रा
कोटी उपासनांची भक्ती फुकीच झाली

गझल: 

प्रतिसाद

नमस्कार
तांत्रिक बाबी सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. तरी जाणकारांनी योग्य त्या सूचना जरूर कराव्यात!

तंत्रिक बाबी उत्तम सांभाळल्या आहेत.....

आव्हान देत होती ही जात देवतांना
स्वर्गात माणसांची चर्चा बरीच झाली

काळोख वासनांचा भारी मुजोर होता
बेधुंद लांडग्यांची नुस्ती सुगीच झाली

हे दोन शेर छानच.

मात्र मतला वगळता इतर शेर कळले नाहीत.

डॉ.कैलास

ब'री'च झाली अन ख'री'च झाली मतल्यात आल्यावर त्याची 'री' पुढे ओढायला हवी. 'री' ऐवजी 'गी', 'शी' वगैरे ओढल्यास तंत्रात बसत नाही. बाकी असो.

पण हा शेर वाचून फार हसू आले राव!

पाण्यात लाकडांची साले निघून आली
मीही तसाच झालो, तीही तशीच झाली

खालील ओळी आवडल्या:

गावात माकडांची गर्दी बरीच झाली

आव्हान देत होती ही जात देवतांना

वाडे उभारताना झाडे जळून मेली
देवास मानवाची बुद्धी उगीच झाली (सुट्या ओळी आवडल्या , शेर समजला नाही.)

केल्या कितीतरी मी पायी बळेच यात्रा

वृत्त मात्र सहज व सुंदर हाताळले आहेत.

धन्यवाद!

रचना चांगली सहज झाली आहे, कुठे अडखळायला होत नाही.
पण अर्थबोध फारसा झाला नाही.

पाण्यात लाकडांची साले निघून आली
मीही तसाच झालो, तीही तशीच झाली
हा डोक्यावरून!!

बाकीचे समजले..

गावात माकडांची गर्दी बरीच झाली
माझी भविष्यवाणी आता खरीच झाली
फार मस्त शेर..!
*** त्या 'री' ची फार चिंता करू नका. सध्या चालेल असे.

त्या 'री' ची फार चिंता करू नका. सध्या चालेल असे.
?????

हा प्रतिसाद व गझलेत जमीन न पाळणे या गोष्टी दखल घेण्यायोग्य आहेत असे मला वाटते.

सर्व जाणकारांना धन्यवाद.