बोलणे माझे ...

बोलणे माझे निखार्‍यातून आहे
सावली तितकीच हृदयातून आहे

भाग्य मिळवायास आहे फार सोपे
फक्त तिथला मार्ग काट्यातून आहे

घेतली आहे कुठे मी आजसुद्धा..?
ही नशा माझ्याच जगण्यातून आहे

भेट होते रोजची , पण प्रश्न उरतो...
आजही संवाद दारातून आहे

भय कुणाला वाटले इतके कधी ? जे -
आपल्या एकत्र येण्यातून आहे....

भांडणे, एकत्र येणे रोज होते
गाठ मैत्रीचीच अफलातून आहे

शेर कुठला मी कधी रचलाच नव्हता
भाव आला फक्त.... जो आतून आहे

आपलेपण "आपला" म्हणण्यात नाही...
नेहमी म्हणता किती...? यातून आहे

** मतल्यासाठी काफियात छोटी सूट घेतली आहे.

गझल: 

प्रतिसाद

मस्तच !!

नशा, संवाद, खूप खूप आवडेश :)

गझल आवडली. भाग्य, संवाद, भाव खासच!

शेर कुठला मी कधी रचलाच नव्हता
भाव आला फक्त.... जो आतून आहे


आपलेपण "आपला" म्हणण्यात नाही...
नेहमी म्हणता किती...? यातून आहे

वरील शेर लाजवाब! खूप आवडले !
---------------------------------------------------------नचिकेत भिंगार्डे

नशा, संवाद, आपला
खुप आवडले.

शेवटचा शेर आवडला..

प्रतिसाद देणार्‍या - न देणार्‍या सर्वांचे मनापासून धन्यवाद...!

एकत्र येणे, अफलातून व शेवटचा शेर आवडले.

खुप आवडली. सावली, आपला आवडले.

* - भेट होते रोजची , पण प्रश्न उरतो...
आजही संवाद दारातून आहे
***
व्वा, बहोत खुब...हा शे'र फार आवडला...छान ग़ज़ल.

**
बोलणे माझे निखार्‍यातून आहे
सावली तितकीच हृदयातून आहे...

-अजय साहिब्,मतला असा ठेवला असता तर?

" बोलणे माझे हृदयातून आहे...
सावली तितकीच निखार्‍यातून आहे..."

सहज सूचले म्हणून... क्षमस्व...
लोभ असावा ही विनंती...
` ख़लिश ' - वि. घारपुरे.१६-०३-२०१०.

अजयजी,सूचवलेल्या मतल्यात भाव / आशय जरी बदलत असला तरी फेर बदल केल्याने मागून लक्षात आले की तसे केल्याने एका लघु/गुरुचा क्रम बदल होत आहे. क्षमस्व...
` ख़लिश ' - वि.घारपुरे / १६-०३-२०१०.

बेफिकीर, प्रताप, खलिश(२दा) धन्यवाद..!
खलिश,
तुम्हाला लक्षात आल्यावर लगेच लिहिलेत हा तुमचा मोठेपणा. धन्यवाद..!

भेट होते रोजची , पण प्रश्न उरतो...
आजही संवाद दारातून आहे

वा! छान गझल.