..... पुन्हा पुन्हा !

दाव तोच जीवना लावतो पुन्हा पुन्हा
मृत्युला जगायला शिकवतो पुन्हा पुन्हा

हर गुन्ह्यात मी तुला पाहतो पुन्हा पुन्हा
दाखल्यात बोलणे टाळतो पुन्हा पुन्हा

चांदणी कधी कुण्या अंबरास भार ना
चंद्र मग उगाच का हरवतो पुन्हा पुन्हा

आसवे न ढाळली मी कधीच पांगळी
का तिच्यापुढेच मी भेकतो पुन्हा पुन्हा

माज ही जुनाच शिरजोर आज ती पुन्हा
आग तीच मी परी पोळतो पुन्हा पुन्हा

हां...कबूल दुश्मनी जन्मजात लाभली
बांध घालुनी दुवा सांधतो पुन्हा पुन्हा

हात जोडुनी उभे सौख्य मजपुढे सदा
व्यर्थ दशदिशात मी शोधतो पुन्हा पुन्हा

जयश्री

गझल: 

प्रतिसाद

हात जोडुनी उभे सौख्य मजपुढे सदा
व्यर्थ दशदिशात मी शोधतो पुन्हा पुन्हा

हा शेर खुपच आवडला...एकंदर गझल आवडली.

डॉ.कैलास

शेवटचा शेर आवडला.
जयश्रीताई,
मतल्यातील 'वतो पुन्हा पुन्हा' वरून पुढे एकदम 'अतो पुन्हा पुन्हा' वर गेलात की...!

सर्वच शेर आवडले.

कृपया थोडं मार्गदर्शन करा.

अशी सूट दुसर्‍या शेरापासून घेतली तर चालते का ?

चवथ्या शेरात यतिभंग होतोय "शिरजोर" वर. असं चालतं का ?

जयश्रीताई, दोन मतले लिहून सूट घेता येण्याचा एक सर्वमान्य, प्रचलित नुस्का आहेच. मतल्यातच रदीफ, काफिया, अलामत यांची निश्चिती होत असल्याने तुमच्या गझलेचा विचार करता पहिल्या शेरांत अजय म्हणतात तसे 'वतो पुन्हा पुन्हा'ची निश्चिती झाली आहे. तुमच्या दुसर्‍या शेरातही ते पाळले गेले आहे; मात्र पुढे नाही. पहिल्या शेरात जे निश्चित झाले आहे त्याप्रमाणे पुढच्या शेरांमध्येही (गा)वतो किंवा (लल)वतो आले पाहिजे होते. तसे नको असल्यास एकाऐवजी दोन मतले लिहावेत किंवा पहिल्याच मतल्यात 'अतो पुन्हा पुन्हा' निश्चित करावे. चू. भू. द्या. घ्या.
यतिभंग वेगळा मुद्दा आहे. त्याची अलामतीशी गल्लत नको :)

जयश्री,

आपली ही गझल अतिशय सुंदर आहे. प्लीज कीप इट अप! ( कीप इट अप म्हणायला मी काही कुणी ग्रेट आहे असे नाही पण ही गझल खरच अतिशय सुरेख आहे.)

बाकी वरील मतप्रदर्शने वाचून हसू आले.

१. 'वतो' 'वतो' वरून आपण 'अतो'वर गेलेला नसून बाराखडीनुसार आपला मतलाच तंत्रात नाही असे माझे मत आहे.

२. यतिभंग वेगळा मुद्दा आहे. त्याची अलामतीशी गल्लत नको :)
हा विनोद बरा आहे. (विनोद... कारण पुढे 'स्मायली' दिला आहे.)

मात्र, तुमच्या चवथ्या शेरात 'माझ्यामते' यती भंगलेला आहे व 'यती' महत्वाचा असतो असे मला वाटते.

बाकी तंत्र वगैरे सोडा, आशय उत्तम आहे.

धन्यवाद बेफिकीर :)
अजय, चक्रपाणि.....चूक दाखवून दिल्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद.
दोन मतले लिहून गझल दोषरहित करण्याच्या प्रयत्न करतेय.

दाव तोच जीवना लावतो पुन्हा पुन्हा
मृत्युला जगायला शिकवतो पुन्हा पुन्हा

हर गुन्ह्यात मी तुला पाहतो पुन्हा पुन्हा
दाखल्यात बोलणे टाळतो पुन्हा पुन्हा

चांदणी कधी कुण्या अंबरास भार ना
चंद्र मग उगाच का हरवतो पुन्हा पुन्हा

आसवे न ढाळली मी कधीच पांगळी
का तिच्यापुढेच मी भेकतो पुन्हा पुन्हा

माज ही जुनाच शिरजोर आज ती पुन्हा
आग तीच मी परी पोळतो पुन्हा पुन्हा

हां...कबूल दुश्मनी जन्मजात लाभली
बांध घालुनी दुवा सांधतो पुन्हा पुन्हा

हात जोडुनी उभे सौख्य मजपुढे सदा
व्यर्थ दशदिशात मी शोधतो पुन्हा पुन्हा

खुप आवडली. चांदणी, आसवे आवडले.