नभाचे शब्द स्वच्छंदी - एक अप्रतिम मुशायरा - वृत्तांत

मुशायरा अक्षरशः भन्नाट!

त्यापुर्वी, केवळ माझ्या व अजय यांच्या दूरध्वनीला प्रतिसाद देऊन कोणतीही अट न घालता परगावहून येणार्‍या डॉ. मिलिंद फणसे व डॉ. ज्ञानेश पाटील यांचे मनःपुर्वक आभार!

सर्वश्री बशर नवाझ ही काय चीज आहे हे पुण्यातील अनेकांना त्याच दिवशी समजले. बशरसाहेबांचे धन्यवाद मानण्याइतके आम्ही दोघेही पात्र नाही आहोत.

पावणेसहा या ठरलेल्या वेळेला केवळ दहा ते बारा उपस्थिती असल्यामुळे आम्ही निराश झालो होतो. शेवटी सव्वा सहाला मुशायरा चालू केला.

प्रत्येक शायराच्या उत्कृष्ट ओळी ऐकवून त्या त्या शायराला व्यासपीठावर बोलवण्यात आले. त्यात ज्ञानेश यांच्या 'जुने विसरून गेलेले' या गझलेतील काही शेर प्रत्यक्ष सादर करण्याची संधी मला प्रथमच मिळाली. (ती माझी अत्यंत आवडती गझल असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माझ्याकडे होते.)

शेवटी डॉ. अनंत ढवळे व सर्वात शेवटी श्री. बशर नवाझ व्यासपीठावर आले. बशरसाहेबांसाठी सर्वजण उठून उभे राहिलेले होते. अजय जोशी यांनी सर्वांचे स्वागत केले.

मात्र अचानक रसिकांची संख्या वाढू लागली. उत्साहही वाढू लागला. शेवटी एकंदर साठ एक रसिक असावेत.

मुशायर्‍याच्या सुरुवातीला भटसाहेबांनी मराठी या भाषेला गझलतंत्र व गझलमंत्र यांची भेट दिलेली असल्याने भटसाहेबांच्या दोन गझलांचे वाचन झाले. 'नभाचे शब्द स्वच्छंदी' ही टायटल गझल मी तर 'इतकेच मला जाताना' ही गझल अजय यांनी सादर केली.

मुशायर्‍यात एकंदर सात कवी व बशरसाहेब होते. श्री. ओंकार जोशी उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच श्री. केदार पाटणकरही उपस्थित राहू शकले नाहीत.

एकंदर सहा फेर्‍या ठरलेल्या होत्या. मात्र वेळेअभावी चारच फेर्‍या झाल्या.

चक्री मुशायरा असल्याने एकापाठोपाठ एकेक कवी आपापली गझल सादर करत होते.

प्रथम फेरीलाच रसिकांची उत्स्फुर्त दाद मिळाली. शेरांना भरभरून टाळ्यांचा कडकडाट मिळत होता.

माझ्या 'व्यर्थ', 'पक्षी' , 'आता माझी एक ओळही' व पालखीत पादुका ही सामाजिक गझल यातील काही शेरांना उत्तम दाद मिळाली.

मधुघट यांच्या ओढा या गझलेला भरपूर दाद मिळाली. त्यांच्या 'दुनियेची कढई' अन 'हमाली वेदनांची' या गझलांतील शेरांना तर अप्रतिमच दाद मिळाली. मधुघट खणखणीत आवाजात गझला पेश करत होते. त्यांच्या मित्रांनाही दाद द्यायला हवी, जे फक्त मधुघटलाच दाद न देता दिलदारपणे व समंजसपणे सर्वच चांगल्या शेरांना दाद देत होते.

मिलिंद फणसे यांच्या 'अर्घ्यदान' व 'होता सुवास, होता सुमनांस वास बाकी' या गझलांना उत्तम दाद मिळाली. मिलिंद फणसे यांच्या गझला विचारपुर्वक रचलेल्या व आशयगर्भ असतात हे आपण सर्व जाणताच. फणसेंच्या उपस्थितीने मुशायरा अजूनच खुलला.

मिलिंद छत्रे यांचे सादरीकरण वेगळेच आहे. ते अत्यंत तन्मयतेने गझल सादर करतात. तसेच, शेर संपताना एका विशिष्ट पद्धतीने हसून शेरातील भावना पोहचवण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. मिल्या या नावाने ते आपल्याला परिचित आहेतच. त्यांच्या 'माय नेम इज खान' व 'नकार गर्भरेशमी' तसेच 'कल्लोळ' ला अतिशय उत्तम दाद मिळाली.

ज्ञानेश मुळातच आपल्या गझलांसाठी प्रसिद्ध आहेतच. ज्ञानेश यांचे सादरीकरण फार संयत व गझलेच्या मूडशी जमून जाणारे आहे. 'कोण आहे तुझा मी', 'जाहला बराच वेळ', 'रिवाज पाळू' व 'घोरपड्यांची जोडपी' ही हझल या सर्वांना अत्यंत उत्स्फुर्त दाद मिळाली. जाहला बराच वेळ ही त्यांची गझल व घोरपड्यांची जोडपी ही हझल त्यातल्यात्यात फारच दाद घेऊन गेल्या.

सर्व कवींना अनेक शेरांसाठी 'वन्स मोर' मिळत होता. बशरसाहेब प्रत्येक शेराला उचित दाद देत होते. आपल्या माहितीसाठी, त्यांना मराठीचे व्यवस्थित ज्ञान आहेच.

अजय यांच्या शेवटच्या गझलेने मात्र कमालच केली. 'कधी र्‍हस्व माझाच मी दीर्घतो' या गझलेतील यच्चयावत शेरांना उत्तम व उत्स्फुर्त दाद मिळाली. तसेच, त्यांच्या आधीच्या गझलांतील जाही शेरही रसिकांनी भूषवले.

अनंत ढव़ळे यांची खरी ताकद मलाही याच मुशायर्‍यात कळली. त्यांचे शेर अक्षरशः लाजवाब होते. त्यांचे सादरीकरणही उत्तम झाले. मुशायर्‍याचा मूड अंतर्बाह्य हलवण्याची ताकद त्यांच्या काव्यात आहे. त्यांच्या गझलांनतर हझल सादर करण्याचा मूड कुणालाही होणार नाही. त्यामुळेच, हझलांची / सामाजिक गझलांची फेरी तिसरीच ठेवलेली होती व त्यानंतर त्यांच्या सलग दोन गझला!

बशर नवाझ - २००८ चा पु. ल. देशपांडे पुरस्कार, २०१०चा महाराष्ट्र शासनाचा 'लाईफटाईम अ‍ॅचिव्हमेंट अ‍ॅवॉर्ड' व पद्मश्रीसाठी नामांकन इतपत वर्णने पुरेसे व्हावे. मात्र बशरसाहेब चालती बोलती शायरी आहे. वय ७५! शरीर कृश झालेले! मात्र त्यांचा उत्साह अवर्णनीय होता. खरे तर मला व अजयलाच त्यांचे यथायोग्य स्वागत करता आले नाही. बशरसाहेबांचे प्रत्येक शेराकडे लक्ष होते. प्रत्येक शेराला यथोचित दाद होती. बशर साहेबांची चार पुस्तके आहेत. दोन उर्दूमधे त्यांच्या स्वतःच्या गझलांची, एक उर्दूमधेच समीक्षेचे व एक हिंदीमधे त्यांच्या गझलांचे! करोगे याद तो ही त्यांची गझल बाजार या चित्रपटात गायली गेली आहे. त्यांच्या काही गझला मेहंदी हसन व गुलाम अली यांनी गायलेल्या आहेत.

सर्व फेर्‍यांनंतर बशरसाहेबांकडे सगळ्यांचे डोळे लागले. बशर साहेबांनी आपल्या तीनच मिनिटांच्या अल्प भाषणात एक अत्यंत महत्वाचा मुद्दा सांगीतला. 'जीवन कुठे कुठे जाते पाहू व आपणहून आपल्या अयशस्वी प्रयत्नांमुळे फार त्रासून व अगतिक होऊन जाऊ नये व या मनस्थितीत शायरी रचावी'! व्वा!

अर्थातच, त्यानंतर त्यांनी सादर केलेल्या गझला अप्रतिमच होत्या. मराठी रसिकांनाही समजत तर होत्याच मात्र उत्स्फुर्त दादही मिळवत होत्या.

बशर साहेबांनी तीन गझला सादर केल्या. त्यांचे सादरीकरण एकदम उर्दू स्टाईलचे आहे.

ते जेव्हा बोलायचे थांबले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट थांबतच नव्हता.

मुशायर्‍याला गझलगंधर्व श्री. सुधाकर कदम, चित्तरंजन व जाणकार गझल रसिक श्री. प्रशांत पेंडसे हेही उपस्थित होते.

यानंतर आणखीन मुशायरे करायचे ठरत आहे. पुढील मुशायरा बहुधा मार्चमधेच होईल वा आम्ही आधी ठरवलेली 'फ्रिक्वेन्सी' दोन महिन्यावरून एक महिन्यावर येईल असे वाटते.

हे मुशायरे विविध गावांकधे करण्याचा मानस आहे.

धन्यवाद!

आगामी कार्यक्रम: 

प्रतिसाद

मुशायरा अत्यंत छान झाला.

वरीलपैकी मी, मिल्या आणि अमोघ (मधुघट) यांचा हा पहिलाच मुशायरा होता. यात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल आणि एकूणच एक नेटका कार्यक्रम आखल्याबद्दल मी श्री. भूषण व श्री. अजय यांचे आभार मानतो.

सर्वच गझला आणि सादरीकरण छान झाले. चित्तरंजन, श्री. कदम यांच्या उपस्थितीमुळे आनंद वाटला.
या कार्यक्रमात अनेक नव्या लोकांशी भेट झाली, जे एरवी शक्य झाले नसते. मी पहिल्यांदाच श्री. चित्तरंजन, श्री. अनंत ढवळे, मिलिंद फणसे यांना भेटलो. तसेच मधुघट, कैलास, हेमंत पुणेकर या दोस्तांना सुद्धा भेटता आले.

सर्वात मोठे आकर्षण अर्थातच बशर नवाज साहेब ! त्यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळाले.
असे कार्यक्रम वारंवार होत रहावेत..!

मुशायरा उत्तमच झाला. वर चुकून राहिलेल्या माझ्या गझला. जुने झाले नवे..(संकेतस्थलावर नाही), आपला फासा..., सोडले तेंव्हा तुला.. (या संकेतस्थळावर आहेत.)
३री फेरी हझलीश रचनांची ठरवल्यामुळे मजा आली. प्रत्येकानेच काही ना काही अशा रचना सादर केल्या. माझ्याकडे हझल नव्हती म्हणून मी 'सोडले तेंव्हा तुला' सादर केली. त्यालाही दाद मिळाली.
मुशायरा चांगला व्हायचे कारण म्हणजे, उपस्थित सातही गझलकारांनी त्यात जान आणली. प्रत्येक गझलकार आपल्या गझलेबाबत गंभीर आणि सादरीकरणात 'जॉली' होता. गझलकारांनी एकमेकांना दिलेली दादही वाखाणण्यासारखी होती. मुशायर्‍यात प्रथमच सहभागी होणारेसुद्धा रुळलेले वाटत होते.
बशर साहेबांनी वावरताना कोणतेही वेगळेपण जाणवू दिले नाही. ते आमच्यापैकीच एक असल्यासारखे मंचावर होते. मात्र, त्यांच्या सादरीकरणातून त्यांचे वेगळेपण दिसले.
गझलकार आणि रसिक यांनी मिळून हा मुशायरा ठरवला आहे की काय असे वाटून गेले.

हे मुशायरे विविध गावांकधे करण्याचा मानस आहे

अचानक मला बरं वाटु लागलय की मी नेरुळ गावात रहातोय....

डॉ.कैलास

भूषण आणि अजयजींचे आभार...
त्यांच्यामुळेच आयुष्यातला पहिलाच मुशायरा एवढा रंगीन होऊ शकला!
मी तर खूपच भाग्यवान ठरलो, कारण दुसर्‍या दिवशी सकाळी १०.३० पर्यंत बशर साहेबांचा सहवास मिळाला. खूप मार्गदर्शन मिळाले त्यांच्याकडून!!! :-)

आणखी महत्त्वाचे म्हणजे ज्ञानेश हा चाळीशी ओलांडलेला कवी असावा हा गैरसमज दूर झाला. आणि एक चांगला मित्र मिळाला! :-))

मुशायरा खरेच मस्त झाला... एकदम मजा आली आम्हा सादर करणार्‍यांना तर आलीच पण ऐकणार्‍यांनाही आली हे नंतर बर्‍याच जणांनी सांगितले तेव्हा कळले...

ज्ञानेश, मधुघट आणि माझा पहिलाच मुशायरा होता.. पण बाकीच्या शायरांनी आम्हाला छान संभाळून घेतले.

भूषण आणि अजय ह्यांचे खरेच खूप आभार ही संधी आम्हाला दिल्याबद्दल.

चित्त आणि सुधाकरजी कदम आणि प्रशांत पेंडसे ह्यांनी उपस्थित राहून आमचा उत्साह वाढवला.

बशर नवाझ साहेबांचा सहवास हे ह्या मुशायराचे अजून एक वैशिष्ठ्य ठरले... बशर साहेब एवढे मोठ्ठे पण तरिही इतके साधे व्यक्तिमत्व आहे की आम्ही सर्वच त्यांच्या प्रतिभेने मंत्रमुग्ध झालो... त्यांनी त्यांच्या गझलांनी आणि बोलण्याने सर्वांची मने जिंकुन घेतली...

एकदरंतीच एक आनंददायी व अविस्मरणीय अनुभव होता हा मुशायरा म्हणजे.

ज्ञानेश, मधुघट, मिल्या धन्यवाद!
आपण सर्वजण (डॉ.फणसे सोडून) या संकेतस्थळावर नियमित लिहिणारे असल्याने तसे आपण एकमेकांना ओळखत होतोच. माझ्याकडून मी या संकेतस्थळाचेही आभार मानतो. कारण, इतके सर्व गझलकार गझला लिहीत असतात पण माहीत नसते. या संकेतस्थळामुळे ते माहीत झाले. त्यामुळेच खरेतर संपर्क करता आला. तुम्हां सर्वांची ओळख या संकेतस्थळावरच पहिल्यांदा झाली होती. त्यातूनच हा मुशायरा होवू शकला हेही खरे आहे. अन्यथा, पुण्यातही शेकडो गझलकार असतील. ते समजणार कसे? प्रत्येक गल्लीत जाऊन तर पाहू शकत नाही. सरकारी यंत्रणेत कवी/साहित्यिक असे वेगळे वर्गीकरण नाही. त्यामुळे गझलकार अशा संकेतस्थळावरूनच कळू शकतात. त्याबद्दल संकेतस्थळाच्या प्रशासनाचे आभार!
मुशायरा ऐकायला नंतर, घनःश्याम धेंडे आणि जयंत भिडे हेही त्यांचा उद्यान प्रसादमधील कार्यक्रम उरकून आले होते. डॉ. कैलास हेही नेरुळमधून आले होते. विशेष म्हणजे, वय वर्षे १८ ते वय वर्षे ८९पर्यंत विविध वयोगटातील रसिक उपस्थित होते आणि मुशायर्‍याचा आनंद घेत होते. सर्वांचे आभार.

अप्रतिम मुशायरा! मी तर पहिल्यांदाच मराठी मुशायरा पाहिला! सर्व गझलकारांचे सादरीकरण छान झाले. कार्यक्रमाला उत्तम श्रोता लाभले होते व ते भरभरून दाद देत होते. (मी पण त्यातलाच एक :-) )

बशर नवाझ साहेबांनी ज्या गोष्टी सांगीतल्या त्यातली एक खुप आवडलेली गोष्ट म्हणजे काव्य लिहीण्यासाठी जीवनाला जवळून व नॉन-जजमेन्टल रीत्या जगणे आवश्यक आहे. व्वा!

भूषण आणि ज्ञानेष ह्यांच्याशी फोन वर संपर्कात होतो पण प्रत्यक्ष भेटायची संधी मीळाली ह्या कार्यक्रमा मुळे मिळाली. अजय जोशी व चित्तरंजन ह्यांची पण ओळख झाली. माझ्यासारख्या गझलप्रेमीला आणखी काय पाहिजे?

अशेच मुशायरे होउ द्यात! दर महिन्याला झाले तर उत्तमच!