खुशाली

खुले चेहरा अन् खुळी लाज गाली
समजली जगाला गुलाबी खुशाली

जसे वेगळे भास नजरेतले अन्
तशा वेगळ्या आतल्या हालचाली

विडा रंगुनी जायचा रात्र सरता
नभी उमटुनी जायची शुद्ध लाली

पुन्हा लागला एक चकवाच बहुधा
खरी वेगळी वाट केव्हाच झाली

तुझ्या आसवांचे निराळेच दावे
तुझे वागणे काढती ते निकाली

अभागी सुखाचा तुझ्या बोलबाला
मुके दु:ख माझे तसे भाग्यशाली

समजलेच नाही कधी ठार झालो
पहार्‍यास होते सगे भोवताली

पुरे जीवना, मात दे एकदाची
कशा परतवू या तुझ्या गूढ चाली?

जरी खोल असती ठसे पावलांचे
तरी वाट नसते कुणाच्या हवाली
- नचिकेत जोशी

गझल: 

प्रतिसाद

नचिकेत,
सुरेख गझल लिहिलीत. २,४,६,७,९ आवडले.
अभागी सुखाचा तुझ्या बोलबाला
मुके दु:ख माझे तसे भाग्यशाली

व्वा! फारच छान.
जरी खोल असती ठसे पावलांचे
तरी वाट नसते कुणाच्या हवाली

खरेच! पटले.

अक्षरशः उत्तम गझल! प्रत्येक शेर आवडला.

'बेफिकीर'!

अप्रतिम गझल.

खरोखरीच शेरन् शेर अफलातून आहे!
सुंदर गझल!

अजयजी, बेफिकीर, गंगाधरजी, ऋत्विक,
मनापासून धन्यवाद!

>>>जरी खोल असती ठसे पावलांचे
तरी वाट नसते कुणाच्या हवाली..
अजयजी, हा माझाही आवडता शेर आहे या गझलेतला.. :-)

खुप आवडली. विडा आवडले.

गझल आवडली. चकवा, भाग्यशाली खास वाटले.

प्रताप, चक्रपाणि . धन्यवाद..

गझल आवडली.

विडा रंगुनी जायचा रात्र सरता
नभी उमटुनी जायची शुद्ध लाली

तुझ्या आसवांचे निराळेच दावे
तुझे वागणे काढती ते निकाली

हे दोन शेर खूप छान आहेत. जरासे थांबून, विचार करून अर्थ लागतो. मजा येते.
शेवटचा शेरही आवडला.

मस्तच ...... अख्खी गझलच आवडेश :)

पुन्हा लागला एक चकवाच बहुधा
खरी वेगळी वाट केव्हाच झाली

छान !

विश्वनाथजी, ज्ञानेशसाहेब, जयश्रीताई, अनंतजी -
मनापासून धन्यवाद..

>>>जरासे थांबून, विचार करून अर्थ लागतो. मजा येते.
ज्ञानेशजी,
ही प्रतिक्रीया माझ्या गझल शिकण्यामध्ये महत्त्वाची ठरेल..
धन्यवाद..

विडा रंगुनी जायचा रात्र सरता
नभी उमटुनी जायची शुद्ध लाली

पुरे जीवना, मात दे एकदाची
कशा परतवू या तुझ्या गूढ चाली?

उत्तम!!!

अभागी सुखाचा तुझ्या बोलबाला
मुके दु:ख माझे तसे भाग्यशाली

चांगली कल्पना.

पुन्हा लागला एक चकवाच बहुधा
खरी वेगळी वाट केव्हाच झाली

अभागी सुखाचा तुझ्या बोलबाला
मुके दु:ख माझे तसे भाग्यशाली

जरी खोल असती ठसे पावलांचे
तरी वाट नसते कुणाच्या हवाली

आवडलेले शेर...!
शुभेछा....!

हबा, वामनजी, प्रशांत - धन्यवाद! :-)

मिल्याची 'माती' आणि हबांच्या 'इतकी सुंदर ढाल' नंतर
ही अप्रतिम रचना नवीन नेटकरांसाठी द्यावी वाटली...

म्हणून.. खूप सुंदर!!

धन्यवाद शाम!

शेवटचा शेर खूप आवडला.

खुले चेहरा अन् खुळी लाज गाली
समजली जगाला गुलाबी खुशाली

जसे वेगळे भास नजरेतले अन्
तशा वेगळ्या आतल्या हालचाली

समजलेच नाही कधी ठार झालो
पहार्‍यास होते सगे भोवताली

पुरे जीवना, मात दे एकदाची
कशा परतवू या तुझ्या गूढ चाली?

खरतर सारेच शेर लाजवाब आहेत...पण ..हे शेर मला अधिक आवडले

सुरेशजी, मयुरेशजी
आभार!

अभागी सुखाचा तुझ्या बोलबाला
मुके दु:ख माझे तसे भाग्यशाली

समजलेच नाही कधी ठार झालो
पहार्‍यास होते सगे भोवताली

हे शेर भन्नाट आवडले !!!