प्राक्तन फ़िदाच झाले

प्राक्तन फ़िदाच झाले

प्राक्तन फ़िदाच झाले यत्नास साधताना
मोती पुढ्यात आले वाळूस गाळताना

हलक्याच त्या हवेने का कोसळून जावा ?
हेका उगीच होता तो स्तंभ बांधताना

पिकल्या फ़ळास नाही चिंता मुळी मुळीची
दिसलेच ना कधीही हितगूज सांगताना

शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली
स्वप्नेच वांझ झाली तारुण्य जाळतांना

द्रव्यापुढे द्रवीतो का कायदा म्हणावा?
नेमस्त गांजलेले कानून पाळताना

आता "अभय" जगावे अश्रू न पाझरावे
आशेवरी जगावे ही वाट चालताना

गंगाधर मुटे

गझल: 

प्रतिसाद

३ रा शेर आवडला.

एक उत्सुकता:
साधताना, गाळताना
ऐवजी
साधतांना, गाळतांना योग्य राहिले असते काय?

खुप आवडली. वाळू, पिकले फळ आवडले.

छान आहे गंगाधर्पंत....

डॉ.कैलास

गझल आवडली.

सुंदर गझल.

चौथा शेर आवडला.
पण....
प्राक्तन आणि फिदा हे शब्द लागोपाठ, द्रवीती आणि कानून हे खटकले.
कदाचित 'तांत्रिकदृष्ट्या' ते शुद्ध असतीलही, पण कविता वाचताना मात्र तिथे अडखळायला होतंय.

सहृदय अभिप्रयाबद्दल सर्वाचा आभारी आहे.

फाटकजी आपल्या सुचनेची नोंद घेतली आहे.

मोती पुढ्यात आले वाळूस गाळताना

हलक्याच त्या हवेने का कोसळून जावा ?
हेका उगीच होता तो स्तंभ बांधताना

शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली

वा ... गझल आवडली...

छान ! आवडली

पिकल्या फ़ळास चिंता नसतेच का मुळांची?
दिसले कधीच नाही हितगूज साधताना..

असे केल्यास

मुळी च्या पनरावृत्तीमुळे होणारा संभ्रम ताळता येईल असे वाटते.