आपला फासा न यावा आपल्यावर...

कोणती धुंदी चढावी काळजावर ?
ना तसे काळीज उरले धुंदल्यावर..

लढ जसे तू पाहिजे पण काळजी घे..
आपला फासा न यावा... आपल्यावर

'सांगणे त्याने घराणे बंद केले...'
स्वप्न ही पडतात हल्ली जागल्यावर

बोल तूही जे जसे बोलायचे ते
काय कामाची प्रसिद्धी...? झाकल्यावर?

आपले संबंध इतके मोकळे की,
मोकळे वाटून गेले तोडल्यावर...

'ही निघाले..' बोलते आहेस नुसते...
कोण येथे भाळले आहे तुझ्यावर ?

कोणती झाली न शिक्षा आजही अन्
काढले खटले निकाली शेकड्यावर..

बोलते आहेस आता, 'काय झाले?'
घाव इतके घालुनी माझ्या मनावर..

'ठेवले नाते अजूनी... जोडलेले..'
कोणते उपकार केले आमच्यावर..?

गझल: 

प्रतिसाद

आणखी एक घ्या....

आशयाची धार केंव्हाचीच गेली
राहिलो गुंतून मात्रा मोजण्यावर....

काफिया फार सोपा आहे. प्रत्येक जण लिहू शकेल........... लिहा :)

आपले संबंध इतके मोकळे की,
मोकळे वाटून गेले तोडल्यावर...

हा शेर मध्यभागी शोभून दिसतो आहे ! :)

खुप आवडली. खटले आवडले.

'सांगणे त्याने घराणे बंद केले...'
स्वप्न ही पडतात हल्ली जागल्यावर - समजला नाही. माफ करा.

बोल तूही जे जसे बोलायचे ते
काय कामाची प्रसिद्धी...? झाकल्यावर? - छान!

आपले संबंध इतके मोकळे की,
मोकळे वाटून गेले तोडल्यावर... - चांगला शेर! (वाटले किती भकास वाटले बरे किती आठवला.)

'ही निघाले..' बोलते आहेस नुसते...
कोण येथे भाळले आहे तुझ्यावर ? - चांगला शेर!

धन्यवाद!

ज्ञानेश, प्रताप, बेफिकीर धन्यवाद!

छान !
मोकळे संबंध मस्तच !!

छान. मोकळा शेर चांगला आहे.

आपले संबंध इतके मोकळे की,
मोकळे वाटून गेले तोडल्यावर...
खुप आवडला.

जयश्रीताई, चित्तरंजनजी, गंगाधरजी धन्यवाद!
मोकळा शेर तसा सर्वांनाच आवडलेला दिसतोय! अर्थात तो लिहिल्यावर मलाही थोडे मोकळे वाटले होते म्हणा..:)