बाजार

तोडून पाश इथले, हा दूर चाललो मी
बहुधा नव्याच आता मोहात गुंतलो मी

दे तू मला तुझे ते आयुष्य फाटलेले
ठिगळे जुन्या सुखांची नेसून त्रासलो मी

उपयोग काय आता फाडून पत्र माझे
ते वाचताच तुझिया हृदयात उतरलो मी

दु:खासवे लढाया मी नित्य सज्ज होतो
पण सामना सुखाशी होताच बिचकलो मी

हातात हात आला, तोवर उशीर झाला
स्पर्शापल्याड होतो केव्हाच पोचलो मी

बाजार दाखवाया नेलेस अन् समजलो
येईल भाव तेथे इतका वधारलो मी

- नचिकेत जोशी

गझल: 

प्रतिसाद

दु:खासवे लढाया मी नित्य सज्ज होतो
पण सामना सुखाशी होताच बिचकलो मी

व्वा! सुरेख!

बहुधा नव्याच आता मोहात गुंतलो मी

उपयोग काय आता फाडून पत्र माझे

या ओळी व खालील शेर आवडला.

हातात हात आला, तोवर उशीर झाला
स्पर्शापल्याड होतो केव्हाच पोचलो मी

धन्यवाद!

छान आहे गझल.

"स्पर्शापल्याड होतो केव्हाच पोचलो मी.." सुंदर आहे!

दे तू मला तुझे ते आयुष्य फाटलेले
ठिगळे जुन्या सुखांची नेसून त्रासलो मी
छान.
जुन्या सुखांची ठिगळे - छान.
केवळ 'जुन्या' असे न ठेवता जर
ठिगळे अता सुखांची नेसून त्रासलो मी
'अता' केले तर ....? किंवा इतर कोणताही 'लगा' शब्द.

हातात हात आला, तोवर उशीर झाला
स्पर्शापल्याड होतो केव्हाच पोचलो मी

उत्तम शेर आहे.....गझल आवडली.

डॉ.कैलास गायकवाड.

बाजार दाखवाया नेलेस अन् समजलो
येईल भाव तेथे इतका वधारलो मी

वा! बहोत अच्छे!
बघता बघता आपल्याला लोक विकायला काढतात.

सर्वांचे धन्यवाद...
अजयजी, शब्दबदल चालेलही. पण "जुन्या" मध्ये एक अर्थ आहे. म्हणून आहे तेच ठेवतो..
धन्यवाद...