उत्तीर्ण होणार नाहीस

उत्तीर्ण होणार नाहीस, अभ्यास चिक्कार केला तरी
तू मोक्ष कोड्यात फिरशील हा जन्मही पार केला तरी

उल्लेख वाचून गझलेत ती वाद घालायला भेटते
भरघोस मिळतो नफा रोज तोट्यात व्यापार केला तरी

अस्थी विसर्जीत केल्या असाव्यात माझ्या जमीनीमधे
घडते तुझे शिल्प वाटेल तो भिन्न आकार केला तरी

हा संगणक ज्यास म्हणतात आत्मा, कसा द्यायचा फेकुनी?
टोचे दुराचार केला तरी वा सदाचार केला तरी

उतरेचना एकतर कालची आणि इच्छा उद्या प्यायची
हा वार केला तरी व्यर्थ जातो नि तो वार केला तरी

थेंबा तुझी नोंद घेणार नाहीत कोणी प्रवाहामधे
धिक्कार केला तरी आणि त्यांना नमस्कार केला तरी

संबंध सार्‍या जगाशीच तोडून व्हावेस तू 'बेफिकिर'
गाजेल प्रत्येक मिसरा गझलचा, निराधार केला तरी

गझल: