कुठे भास होतो तुझ्या कंकणांचा..

----------------------------------------------

कुठे भास होतो तुझ्या कंकणांचा, तुझ्या पैंजणांचे बुलावे कुठे...
हजारो दिशांनी तुझी हाक येते, तुझा हात सोडून जावे कुठे?

क्षणांची, दिशांची, ऋतुंची, हवेची जरी लाख आलीत आमंत्रणे..
नभानेच ज्याचा असे घात केला, अशा पाखराने उडावे कुठे?

तसे बोललो खूप काही परंतु, तरी राहिले खूप बोलायचे
कळाले तुला दु:ख माझे तरीही, कळाले तुला बारकावे कुठे?

बसावे जरासे अशी भिंत नाही.. नसे आज रेडा तसा संयमी
नसे संतही या युगाचा तपस्वी.. अशाने चमत्कार व्हावे कुठे?

तुझे आणि माझे जुने रम्य नाते व्रणाच्याप्रमाणे जरी राहिले
तरी का असे नेहमी होत जाते... रुतावे कुठे अन् दुखावे कुठे !

मनाच्या किती चोरट्या पायवाटा बनू लागल्या राजरस्त्यांपरी..
अशा डांबरी या जमीनीत आता कविते, तुझे बी रुजावे कुठे?

मला आठवेना तुझी प्रेमपत्रे, शुभेच्छा, लिफाफे असावे कुठे
(गुन्हा जो कधीही न केला तयाचे कुणी ठेवते का पुरावे कुठे?)

नवे साल आता विचारे जुन्याला, मला उत्तरे तूच आणून दे
रडावे कुणाशी? रडावे कशाला? रडावे किती अन् रडावे कुठे...

-ज्ञानेश.
------------------------------------------------

गझल: 

प्रतिसाद

गझल चांगली झाली आहे. ही सुमंदारमाला नुसती गुणगुणतानाही मजा येते आहे.

तसे बोललो खूप काही परंतु, तरी राहिले खूप बोलायचे
कळाले तुला दु:ख माझे तरीही, कळाले तुला बारकावे कुठे?
वाव्वा!

मला आठवेना तुझी प्रेमपत्रे, शुभेच्छा, लिफाफे असावे कुठे
(गुन्हा जो कधीही न केला तयाचे कुणी ठेवते का पुरावे कुठे?)
वाव्वा!

ह्याशिवाय काही ओळी तर फारच मस्त आहेत.
मनाच्या किती चोरट्या पायवाटा बनू लागल्या राजरस्त्यांपरी..
रडावे कुणाशी? रडावे कशाला? रडावे किती अन् रडावे कुठे...

संमिश्र व वैविध्यपूर्ण गुणवत्तेचे शेर असलेली गझल वाटली.

कुठे भास होतो तुझ्या कंकणांचा, तुझ्या पैंजणांचे बुलावे कुठे...
हजारो दिशांनी तुझी हाक येते, तुझा हात सोडून जावे कुठे? - मतला समजला नाही. न समजण्याचे कारण!

कुठे तिच्या कंकणांचा भास होतो आहे तर कुठे तिच्या कंकणांचा! तसेच तिची हाकही हजारो दिशांनी येत आहे. हे सगळे भास आहेत असे वाटते. मग तिचा हात सोडून जाण्याचा प्रश्न कसा येतो हे लक्षात आले नाही. तिचा हात जर हातात असेल तर पैंजणे, कंकण आणि दिशांच्या हाकांचा संबंध काय ते लक्षात आले नाही. विचार करतो आहे.

क्षणांची, दिशांची, ऋतुंची, हवेची जरी लाख आलीत आमंत्रणे..
नभानेच ज्याचा असे घात केला, अशा पाखराने उडावे कुठे? - पहिल्या मिसरात 'पाखरू' या विषयावर शेर असेल असे वाटत नाही. हे बहुधा यशच म्हणावे लागेल.

तसे बोललो खूप काही परंतु, तरी राहिले खूप बोलायचे - परंतु मधील तू दीर्घ पाहिजे का? की 'रं' मधील अनुस्वाराने तो आपोआप दीर्घ होतो? :-)) मागे कुणीतरी असे म्हणाल्याचे आठवते.
कळाले तुला दु:ख माझे तरीही, कळाले तुला बारकावे कुठे? - वा वा! कळाले तुला बारकावे कुठे? फार सुंदर!

बसावे जरासे अशी भिंत नाही.. नसे आज रेडा तसा संयमी
नसे संतही या युगाचा तपस्वी.. अशाने चमत्कार व्हावे कुठे? - हा शेर अजिबातच समजला नाही. न समजण्याचे कारणः

जरासे बसावे अशी भिंत नाही. (भिंतीवरच बसणारे असतील तर त्यांना 'जरा टेकावे' असे काहीच नाही असा अर्थ वाटत आहे.) आज रेडा संयमी नाही. (रेडा संयमी असल्यामुळे वेद म्हणाला होता हे माहीत नव्हते.) जर संतच तपस्वी नसेल तर भिंत असली काय अन नसली काय किंवा रेडा संयमी वागला की नाही यांचा संबंध उरत नाही असे वाटते.

तुझे आणि माझे जुने रम्य नाते व्रणाच्याप्रमाणे जरी राहिले
तरी का असे नेहमी होत जाते... रुतावे कुठे अन् दुखावे कुठे ! - छान! (रम्य ऐवजी मुग्ध अशी सूचना येण्याची शक्यता)

मनाच्या किती चोरट्या पायवाटा बनू लागल्या राजरस्त्यांपरी.. - व्वा! उत्तम!
अशा डांबरी या जमीनीत आता कविते, तुझे बी रुजावे कुठे? - क'वी'ते ..... वी दीर्घ असावा असे वाटते. शेर आवडला नाही.

मला आठवेना तुझी प्रेमपत्रे, शुभेच्छा, लिफाफे असावे कुठे - 'त'
(गुन्हा जो कधीही न केला तयाचे कुणी ठेवते का पुरावे कुठे?) - वा वा! सुरेख शेर!

नवे साल आता विचारे जुन्याला, मला उत्तरे तूच आणून दे
रडावे कुणाशी? रडावे कशाला? रडावे किती अन् रडावे कुठे...- समजला नाही.

ज्ञानेशपंत,
वा...
तबियत खूष झाली ना बे. सर्व गझल छान.
बारकाव्याचा, प्रेमपत्राचा शेर पुन्हा पुन्हा रसग्रहण करावा असा.
मतला संदिग्ध.

मला आठवेना तुझी प्रेमपत्रे, शुभेच्छा, लिफाफे असावे कुठे
(गुन्हा जो कधीही न केला तयाचे कुणी ठेवते का पुरावे कुठे?)
फार अपिल झाला. चित्तरंजनजींशी सहमत आहे.

क्षणांची, दिशांची, ऋतुंची, हवेची जरी लाख आलीत आमंत्रणे..
नभानेच ज्याचा असे घात केला, अशा पाखराने उडावे कुठे?

तसे बोललो खूप काही परंतु, तरी राहिले खूप बोलायचे
कळाले तुला दु:ख माझे तरीही, कळाले तुला बारकावे कुठे?

तुझे आणि माझे जुने रम्य नाते व्रणाच्याप्रमाणे जरी राहिले
तरी का असे नेहमी होत जाते... रुतावे कुठे अन् दुखावे कुठे !

वा! खासच गझल!

वा: खूप छान ओघवती रचना आहे!

मनाच्या किती चोरट्या पायवाटा बनू लागल्या राजरस्त्यांपरी..
अशा डांबरी या जमीनीत आता कविते, तुझे बी रुजावे कुठे?

मला आठवेना तुझी प्रेमपत्रे, शुभेच्छा, लिफाफे असावे कुठे
(गुन्हा जो कधीही न केला तयाचे कुणी ठेवते का पुरावे कुठे?)

नवे साल आता विचारे जुन्याला, मला उत्तरे तूच आणून दे
रडावे कुणाशी? रडावे कशाला? रडावे किती अन् रडावे कुठे...

हे तर खासच!

क्षणांची, दिशांची, ऋतुंची, हवेची जरी लाख आलीत आमंत्रणे..
नभानेच ज्याचा असे घात केला, अशा पाखराने उडावे कुठे?

व्वा ! अप्रतिम !

वा वा वा वा

अतिशय सुंदर, अप्रतिम आणि कसदार गझल.

काय फिरवलायं सुमंदारमालेला !!!!

सही !!!!

शेरही फार वरच्या दर्जाचे . एकूणच विलक्षण देखणी आणि आनंददायी कलाकृती

तसे बोललो खूप काही परंतु, तरी राहिले खूप बोलायचे
कळाले तुला दु:ख माझे तरीही, कळाले तुला बारकावे कुठे?

बसावे जरासे अशी भिंत नाही.. नसे आज रेडा तसा संयमी
नसे संतही या युगाचा तपस्वी.. अशाने चमत्कार व्हावे कुठे?

क्या बात है !!!!!!

आपला,
(आनंदित) धोंडोपंत

अस्सल नाणे !!!!

रात्री दिवे , काजवे , तारे चमकत असतात , लुकलुकत असतात आणि अचानक एक लख्ख वीज चमकुन क्षणासाठी चमकुन सारा आसमंत उजळून यावा तशी तुझी गझल असते.

मनाच्या किती चोरट्या पायवाटा बनू लागल्या राजरस्त्यांपरी..
अशा डांबरी या जमीनीत आता कविते, तुझे बी रुजावे कुठे?

मला आठवेना तुझी प्रेमपत्रे, शुभेच्छा, लिफाफे असावे कुठे
(गुन्हा जो कधीही न केला तयाचे कुणी ठेवते का पुरावे कुठे?)

काय एक से एक जबरदस्त शेर आहेत ... क्लास अपार्ट !!!!

सुमंदारमाला हे काय आहे ते समजले नाही.

माझ्यामते या वृत्ताचे नाव 'वागेश्वरी' होते. (संदर्भ - छंदोरचना)

तुमच्या मताप्रमाणे जग चालत नाही हो.

वागीश्वरीलाच सुमंदारमाला म्हणतात. तुम्ही म्हटल्याप्रमाणे ते "वागेश्वरी" नसून "वागीश्वरी" आहे.

गागाल | गागाल| ...... हे..... मंदार | माला

आणि

लगागा | लगागा | ........... हे..... सुमंदा | रमाला

तुम्ही ज्या छंदोरचना चा संदर्भ दिला आहे त्यात ३१३ क्रमांकाच्या पृष्ठावर माधवरावांनी वागीश्वरीला सुमंदारमाला का म्हणतात याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यात ते असेही म्हणतात की, वागीश्वरी हे नाव हिन्ही छंदःप्रभाकरात आढळले, पण या नावाला आधार आढळत नाही.

आता नीट लक्षात ठेवा.

आपला,
( छंदाभ्यासी) धोंडोपंत

बसावे जरासे अशी भिंत नाही.. नसे आज रेडा तसा संयमी
संयमी रेडा, रम्य कल्पना.
समाजासमोर ज्ञान आणणे, काला अक्षर भैस बराबर अशी एक म्हण आहे. रेड्याच्या आवाजात वेद म्हणजे अडाणी समाजाला बोलते करणे, असा अर्थ असावा.
छंदोरचना अफलातून.

छन्दोरचना पुस्तकांत या वृत्ताल एक लघु मात्रा जास्त असल्याने 'सुमंदारमाला'हे नाव देण्यात आले... वागीश्वरी नावाला आधार सापडत नाही ...वगैरे.... असे लिहिले आहे.
मग, वरती - 'वागीश्वरी' असे ठळक लिहिले आहे ते कशासाठी? जर याला आधार नाही तर त्याच नावाने परिच्छेद का?

एकंदर वातावरणात मी फार बोलू शकत नाही. इतकेच.

प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार !

तुमच्या मताप्रमाणे जग चालत नाही हो.

वागीश्वरीलाच सुमंदारमाला म्हणतात.

धोंडोपंत,

आपले विनोदी लिखाण यापुर्वी वाचनात आले नव्हते. आपण अष्टपैलू दिसता.
वागीश्वरीलाच सुमंदारमाला म्हणत असतील तर 'सुमंदारमाला हे मला समजले नाही, माझ्यामते हे वागेश्वरी आहे' या माझ्या मतात फक्त एकाच वृत्ताला आणखीन एक नाव आहे जे मला ज्ञात नव्हते असा अर्थ निघतो. (बाकी आधार नाही वगैरे सोडून द्या. आधार तुमच्या 'प्रतिसादांमधील असातत्यालाही' नसतो. आपले पाव्हणे रावळे दिसले की स्वेच्छेने किंवा परेच्छेने प्रतिसाद द्यायचा अन्यथा महिनोनमहिने बुरखा घालायचा याला तरी कुठे आधार आहे?)

माझ्यामताप्रमाणे जग चालत नाही या विशेष माहितीबद्दल आभार! आपण ज्याला 'जग' समजता त्याची मी जाहीर थट्टा करणारा 'बेफिकीर' आहे.

मागे आपल्याला कळवण्यात आले होते की 'बेफिकीरी' सुरू होईल. आपण उगाचच स्वतःवर काहीतरी ओढून घेताय.

ज्ञानेश व इतर वाचक - हा प्रतिसाद गझलेवर नसल्याबद्दल व वैयक्तिक स्वरुपाचा असल्याबद्दल माफ करा व विश्वस्तांना वाटयास त्यांनी रद्द करावा.

तसे बोललो खूप काही परंतु, तरी राहिले खूप बोलायचे
कळाले तुला दु:ख माझे तरीही, कळाले तुला बारकावे कुठे?

तसे बोललो खूप काही परंतु, तरी राहिले खूप बोलायचे
कळाले तुला दु:ख माझे तरीही, कळाले तुला बारकावे कुठे?

अप्रतीम...

वा! फार सुरेख! काय सहजतेने हाताळले आहेत सर्व शेर.
आवडले.

व्वा काय सुरेख गझल आहे. मोट्ठे वृत्त असुनही अगदी सहज झाली आहे..

बारकावे, पुरावे तर अप्रतिमच खूप आवडले...
पाखराने, रुजावे, रडावे पण मस्तच

आवडली गझल .. नेहमीप्रमाणेच !

बसावे जरासे अशी भिंत नाही.. नसे आज रेडा तसा संयमी

हा हा हा हा! लय भारी! बसावे अशी भिंतही नाही अन रेडाही संयमी नाही.

'कळाले तुला बारकावे कुठे' ही एक सॉलीड ओळ सोडली तर या गझलेत मला तरी तुमचा हमखास दिसणारा 'ज्ञानेश टच' जाणवला नाही.

ज्ञानेश खुपच सुंदर गझल आहे ,तुझ्या कडून नेहमी काहीतरी नविन शिकायला भेटते रे ....आभारी आहे तुझी एक नविन गझल दिल्या बद्दल ...

जबरदस्त !

सुंदर गझल ज्ञानेश्....लाजवाब!!! :-)

@ बेफिकीर,
परंतु मधील तू दीर्घ पाहिजे का? की 'रं' मधील अनुस्वाराने तो आपोआप दीर्घ होतो? :-)) मागे कुणीतरी असे म्हणाल्याचे आठवते.

>>> ते मीच म्हटलं होतं. येथे 'परंतु' मधल्या 'तु' नंतर यती येत असल्याने तो दीर्घ असणे आवश्यक आहे. र्‍हस्व लिहिलेला असला तरी उच्चार दीर्घच होणार. पण मी जो नियम सांगितला होता, तो वेगळा आहे. तो येथे 'तु' ला नाही, तर 'र' ला लागू पडतो. कारण ते जोडाक्षरापूर्वीचे अक्षर आहे ('परन्तु' असे लिहिल्यावर हे लक्षात येते).

ह्या संदर्भात एक श्लोक आहे...
सानुस्वारश्चादीर्घश्च विसर्गी च गुरू भवेत|
वर्ण: संयोगपूर्वश्च तथा पादांतगो$पि वा||

म्हणजे
अनुस्वाराने युक्त्.....'गंगा' मधील 'ग'
विसर्गाने युक्त्...'नि:श्रेयस' मधील 'नि'
जोडाक्षरापूर्वीचे अक्षर... 'समस्त' मधील 'म'
आणि ओळीच्या शेवटी येणारे अक्षर
हे जरी लघू असले तरी गुरूच मानावे!

सुमंदारमाला हे भुजंगप्रयाताचेच विस्तारित रूप असावे!

ज्ञानेशसाहेब, अप्रतिम गझल आहे. मला तुमचं संपूर्ण नाव, आणि ईमेल मिळेल का? मी ही गझल लिहुन घेतोय. पुढे-मागे चाल लावली तर कळवेन.

वा ! वा !

सुमंदारमाला सुंदर हाताळले आहे. सर्वच शेरांमधे . अभिनंदन !!!

ज्ञानेश....... खूप सुरेख गझल !
रुतावे कुठे अन दुखावे कुठे...... हाच मिसरा आहे माझ्या गझलेचा :)

खूपच सुरेख गझल !

खुप आवडली. बी रुजावे कुठे आवडले.

कुठे भास होतो तुझ्या कंकणांचा, तुझ्या पैंजणांचे बुलावे कुठे...
हजारो दिशांनी तुझी हाक येते, तुझा हात सोडून जावे कुठे?

क्षणांची, दिशांची, ऋतुंची, हवेची जरी लाख आलीत आमंत्रणे..
नभानेच ज्याचा असे घात केला, अशा पाखराने उडावे कुठे?

तसे बोललो खूप काही परंतु, तरी राहिले खूप बोलायचे
कळाले तुला दु:ख माझे तरीही, कळाले तुला बारकावे कुठे?

ज्ञानेश मस्तच... अप्रतिम