सुकावे लागले

नव्यासाठी नवे काही मला घडवायचे होते
जुन्या पर्वातले संदर्भही बदलायचे होते

तुझ्यासाठीच बहराच्या ऋतूंना रोखले होते,
तुला आनंदयात्रेचे निमंत्रण द्यायचे होते

किती सांभाळल्या होत्या नव्या आशा, नवी स्वप्ने,
मनापासून आयुष्या तुला सजवायचे होते

जिथे माझे कुणी होते, तिथे मन गुंतले नाही
(कधीकाळी मला माझ्यात गुंतुन जायचे होते!)

ऋणातुन मुक्त झाले मी, तरी कळले कधी नाही,
कुणाचे कर्ज होते, जे मला चुकवायचे होते?

जगावेसे जरासे वाटता मरणा तुझी घाई,
सुकावे लागले; जेव्हा मला उमलायचे होते!

गझल: 

प्रतिसाद

.....

जिथे माझे कुणी होते, तिथे मन गुंतले नाही
(कधीकाळी मला माझ्यात गुंतुन जायचे होते!)

वा!!! फार आवडली ही द्विपदी. विशेषतः खालची ओळ. नेहमीप्रमाणे गझल छानच.

मला ही रचना जराशी सरळ अर्थाची किंवा वर्णनात्मक वाटली.

वा:....छान झालीये गझल!

तुझ्यासाठीच बहराच्या ऋतूंना रोखले होते,
तुला आनंदयात्रेचे निमंत्रण द्यायचे होते

किती सांभाळल्या होत्या नव्या आशा, नवी स्वप्ने,
मनापासून आयुष्या तुला सजवायचे होते

जिथे माझे कुणी होते, तिथे मन गुंतले नाही
(कधीकाळी मला माझ्यात गुंतुन जायचे होते!)

सुंदर!

भन्नाट झालीये गझल!

ऋणातुन मुक्त झाले मी, तरी कळले कधी नाही,
कुणाचे कर्ज होते, जे मला चुकवायचे होते?

जगावेसे जरासे वाटता मरणा तुझी घाई,
सुकावे लागले; जेव्हा मला उमलायचे होते!

जगावेसे जरासे वाटता मरणा तुझी घाई,
सुकावे लागले; जेव्हा मला उमलायचे होते!
वा! छान.
यातील पहिली ओळ बेफिकीर यांची आठवण करून देते.

ऋणातुन मुक्त झाले मी, तरी कळले कधी नाही,
कुणाचे कर्ज होते, जे मला चुकवायचे होते?

मला आवडलेला शेर!
[सरळ अर्थाचा कुणाला वाटला तरी...]

अर्चनाताई,

शेर तुम्हाला आवडला इथपर्यंत ठीक आहे. 'इतर कुणाला त्या शेराचा अर्थ व्यवस्थित समजतो की नाही' हे अनावश्यक भाष्य कशाला?

आता सरळ अन वाकडा असे दोन्ही अर्थ सांगा पाहू या शेराचे?

----------------------------------------------

क्रान्तीजी,

जगावेसे जरासे वाटता मरणा तुझी घाई,
सुकावे लागले; जेव्हा मला उमलायचे होते!

हा शेर भारतीय स्त्रीसाठी फार समर्पक!

मस्त गझल. गुंतायचे होते चा शेर फार आवडला.