पूर्वीगत पण आता काही लिहिवत नाही

पूर्वीगत पण आता काही लिहिवत नाही
पूर्वीगत पण त्याचे काही वाटत नाही

खरेच का पण आपण इतके बोथट झालो
खरेच का आवाज आतवर पोचत नाही

बंद घेतली करून माझी सगळी दारे
मलासुद्धा मी हल्ली येथे भेटत नाही

भेटलोच तर हल्ली आता वरवर हसतो
नजरेमध्ये नजर घालुनी बोलत नाही

काय मिळाले इतक्या ह्या तडजोडीनंतर
हिशोब याचा अजून काही लागत नाही

पुढे जायचे आहे येथे प्रत्येकाला
कुणाचसाठी कोणी आता थांबत नाही

असल्या जरि ह्या जखमा तरि ह्या तुझ्याच साऱ्या
उगाच मी त्या अभिमानाने मिरवत नाही

खूप शोधतो रोज तुला उघड्या डोळ्यांनी
मिटून डोळे आत स्वतःच्या शोधत नाही

गझल: 

प्रतिसाद

पूर्वीगत पण आता काही लिहिवत नाही
पूर्वीगत पण त्याचे काही वाटत नाही
हा हा. खरे आहे.

खरेच का पण आपण इतके बोथट झालो
खरेच का आवाज आतवर पोचत नाही

सुंदर.

बंद घेतली करून माझी सगळी दारे
मलासुद्धा मी हल्ली येथे भेटत नाही
चांगला विचार आहे. पण एक सुचवू का?
बंद घेतली करून इतकी सगळी दारे
मलाच मी आताशा येथे भेटत नाही

पुढे जायचे आहे येथे प्रत्येकाला
कुणाचसाठी कोणी आता थांबत नाही
हेही खरेच.

असल्या जरि ह्या जखमा तरि ह्या तुझ्याच साऱ्या
उगाच मी त्या अभिमानाने मिरवत नाही
सुंदर.

खूप शोधतो रोज तुला उघड्या डोळ्यांनी
मिटून डोळे आत स्वतःच्या शोधत नाही

हेही आवडले. (वेगळ्या दृष्टीने मिस्कील..)

आवडली.

पूर्वीगत पण आता काही लिहिवत नाही
पूर्वीगत पण त्याचे काही वाटत नाही

खरेच का पण आपण इतके बोथट झालो
खरेच का आवाज आतवर पोचत नाही

सुंदर !

गझल आवडली.

(मलासुद्धा मी हल्ली येथे भेटत नाही - या ओळीत एक मात्रा जास्त आहे की काय असे वाटले.)

दुसरा शेर अप्रतिम आहे. तसेच, नजरेमध्ये नजर घालुनी हाही उत्तम!

सुरेख मूडची गझल अनिरुद्ध!

धन्यवाद!