पोएटिक लिबर्टी

आता पुढील शेरही छानच आहेत ....कल्पना अत्युत्तम...! पण त्यांत तुम्ही 
poetic liberty  घेतली आहे....(अनंत ढवळे यांच्याप्रमाणे ! )....ती घेतली
नसती तर सोन्याला सुगंध नसता का आला...?

शिस्त ही मद्यालयाची ...
थेंबही वाटून घ्यावे ! (घ्यावेत )

कोंडलेले सर्व कैदी ...
पापण्यांनी सोडवावे ! (सोडवावेत)  

(आसवांसाठीचं असं अफलातून प्रतीक  (पक्शी : कैदी ) मी आजवर वाचलं नव्हतं...सलाम !)

पोपडे ह्या काळजाचे
वेदनांनी सारवावे (सारवावेत)

(वेगळी, सर्वस्वी नवीन कल्पना...छानच !)

अलीकडे, मला वाटतं, हा  (poetic liberty)  पायंडाच पडत चालला
आहे...गझलेतील ही काही फार मोठी त्रुटी नव्हे; पण शेवती त्रुटीच..!
तुमच्यासारख्या (आणि ढवळे यांच्यासारख्याही...!) गझलकारांनी अशा त्रुटी निर्धारपूर्वक टाळायला हव्यात, असे मी आग्रहपूर्वक
सांगीन...! या त्रुटीमुळे गझलेतील मंत्राला (विचार, कल्पना आदी..) बाधा
पोचत नाही; पण तंत्राला जरूर पोचते !  (आपली रचना गोटीबंद असायला हवी
ना...? ) मंत्राबरोबरच गझलेचे तंत्र आपल्यासारख्यांनीच नको का सांभाळायला....?
सांगा बरं...? अनेकदा काय होतं....विचार, कल्पनांचा आतला रेटाच इतका
जबरदस्त असतो की, त्या रेट्यापुढं अशा त्रुटी राहून जातात...पण आपण
डोळ्यांत तेल घालायलाच हवं...!

बराय...!

पुन्हा एकदा अभिनंदन...! पुढच्या जबरदस्त गझलेची वाट पाहत आहे...!

 

 

गझलचर्चा: 

प्रतिसाद

जावे/जावेत बद्दल मात्र तुमचा मुद्द पटला नाही.

कोंडलेले सर्व कैदी  (तुमच्या) पापण्यांनी सोडवावे
कोंडलेला एक कैदी (तुमच्या) पापण्यांनी सोडवावा.
तसेच
पोपडे ह्या काळजाचे वेदनांनी ( वेदना कर्ता असल्याप्रमाणे) सारवावेत
(तुम्ही) पोपडे ह्या काळजाचे वेदनांनी ( वेदना वापरून) सारवावेत

हेच योग्य वाटते. प्रदीप कुलकर्णी यांचे मत पटते.
बाकी सूट किती, कशी घ्यावी ह्या प्रश्नाबाबत प्रत्येकाची मते वेगवेगळी असू शकतात.

लेखनाच्या किंवा कल्पनेच्या विचारात अशी त्रुटी राहू नये, त्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी हे मान्य . पण माझा मुद्दा थोडा वेग़ळा आहे. 
याला पोएटिक लिबर्र्टि असे म्हणायचे की बोली भाषेचा  वापर? मी कित्येकदा असे शेवटचे 'त' सोडून लोकांना बोलताना ऐकले आहे.

करतो आहे- करतोय, वाटतय, हे सर्व पण मग चू़क का?
मराठी व्याकरणाचे नियम सैल करुन गझल लेखन करता येणार नाही का?(नियम धाब्यावर बसवणे मला अपेक्षित नाही)
कित्येक वेळा आपण वाचतो त्या कल्पना चटकन तार्किकदृष्ट्या पटत नाहीत किंवा हे कसे शक्य आहे असे वाटते. त्याच कल्पना नाविन्य म्हणून आपण स्वीकारतो असे नंतर आढळते. (इथे उदाहरणे दिली नाहीत, पण हवी असल्यास व्यनितून देईन)ही सुद्धा पोएटिक लिबर्टि आहे का?
सोनाली

 जे बोलायचे आहे, सांगायचे आहे ते महत्त्वाचे. पण नियम अपवादानेच तोडावेत.

कळप ह्या गझलेत अन्त्ययमकात शेवटी 'वे' आहे. मग इथे बहुवचने नियम न तोडता कशी वापरावीत. आणि चांगल्या कल्पनाही निसटून जायला नकोत, हे देखील बघायचे आहे. 
तसेच जो नियम उत्तम जाणतो तो अधिकारपूर्वक नियम तोडू शकतो, हेही तितकेच खरे.  मीरच्या एका शेराचे जाणकार नेहमीच उदाहरण देतात. तो शेर असा ---
सारे आलम पे हूं मैं छाया हुआ
मुस्तनद है मेरा फर्माया हुआ
तर उर्दूत फर्माना हे क्रियापद कधी प्रथमपुरुषी एकवचनी कर्त्यासोबत वापरत नाही. म्हणजे 'मैं फर्माता´म्हणणे चुकीचे. शिष्टाचाराला सोडून आहे.  'आप फर्माते हो' और 'मैं सुनता हूं'.  पण मीर उस्ताद होतात म्हणून त्याने जाणूनबुजून 'फरमाया' वापरले आहे.  कारण त्याला त्या शेरात मी म्हणतो ते योग्यच असते, मुस्तनद असते हे ठासून, ´ठसनके साथ' (सूक्ष्म उद्धटपणेच म्हणा ना) सांगायचे आहे. म्हणून 'मैंने फरमाया हुआ' त्या ओळीतआहे.(शेरात चुका आढळल्यास इतर जाणकारांनी दूर कराव्यात. तसेच कविवर्य यादगार हे मीरचे  मराठी अवतार आहेत, असा निष्कर्ष कोणीही काढू नये ही विनंती. )

पोएटिकल लिबर्टी  ही एक प्रकारची ऐबच असते पण ती  न जाणवण्यासाठी किंवा फिकी करण्यासाठी खयाल उच्च असणं गरजेचं आहे.
शब्दांत विचारगुरुत्व असले, म्हणजेच खयाल उच्च असला तर, रचनेचा ओबडधोबडपणा चालून जातो. पण याचा अर्थ कवींनी, त्यातही नवोदितांनी,   असल्या वक्तव्याचे  दाखले देऊन ऊठसूट सूट घेणे चुकीचे. 

पोएटिक लिबर्टी कोणी घ्यावी हा फार दूरचा मुद्दा आहे, असल्या वक्तव्याचे दाखलेही द्यायचे नाहीत, एखादी गझल वाचल्यावर ती निर्दोष आहे किंवा नाही  हे ठरवण्याकरता एका वाचकाला सुद्धा अशी जाण असणे आवश्यक आहे.  माझ मतच द्यायच झाल तर गझलकार जेवढा ताकदीचे खयाल लिहिणारा आणि जाणकार त्याने तर अशी सूट घेऊच नये:) 

स्वातंत्र्य कितपत घ्यावे हे नक्की कसे ठरवावे? घेऊच नये असे टोकाचे मत नाही. मला एखादी  अशी स्वातंत्र्य घेतलेली ओळ किंवा शब्द वाचताना खटकला तर मला ते रुचणार नाही. पण तेच दुसर्‍या कोणाला खटकेलच असे नाही.  
लघु-गुरू चे मुद्दे हे गेयता , लय या संबंधात येतात. त्याबाबत गेयतेत फरक पडत नसेल तर त्याला तडजोड म्हणू नये त्याचसोबत वापरलेल्या  वृत्ताला मात्र अक्षरगणवृत्त म्हणू नये.
"तू फुलायला लागलीस" आणि "ती फुलायला लागली" अशी सरळसोट वाक्यरचना असताना "तू फुलायला लागली" असा बदल गेयतेसाठी अथवा मात्रांसाठी करणे मात्र तडजोड ठरेल असे मला वाटते.

मी चित्त यांना उदाहरणादाखल म्हटले होते
तरुण आहे रात्र अजुनि राजसा निजलास का रे?
ह्या ओळीत निजलास चे निजला केले तर ते चटकन कळेल आणि खटकेल.
त्यावर चित्त यांनीही देणार्‍याने देत जावे ..... हात घ्यावे(त) चे उदा. दिले होते जे मला पटले.
त्यामुळे अशी तडजोड करणे अथवा खटकणे हा मुद्दा व्यक्तिसापेक्ष आहे असे वाटते आहे.

गझल आधी कानांनी वाचावी. कानांना जे शब्द, शब्दप्रयोग इत्यादी लगेच खटकतात त्यावर लगेच पुनर्विचार करावा, असे मला वाटते. व्याकरणाआधी एखादी ओळ, शब्द वगैरे कानांना खटकतात का, हे बघणे महत्त्वाचे. 
बाकी ओंकार म्हणतो तसे ही गोष्ट व्यक्तिसापेक्ष आहे.

हा  (poetic liberty)  पायंडाच पडत चालला आहे...गझलेतील ही काही फार मोठी त्रुटी नव्हे; पण शेवटी त्रुटीच..! तुमच्यासारख्या (आणि ढवळे यांच्यासारख्याही...!) गझलकारांनी अशा त्रुटी निर्धारपूर्वक टाळायला हव्यात, असे मी आग्रहपूर्वक सांगीन...! या त्रुटीमुळे गझलेतील मंत्राला (विचार, कल्पना आदी..) बाधा पोचत नाही; पण तंत्राला जरूर पोचते ! 
तेव्हा त्रुटी डोळ्यात तेल घालून मुद्दामच सोडून दिलेली आहे असं म्हटलं तर जास्त उत्तम. किंवा माझ्या भाषेत - काही वेळा त्रुटी सोडण्यासाठीही डोळ्यात तेल घालावं लागतं .
तसेच जो नियम उत्तम जाणतो तो अधिकारपूर्वक नियम तोडू शकतो, हेही तितकेच खरे.
उर्दू ही जशी बोलली जाते तशीच लिहिली जाते व पोएटिकल लिबर्टी देखील उर्दूत सर्रास वापरली जाते. हे उर्दूत मोठया प्रमाणात ग़ज़ल लेखन होण्या मागचं मोठ्ठं कारण आहे.
स्वतःस एक न्याय व इतरांस वेगळा हे काही पटत नाही, बुवा.
गझलेचे नियम आणि व्याकरणाचे नियम यांच्यात गल्लत होते आहे काय? गझल ही गेय कविता असल्यामुळे उर्दु काय किंवा मराठी काय - कोणत्याही भाषेत ती बोलीच नव्हे तर त्याहीपल्याड जाणार.
 "तू पायजम्याचे/ विजारीचे सेवन केले आहेस" असे लिखित अथवा बोली भाषेत येणार नाही. पण गेय काव्यात - "डौरही मौन सेवी" चा अर्थ स्पष्ट होतो.  हे शब्दांचे झाले - तसेच व्याकरणाचेही!  

A poem, as a manifestation of language and thus essentially dialogue, can be a message in a bottle, sent out in the 'not always greatly hopeful— belief that somewhere and sometime it could wash up on land, on heartland perhaps. Poems in this sense, too, are under way: they are making toward something.
The lyric poem walks the line between speaking and singing. (It also walks the line between the conventions of poetry and the conventions of grammar.)
- Edward Hirsch
मराठी  गेय कवितेबाबत आणि विशेषतः मराठी गझलेबाबतसुध्दा असेच म्हणायला काय हरकत आहे? जोवर गझल गझलेचे नियम पाळते आणि कविताही असते तोवर तिने व्याकरणाचे नियम पाळ्लेच पाहिजेत असा अट्टाहास नसावा असे माझे मत आहे.
(अशा रुक्ष चर्चेपेक्षा एखाद्या गझलेतली सौन्दर्यस्थळे टिपण्यातली मजा कांही औरच!)
"Poetic Liberty" हे शब्द व्याकरणाच्या जोखडातून कवीची मुक्तता या अर्थी घेतले तर तसे स्वातंत्र्य घेणे हे अयोग्य आहे असे मला वाटत नाही.
तज्ञ लोकांनी आपली मते मांडली आहेतच.

The lyric poem walks the line between speaking and singing. (It also walks the line between the conventions of poetry and the conventions of grammar.)
माझ्या मते अती व्याकरणशरणता नको आणि अती सूट घेणेही नको.
फार चांगला प्रतिसाद आणि संदर्भ. धन्यवाद विसुनाना.

असे पहा पद्याची स्वतंत्र भाषा असते .शिवाय अमुक एक भाषा ही प्रमाणभाषा आहे , असे छातीठोकपणे म्हणता येत नाही.

श्री. अनंतरावांशी सहमत. गेय काव्यात विशेषकरून गझलेत शायरावर असलेली विविध बंधने आणि दडपणे यामुळे पोएटिक लिबर्टी घेतली तर त्या बद्दल आक्षेपार्ह काही नाही.
अनेक नामवंत कविंनी ती घेतलेली आहे. जेथे अपरिहार्य आहे तेथे ती जरूर घ्यावी पण त्या लिबर्टीचा निकष "अपरिहार्यता" हाच असावा.
आपला,
(स्पष्टवक्ता) धोंडोपंत
 
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

वरील सर्व चर्चेतून एक विशिष्ट 'paradox' अधोरेखित होतो आहे असे वाटते. 'नियम मोडण्याचा अधिकार येण्यासाठी त्याच नियमांवर सिद्ध पकड हवी' - मग जर अशी पकड आहे तर नियम तोडण्याची गरजच काय? 'विचार सशक्त असेल तर अपरिहार्यता म्हणून सूट घ्यायला हरकत नाही' - जर खयाल इतकाच सशक्त आणि मूलगामी आहे तर तो 'गझले'त सांगितला काय किंवा इतर कुठल्याही साहित्य-प्रकारात सांगितला काय - फरक काय पडतो? सूट घेण्यामागे मूळ कारण ती रचना गझलेच्या फॉर्म मध्ये बसवणं हेच असते ना? या फॉर्मने माझ्या 'बर्‍यापैकी बर्‍या' असलेल्या खयालाला चांगले कोंदण मिळेल हा विचार प्रत्येक कवीचा असतोच ना? मीटर पाळण्यासाठी ह्रस्व/दीर्घ तडजोड ही तडजोडच असते. अशा वेळी कवीने - 'प्रयत्न केला पण जमले नाही' अशी प्रामाणिक भूमिका बाळगावी असे मला वाटते. माणूस प्रयत्न करत राहतो, दरवेळी जमतेच असे नाही. तडजोडी या आयुष्यात - अन कवितेतही - कराव्या लागतात. But these should be acknowledged as such and not justified.
शेवटी - गझलेचे नियम पाळणे हे व्याकरणाचे नियम पाळण्यापेक्षा जास्त जरुरीचे का आहे हे कोणी समजाऊन देईल का?
-- पुलस्ति.

गझलेचे व्याकरण, नियम वेगळे आणि भाषेचे व्याकरण वेगळे.  अलामतीच्या बाबतीत एक वेळ थोडी सूट चालूनही जाईल. पण सबंध गझल एकाच वृत्तात हवी, रदीफ आणि काफियांचे बंधन शेवटपर्यंत पाळायला हवे, असे  वाटते. गझलेचे व्याकरण, नियम पाळले नाही तर गझल गझल राहाणार नाही. गझलेचा गोटीबंद फॉर्म हाच गझलेची ताकद आहे. म्हणूनच गझलेचे नियम पाळणे व्याकरणाचे नियम पाळण्यापेक्षा जास्त गरजेचे आहे. त्यात फारसे स्वातंत्र्य घेऊ नयेच असे वाटते.

राहिली गोष्ट, स्वर यमकांची किंवा सौती काफियांची. मराठी गझल केवळ ३०-३५ वर्षांची आहे. ती रुळण्यापूर्वीच अशा स्वर काफिये रूढ झाल्यास गझल लेखनात सैलपणा येईल आणि ते मराठी गझलेसाठी चांगले नाही असे भटांना वाटत होते. तंत्रावर हुकमत, लिखाणात सफाई येण्यापूर्वी सौती काफिये वापरू नयेत असेच एकूण जाणकारांचे मत आहे.