शेवट

हात मी तुझा हाती घ्यावा..जाता जाता
जन्म नवा तेव्हाच मिळावा..जाता जाता

सोबत घेतो तुझी नि माझी पत्रे काही
जरा तुझा सहवास घडावा..जाता जाता

एकवारही मागे तुज बघता ना यावे?
इतका का दुस्वास करावा..जाता जाता?

चुकून होते स्वप्नांमध्ये भेट आपली
मागमूस याचा न उरावा..जाता जाता

दु:ख वाढले नशिबाने, भरपेट जेवलो
मुखशुद्धीला हर्ष मिळावा..जाता जाता

मूक जीवनाशी ना माझे पटले क्षणभर
बोलघेवडा शेवट व्हावा..जाता जाता

गझल: 

प्रतिसाद

हात मी तुझा हाती घ्यावा..जाता जाता
जन्म नवा तेव्हाच मिळावा..जाता जाता

सोबत घेतो तुझी नि माझी पत्रे काही
जरा तुझा सहवास घडावा..जाता जाता

हे दोन खूप छान झालेत! विशेषतः दुसरा.

तिसरा शेर जरासा विसंगत वाटला, एकतर 'ना' हा शब्द;
पण त्याहीपेक्षा 'दुस्वास' हा शब्द- अर्थासाठी.
दुस्वास करण्यात मत्सराचा भाव असतो, तो या ठिकाणी योग्य नाही असे वाटते.

बोलघेवडा शेवट व्हावा..जाता जाता

ही ओळ फारच आवडली. गझल आवडली.