पाहतो आहे पळाया दूर दुनियेहून मी

पाहतो आहे पळाया दूर दुनियेहून मी
फेकते जाळे असे ती... जातसे अडकून मी!

का तरीही जवळ येते, पाहते लावू लळा?
वागलो आहे तिच्याशी नेहमी फटकून मी

त्रुप्त ना कोणीच झाले उत्तरांनी माझिया..
शेवटी सारेच आलो प्रश्न फेटाळून मी!

ऐनवेळी "वास येतो" ना म्हणावे मज कुणी
ह्याचसाठी ठेवतो नित तोंड खंगाळून मी!

चमकु दे माझा जरा तारा पुन्हा तो एकदा..
सूर्य हा मग येथला जाईन नाकारून मी!

जीवनाला रेखणारा व्यास मी, वाल्मीकि मी
रामक्रुष्णांनासुधा जाईन ओलांडून मी!

जिंकण्याचा त्वेष आहे तेवतो अजुनी मनी
हा पहा आलो पुरा 'मधुघट' मुखी रिचवून मी!

गझल: 

प्रतिसाद

पहिले दोन्ही शेर आवडले.

जीवनाला रेखणारा व्यास मी, मी वाल्मिकी.. ?

वा:!
पहिले तीनही शेर छान झालेत,
ते सुचलेत असं वाटतं, पुढचे रचलेत असं वाटतं.
पण तरीही गझल मस्त आहे.

@ ज्ञानेश
मूळ शब्द हा 'वाल्मीकि' असाच असल्यामुळे गझलेतील ओळ योग्य आहे,
पण आपण सुचवलेली ओळ जास्त चांगली आणि ओघवती वाटतेय, शिवाय मराठीच्या नियामानुसार
'वाल्मिकी' हा शब्दही योग्य आहे.

मतला दाग देहलवी शैलीचा तर दुसरा शेर भाऊसाहेब पाटणकर शैलीचा वाटला. मतला आवडला. चवथा शेर हझलेचा वाटला. (खंगाळून). 'सुधा' लिहिताना 'सुद्धा' असे लिहिले जाते पण बोलताना 'सुधा' असे बोलले जाते. (काहीसे 'सिंह' सारखे)!

पळाया, जातसे, नित, माझिया, लावते पाहू - असे शब्दप्रयोग किंचित पारंपारिक मराठी कवितेसारखे ( ना. घ. वगैरे) वाटले.

गझलेचा आशय व मांडणी आवडली.

मक्ता आपरण्याबद्दल धन्यवाद! आम्हाला एक साथीदार मिळाला. :-))

मक्त्यातील 'मधुघट' या शब्दाचा अर्थ कृपया स्पष्ट करावात. मला 'मधाचा घडा' असा वाटत आहे.

-'बेफिकीर'!

का तरीही जवळ येते, पाहते लावू लळा?
वागलो आहे तिच्याशी नेहमी फटकून मी

वा! गझल एकंदर छान.

जीवनाला रेखणारा वाल्मीकि मी, व्यास मी!
असे केल्यास दोन 'मी मी' होणार नाही.

सर्वांचे मनापासून धन्यवाद......

@ ज्ञानेश आणि चित्तजी,
जीवनाला रेखणारा वाल्मिकी मी, व्यास मी!
हेच जास्त योग्य वाटतंय्....कारण काळानुसार पाहता वाल्मिकी आधीचा आहे. तसेच पुढच्या ओळीत राम आधी असल्याने हाच अनुक्रम योग्य वाटतो. परंतु खूप विचार करूनही वाल्मिकी आधी कसा बसवावा हे कळत नव्हते...ते चित्तजी, आपल्या प्रतिसादामुळे लक्षात आले.

@ फाटकजी,
पहिले ३ शेर खरेच अतिशय उत्स्फूर्त आहेत.

@बेफिकिर...
'मधुघट' म्हणजे मधाचा नसून मद्याचा घडा आहे. :-)
पूर्वी युद्धामध्ये उन्माद संचारावा ह्यासाठी योद्धे मधू प्राशन करत असत. महाभारतामध्ये भीमानेही असे अनेक घडे रिचवल्याचे उल्लेख येतात.
अन मीही त्याच अर्थाने शेरामध्ये 'मधुघट' वापरला आहे.
हरिवंशराय बच्चन ह्यांच्या मधुशालेचा माझ्यावर खूप प्रभाव आहे....त्याच धर्तीवर मीही काही मधुशाला रचल्या आहेत्.....आणि त्यातूनच 'मधुघट' हे टोपणनावही घेतले आहे!

व्वा मस्तच... पहिले तीन आणि सूर्य नाकारून आवडले

शेवटी सारेच आलो प्रश्न फेटाळून मी!
छान !

का तरीही जवळ येते, पाहते लावू लळा?
वागलो आहे तिच्याशी नेहमी फटकून मी
(मी प्रथम वाचताना चुकून 'जिच्याशी' असे वाचले होते...) दोन्ही छान.
त्रुप्त ना कोणीच झाले उत्तरांनी माझिया..
शेवटी सारेच आलो प्रश्न फेटाळून मी!

वा!

जीवनाला रेखणारा व्यास मी, वाल्मीकि मी
यात, चित्तरंजन यांनी सुचविलेला बदल...
जीवनाला रेखणारा वाल्मीकि मी, व्यास मी
चांगला आहे.
त्यांच्यामताप्रमाणे तंत्राच्या दृष्टीने 'मी मी' असे होणार नाही आणि आपल्या मताप्रमाणे काळाप्रमाणे योग्य. मलाही योग्य वाटले.

'वास येतो' म्हणजे काय?
क्रु असा का येतो?

@अनंतजी, धन्यवाद!

@ अजयजी, धन्यवाद.
पण आपले 'जिच्याशी' आणि 'तिच्याशी' हे 'दोन्ही छान' म्हणणे तितकेसे पटले नाही. कारण 'जिच्याशी' म्हटले तर विनाकारण त्या व्यक्तीला महत्त्व येते असे वाटते. पण 'तिच्याशी' म्हटल्यामुळे वृत्तीला महत्त्व आले आहे. अर्थात ह्यावर अधिक चर्चा होणे आवडेल.

@अर्चनाजी,
आपल्याला इतका बाळबोध प्रश्न का पडावा हा मला पडलेला प्र्श्न आहे. पण असो...
तोंडाला येणारा वास हा दोन प्रकारचा असतो....

१.. कांदा-लसूण इ. उग्र पदार्थ खाल्ल्यावर येणारा वास हा पहिला प्रकार. हा वास आपण बोलायला तोंड उघडले, की समोरच्याला नको जीव करून सोडतो. म्हणून कवी म्हणतोय की मी नेहमी तोंड खंगाळून ठेवतो (पण असे पदार्थ खायचे सोडत नाही).
त्यातून कवीची प्रेयसीसुद्धा लहरी आहे. जेव्हा त्याला चुंबन हवे असते, नेमकी तेव्हाच तोंड फिरवून बसते! अन आज काही ही आपल्याला जवळ येऊ देणार नाही अशी त्याची खात्री असते, तेव्हाच नेमकी अनपेक्षितपणे कडकडून चुंबन घेते. अशा 'ऐनवेळी' गडबड नको म्हणून कवी म्हणतो की मी नेहमीच तोंड खंगाळून ठेवतो. (अनुभवातून आलेलं शहाणपण्...दुसरं काय?)

अर्थात हा झाला ह्या शेराचा वाच्यार्थ!

मला अपेक्षित व्यंग्यार्थ पुढीलप्रमाणे आहे....

२..माणसाच्या बोलण्याला येणारा वास! समोरची व्यक्ती आपल्या पुढे चालली की अनेकांच्या बोलण्याला हा कुजकट वास येऊ लागतो! कवी म्हणतोय की मी कुणी संत नाही. षड्विकारांनी मीही व्याप्त आहेच. त्यामुळे माझ्याही मनात अशा भावना निर्माण होतातच.
पण त्यांचे बाहेर प्रदर्शन होऊ नये ह्यासाठी मी शब्द मात्र नीट खंगाळूनच वापरतो!

मला वाटतं हा अर्थ शेरातून पुरेसा प्रकट होतोय. आणि तरीही आपल्याला हा प्रश्न का पडावा आणि बेफिकिरलाही हा हझलेतला शेर का वाटावा हे कोडे मला पडले आहे.

बाय द वे.....

'कृ' असाही लिहिता येतो! :-)

वा!
का तरीही जवळ येते, पाहते लावू लळा?
हा शेर तर फार आवडला

चमकु दे माझा जरा तारा पुन्हा तो एकदा..
सूर्य हा मग येथला जाईन नाकारून मी!

यातील जिद्द आवडली.

बेफिकिरलाही हा हझलेतला शेर का वाटावा हे कोडे मला पडले आहे.

हा शेर हझलेतला नसेल तर गझलेतला कसा हे कृपया समजावून सांगावेत. (वाच्यार्थ व व्यंग्यार्थ या दृष्टीने नाही, तर अभिव्यक्ती या दृष्टीने)

अर्थ या दृष्टीने म्हणाल तर आपण सांगीतलेला अर्थ मला जाणवला नाही हा बहुधा माझा प्रॉब्लेम असावा.

धन्यवाद!

बेफिकीरजी,

मी सांगितलेले अर्थ आपल्याला जाणवले नाहीत हा आपला प्रॉब्लेम नसून माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.

कारण ह्याचा अर्थ असा, की त्या शेरातून मलाही माहित नसलेला आणखी एक अर्थ प्रतिपादित होतोय, जो आपल्याला जाणवलाय! :-)
आता आधी तो अर्थ सांगा...मग आपण गझल-हझल चर्चा करू.

चला! चर्चा चांगली होत आहे.

मधुघट,

ऐनवेळी "वास येतो" ना म्हणावे मज कुणी
ह्याचसाठी ठेवतो नित तोंड खंगाळून मी!

मला यात आपण प्रथम सांगीतलेलाच अर्थ जाणवला आहे. दुसरा अर्थ जाणवला नाही असे म्हणायचे आहे.

'बोलण्याला येणारा कुजकट वास' हा अर्थ मला जाणवला नाही. याचा अर्थ मी शेरात खोल शिरलो नसणार असा मी घेतो.

धन्यवाद!

का तरीही जवळ येते, पाहते लावू लळा?
वागलो आहे तिच्याशी नेहमी फटकून मी
या ओळींविषयी....
का तरीही जवळ येते, पाहते लावू लळा? --- कोण?
वागलो आहे तिच्याशी नेहमी फटकून मी --- यातीलही ती कोण?
दोन ओळींचा नेमका संबंध येतो आहे का हे तपासावे. दोनही ओळी केवळ दोन विधाने आहेत. खालच्या ओळीतीत 'ती' म्हणजेच वरच्या ओळीतील 'ती' असे गृहित धरले तर चांगले वाटते. पण उपाय असताना का सोडा?
अर्थात, मी मद्य घेत नसल्याने नुसता 'सोडा'च घेतो :)

@बेफिकीरजी,
एका मोठ्या माणसाने [अर्थात कवीनेच, समीक्षकाने नव्हे! :-))] म्हटलंय....
'कविता लिहून झाली की कवी मरतो!'
हे वाक्य एकदा समजून घेतलं की कोणीही कवी मोकळेपणाने चर्चा करू शकतो. कारण आपल्या कवितेतही तो अडकून पडत नाही. अन टीका झाली तरीही तो आपला व्यक्तिगत अभिमान मध्ये आणत नाही. :-)

असो....

ह्या शेराचा व्यंग्यार्थ आपण सुरुवातीला ध्यानात घेतला नसेलही कदाचित, पण असाही अर्थ आहे हे आता तुम्हाला मान्य असावं असं तुमच्या प्रतिसादावरून जाणवतंय.
आता राहिला प्रश्न हा शेर गझलेतला आहे की हझलेतला?

इथे माझं वैयक्तिक अज्ञान आहे, की मला हझलेचा आकृतिबंध काय असावा ह्याचे नियम माहित नाहीत. केवळ वाचनात आलेल्या हझलांमधून असं जाणवलंय की समाजातल्या व्यंगांवर, विसंगतीवर मार्मिक उपरोधपूर्ण टीकाटिप्पणी हझलेत असते. अन जर आशयच औपरोधिक असेल, तर बाह्य शब्दरचना विनोदी असण्याची आवश्यकताच नाही.
आता वरील शेरामध्ये असा आशय नाही हे सिद्धच आहे. जरी वाच्य आणि व्यंग्य असे दोन अर्थ ह्यातून निघत असले तरीही कवीचा काही त्या मानवी वृत्तीवर टीकाटिप्पणी करण्याचा उद्देश नाही. त्यामुळे आशयदृष्ट्या हा हझलेतला शेर होऊशकत नाही (असे माझे अजून तरी मत आहे).

राहता राहिला शब्दरचनेचा भाग!
'वास येतो' आणि 'खंगाळून' हे दोन्ही शब्द गझलेमध्ये फारसे वापरले जात नाहीत हे खरे. आणि त्यामुळे अचानक हे शब्द समोर आल्यावर ते विनोदी वाटणे स्वाभाविक आहे (असं मलाही आता वाटायला लागलंय.) पण ते शेराची चिकित्सा करताना कितपत योग्य आहे हा आता प्रश्न आहे. (आपल्याला बहुतेक अनंत ढवळेंसारख्या डॉक्टरची गरज पडणार आता हा प्रश्न सोडवायला!)

@ अजयजी,

हाय कम्ब़ख्त! तूने कभी पी ही नही...... :-))
आता जरा नुसताच सोडा पिऊन ढेकर देणं सोडा....एवढंही वाईट नसतं हो मद्य!
बसू केव्हातरी........अर्थात आपली इच्छा असेल तरंच हो! :-)

अन तुम्हाला जे संबंध नाही असं वाटतंय ना....तेही काही बरोबर नाही बघा...अहो उलट पहिल्या ओळीचा प्रभावी समारोप होतोय दुसर्‍या ओळीत! जरा आता ह्या दृष्टीने विचार करून बघा! पटेल माझं म्हणणं.....
नाहीतर आहेच्.....बसू तेव्हा बोलू सविस्तर! अगदीच तुम्हाला नको असेल तर तुम्ही सोडा घ्या, आम्ही घेऊ आमचं!!!
अन तेही नको असेल तर मग इथेच मारू गप्पा! ह्या वेबसाईटचे अनंत उपकार आहेतच आपल्यावर!!! :-)

मधुघट,
हाय कम्ब़ख्त! तूने कभी पी ही नही...... :-))
आता जरा नुसताच सोडा पिऊन ढेकर देणं सोडा....एवढंही वाईट नसतं हो मद्य!
खरे तर तुमच्या या वरील दोनही ओळी विनोदच आहेत. (माझ्याबद्दल फारसे माहित नसल्यामुळे असेल म्हणा...:) )
आणि.....
प्रभावी समारोप वगैरे दुसर्‍याने म्हणायचे असते, स्वतःने नाही :)