ठराव नक्की मिळेल अंतर

सुखास बोलू नका भयंकर
जमेल तैसे करा स्वयंवर

तुझ्यासवे जे सदा निघाले
करू नको या मनास बेघर

तया जनाची न ती मनाची
निलाजर्‍यांचा बने सिकंदर

उगाच तुमचे हिशेब झाले
कुठे तुम्ही अन कुठे कलंदर

हृदय तुझे पाहिले मघा मी
उगाच ओढू नकोस चादर

चरण कुणाचे कशा धरावे
कुणीच येथे नसे निरंतर

कुणास आत्ता कुणास नंतर
ठराव नक्की मिळेल अंतर

प्रतिसाद



तुझ्यासवे जे सदा निघाले
करू नको या मनास बेघर

एकदम फडाड :)



चरण कुणाचे कशा धरावे
कुणीच येथे नसे निरंतर

वा! सही गझल!



रात्रीचा प्रतिसाद

सुखास बोलू नका भयंकर
जमेल तैसे करा स्वयंवर - हे कळले नाही.

तुझ्यासवे जे सदा निघाले
करू नको या मनास बेघर - 'जे' चे 'ते' किंवा 'या' चे 'त्या' केले तर 'चालेल' का?

तया जनाची न ती मनाची
निलाजर्‍यांचा बने सिकंदर - छान! (तया = ??)

उगाच तुमचे हिशेब झाले
कुठे तुम्ही अन कुठे कलंदर - व्वा!

हृदय तुझे पाहिले मघा मी
उगाच ओढू नकोस चादर - (अभिनंदन, 'हृदय' पाहण्यासाठी)

चरण कुणाचे कशा धरावे
कुणीच येथे नसे निरंतर - खरे आहे!

कुणास आत्ता कुणास नंतर
ठराव नक्की मिळेल अंतर - हा मला सगळ्यात आवडलेला शेर!



अरे,
मी पाहिलेच नाही वाटते.
धन्यवाद!

सुखास बोलू नका भयंकर
जमेल तैसे करा स्वयंवर - हे कळले नाही.
स्वयंवर करणे हे भयंकर नाही.

तुझ्यासवे जे सदा निघाले
करू नको या मनास बेघर - 'जे' चे 'ते' किंवा 'या' चे 'त्या' केले तर 'चालेल' का?
'या' मध्ये थोडी जवळीक वाटते असे मला वाटले. 'त्या' मध्ये तटस्थता येईल कदाचित.

तया जनाची न ती मनाची
निलाजर्‍यांचा बने सिकंदर - छान! (तया = ??)
तया = त्याला



स्वयंवर हा शब्द केवळ विवाह या अर्थाने वापरला आहे की स्वयंवर (म्हणजे स्वतःचा वर स्वतःच ठरविणे) या अर्थाने?
शेवटच्य दोन ओळी छान्च.



अर्चना ताई
स्वयंवर हा शब्द दोनही अर्थाने वापरला आहे.
शेवटच्या दोन ओळी आवडल्याबद्दल धन्य्वाद..:)



हृदय तुझे पाहिले मघा मी
उगाच ओढू नकोस चादर

हृदय तुझेमी मघा पाहिले
उगाच ओढू नकोस चादर

असे केल्यास?

शेवटचे दोन शेर विशेष आवडले.

डॉ.कैलास गायकवाड