मागचे जाती पुढे

मागचे जाती पुढे मग खालचे येती वरी
आपली कोणीच आता ओळखे ना पायरी

झुंज होते वादळाशी पण कुठे ना बातमी
बातमी आता पर्‍यांची येतसे घरच्याघरी

मी भरावे कैक खड्डे रोज प्रेमाने तरी
मित्र ना कोणीच झाला वाढते आहे दरी

वेदना होत्या जिवाला आज इतक्या चिकटुनी
कोणते भय घेतले त्यांनी जपायाला हरी

भेटल्या होत्या नव्याने ज्या खुणा होत्या जुन्या
वाढते आहेच शंका ही बरी की ती बरी

भेटली रंगात नवख्या आज माझी प्रेयसी
बोलली सारे जुनी ती कौतुके केली जरी

गझल: 

प्रतिसाद

समीक्षायुक्त लिखाण करायला अत्यंत क्लिष्ट व बिकट अशी एक रचना आम्ही आज घेत आहोत. असे आव्हान पुढे ठेवल्याबद्दल कवी अजय यांचे आभार!

मागचे जाती पुढे मग खालचे येती वरी
आपली कोणीच आता ओळखे ना पायरी

मागचे पुढे गेले की खालचे वर येतात! हृदय हे ओठांच्या साधारण सात इंच खाली असते. तोंडातून काही विचार / शेर / मिसरे / गझला बाहेर पडल्या (म्हणजे पुढे गेल्या ) की घशात ट्रॅफिकमधे अडकलेले विचार / शेर / मिसरे / गझला पुढे येतात. तसे झाले की हृदयात खाली दबून राहिलेले विचार / शेर / मिसरे / गझला घशात येऊन बसतात. एक अमर्याद काळ लाभलेली अशी ही काव्यप्रक्रिया आहे. कवीचे मन अनुभुती घेत असतानाच त्यांच्यावर पद्यात्मक शाब्दिक व रुपकात्मक सोपस्कार होत त्या अनुभुती ओळींच्या रुपात हृदयात जाऊन बसतात. त्यानंतर त्यांच्यावर येणारा व्यक्तीकरणाचा व नवीन अनुभुतींचा वाढता दबाव त्यांना प्रचंड मोमेंटमने ओठांच्या मार्गाने जगात आणतो. या प्रक्रियेमधे कवी काहीसा हतबुद्ध आहे की काय असे वाटते. कोणत्या विचाराने व्यक्त व्हावे, कोणत्या होऊ नये, कोणत्या विचाराने निर्माणच होऊ नये यावर कवीच्या नसलेल्या नियंत्रणामुळे 'हल्ली कुठल्याही विचाराला आपली पायरीच समजत नाही' असे एक तिटकारायुक्त भेदक विधान कवी दुसर्‍या मिसर्‍यात करताना दिसतो. हाच मतला अगदी एकंदर गझलकारांनाही लागू व्हावा अशी कवीची एक सुप्त इच्छा आहे की काय असे आमच्या आजवरच्या समिक्षेच्या अनुभवाने आमच्यासमोर ठेवलेले कोडे आहे. हाच नियम जगातील देहरूप घेऊन वावरणार्‍या यच्चयावत आत्म्यांनाही लागू होताना दिसतो. आपण काय आहोत, आपण काय बोलतो, काय वागतो हे भान देहरूपी आत्म्यांना कधीच राहात नाही. याचे एक पद्यात्मक वैषम्य या मतल्यातून भिडताना दिसते. पहिल्या ओळीत 'मग' या शब्दाऐवजी 'अन' हा शब्द न घेण्याचे एक विशिष्ट कारण आहे. 'अन' या शब्दामुळे नुसतीच वर्णनात्मकता आली असती असे नाही तर 'मग' मधे असलेली कारणमीमांसेची छटाही आली नसती.

झुंज होते वादळाशी पण कुठे ना बातमी
बातमी आता पर्‍यांची येतसे घरच्याघरी

कवीवर्य सुरेश भटांनी एका ठिकाणी असे म्हंटलेले आहे की 'दुसरी ओळ रचणे' हे अधिकच जबाबदारीचे काम होऊन बसते कारण त्यात पहिल्या ओळीतील विचाराचा प्रभावी समारोप करायचा असतो. हा शेर वाचून कवीला हे विचार फारसे मान्य नसावेत की काय अशी एक शंका आम्हाला येत आहे. पहिली ओळ अतिशय सुंदर आहे. वादळाशी झुंजण्याचे कर्तव्य किंवा मजबुरी अनेकदा किंबहुना बहुतेकदा मानव करीत आलेला आहे. हे वादळ म्हणजे समुद्रात होणारे वादळच असे नसून भावविश्वात होणारे कोणतेही वादळ आहे. कवी ज्ञानेशचा 'उल्लेख झुंजण्याचा झाला न कोणताही, माझ्या पराभवाची दाही दिशात चर्चा' हा एक शेर या ओळीवरून आठवला. या वादळाशी झालेल्या झुंजीची कोणतीही बातमी आली नाही यात कवी 'मी झुंजलो / कुणीतरी झुंजले / मानव झुंजला / वादळ हारले किंवा जिंकले' याबाबतचा तपशील हेतूपुरस्पर, यशस्वीरीत्या व खरोखरच सुयोग्य पद्धतीने उल्लेखण्याचे टाळत आहे. काहीवेळा गझलेची ओळ फक्त संवेदना सांगते. मात्र, पुढच्या ओळीत पर्‍यांचा व घरच्याघरीचा काय संबंध ते काही समजत नाही. कदाचित, 'इकडे या लोकांनी हे एवढे मोठे पराक्रम केले त्याचे काहीच नाही, तिकडे ते एवढेसे काहीतरी करतात त्याच्या जाहीराती लागतात' अशी काहीतरी ती संवेदना अभिप्रेत असावी. पण मुळात वादळ व परी तसेच परी व घर यांचा परस्पर संबंध लावणे किचित जिकिरीचे असल्यामुळे आम्हाला ती अभिप्रेत संवेदना कवीनेच सांगीतल्यास बरे पडेल.

मी भरावे कैक खड्डे रोज प्रेमाने तरी
मित्र ना कोणीच झाला वाढते आहे दरी

एक विधानात्मक शेर! 'मी एवढे करतो पण कुणाला त्याची किंमतच नाही' अशा अर्थी असलेल्या विधानाचा शेर! सर्वसाधारणपणे पन्नाशीत पोचलेल्या मध्यमवर्गीय समाजातील गृहिणी अशी विधाने वारंवार करताना आढळतात असे आम्हाला स्वा, ऐकीव व वाचीव अनुभवांवरून वाटते. खड्ड्यांची वाढून आता दरी होत आहे ही कल्पना मात्र सुंदर आहे.

वेदना होत्या जिवाला आज इतक्या चिकटुनी
कोणते भय घेतले त्यांनी जपायाला हरी

यातील हरी हा परीप्रमाणेच असावा की काय अशी एक नैसर्गीक भावना निर्माण होते. जिवाला वेदना आज 'इतक्या' चिकटून होत्या - या विधानातील 'जीव' हा शब्द मस्ट आहे. कारण जीवाला चिकटून होत्या. वेदना हा शब्द मस्ट आहे कारण त्याच चिकटून होत्या. इतक्या हा शब्द घेतला त्या अर्थी 'नेमक्या कितक्या' याचे उत्तर दुसर्‍या ओळीत मिळेल अशी अपेक्षा निर्माण होते. ते जर तसे मिळाले तर 'इतक्या' हा शब्द मस्ट आहे असे म्हणता येईल, अन्यथा नाही. 'आज' हा शब्द आहे त्यामुळे 'आज'मधे काहीतरी विशेष आहे व त्याचा खुलासा दुसर्‍या ओळीत व्हावा अशी अपेक्षा निर्माण होते. तो खुलासा दुसर्‍या ओळीत झाला नाही तर 'आज' हा शब्द मस्ट आहे असे म्हणता येणार नाही. तर - आज जीवाला वेदना इतक्या चिकटून होत्या की..... हा मिसरा झाल्यानंतर 'कोणते भय घेतले त्यांनी जपायाला हरी' हा मिसरा येतो. हा मिसरा आल्यानंतर 'आज' व 'इतक्या' हे दोन्ही शब्द मस्ट नाहीत हे सप्रमाण सिद्ध होते. असो, सांख्यिकीदृष्ट्या काही शेर चांगले असले की गझल भिडतेच! या शेरामधे 'हरीनाम जपणे' या अर्थी 'जपायाला हरी' आले आहे. आता हरीनाम जपण्यासाठी कोणते भय घेतले हे विधान काही लक्षात येत नाही. आमची आजी हातात एक जपमाळ घ्यायची. सुनेला 'आमच्याकडे हे चालत नाही' हे सांगून पुन्हा हरीला जपायची. आम्ही हरीनाम जपत नाही. कारण विश्वनिर्मीतीच्या मूलभुत उद्देशांपासून हरी भरकटला आहे हा आमचा ज्वलंत आरोप असून तो त्याला मान्य नाही. पण हरीनाम जपण्यासाठी माळ घेतात इतपत माहिती आहे. इथे कवीच्या वेदनांनी हरीनाम जपण्यासाठी माळेच्या ऐवजी भय घेतले आहे. आधीच वेदना जीवाला चिकटून, त्यात त्या 'आज' चिकटून, त्यात त्या 'इतक्या' चिकटून, त्यात त्या हरीनाम जपतायत अन त्यात त्या हरीनाम जपण्यासाठी 'भय' घेत आहेत. एकंदर हरीला माहीत! अर्थात, 'जपून ठेवणे' या अर्थी 'हरीला जपणे' आले असले तर वेगळाच अर्थ निघतो. परंतू पहिला अर्थ जास्त स्पष्ट वाटतो. 'माझ्या वेदना आज माझ्याच जीवाला इतक्या चिकटून बसल्या आहेत अन हरीनाम घेत आहेत की मला हे समजत नाही की त्यांना भीती आहे कशाची' असा पहिला अर्थ!

भेटल्या होत्या नव्याने ज्या खूणा होत्या जुन्या
वाढते आहेच शंका ही बरी की ती बरी

खू फारच दीर्घ झाला बुवा! कालगंगेला कालीगंगा करणारा खू आहे. असो! व्वा! वाढते आहेच शंका, ही बरी की ती बरी! छान मिसरा! चांगला शेर!

भेटली रंगात नवख्या आज माझी प्रेयसी
बोलली सारे जुनी ती कौतुके केली जरी

पुन्हा कवी ज्ञानेशचा 'पुन्हा ती भेटली तेव्हा जराशी वेगळी होती' हा मिसरा आठवला. दुसर्‍या ओळीत 'बोलली सारे, जुनी ती कौतुके केली जरी' यातील 'बोलली सारे' नंतर स्वल्पविराम नसल्यामुळे 'ती जुने बोलली' की 'कौतुकी जुनी आहेत' हे लक्षात आले नाही. बहुधा, 'जुनी' हा शब्द वापरला आहे म्हणजे कौतुके जुनी असण्याचीच शक्यता आहे. हल्ली नवख्या रंगात काय, नेहमीच्याच रंगात भेटणार्‍या प्रेयश्यांनासुद्धा जुनी कौतुके चालत नाहीत. रोज यांना काय वेगळे सांगणार? 'अहो मी जरा बारीक झाल्यासारखी वाटत आहे का हो' या एकाच प्रश्नावर गेली पाच वर्षे आम्ही ज्या खुबीने त्याच त्याच उत्तरांमधूनही वेगळाच आशय निघेल अशा पद्धतीने बोलत आहोत ते पाहून आम्हीच आमचा एक पुतळा बांधावा असे आमच्या मनात येत आहे. निदान नवे कौतुक करायला प्रेयसी तरी नवी पाहिजे ना? पण आहे तेच फार अशी अवस्था झाली की मग अनेक पदरी अर्थांची उत्तरे आपोआप सुचू लागतात. या शेरामधे प्रेयसी कवीला (पुन्हा 'आज' ) नवख्या रंगात भेटली असताना कवीने जुनी कौतुके जरी केली तरी ती सगळे बोलली. ती काय बोलली याबाबत कवी थर्ड अंपायरप्रमाणे निर्णय लांबवत आहे. थर्ड अंपायरचीच उपमा का असा प्रश्न असल्यास, थर्ड अंपायरने काय निर्णय द्यायला हवा आहे हे पब्लिकला रिप्ले बघताना आधीच कळलेले असते. त्यामुळे 'आम्हाला कळले आहे की ती काय बोलली असेल, पण आम्ही नाही सांगणार... ज्ज्जा' असा एक स्टँड इथे रसिकाला घ्यावा लागत आहे. याच शेरात एक आणखीन अर्थ निघतो. ती जी कौतुके आहेत ती प्रेयसीने केली असावीत ही पण एक शक्यता आहे. म्हणजे, तिने जुन्या पद्धतीने सगळी कौतुके जरी केली तरी आज ती सगळे बोलली. आम्ही कवी अजयचे लिखाण अनेक महिने पाहात आहोत. या शेरात प्रेयसी म्हणजे प्रेयसीच असणार अशी शक्यता आम्हाला तरी अजिबात वाटत नाही. ती कविता, जीवन, संधी यातील काहीही असू शकते. एक उत्तम म्हणावा असा शेर!

शेवटचे दोन शेर आम्हाला आवडले. लिखाण आवडल्यास वाचकांनी जरूर कळवावे. दुखावले गेले असल्यास माफी!

छान आहे गझल.

मागचे जाती पुढे मग खालचे येती वरी
आपली कोणीच आता ओळखे ना पायरी

मतला आवडला.

मी भरावे कैक खड्डे रोज प्रेमाने तरी
मित्र ना कोणीच झाला वाढते आहे दरी
सुंदर !

दरीचा शेर सुरेख आहे. मथळा आणि मक्ता कळला. छान. पण इतर शेर फारसे कळे नाहीत.

ज्ञानेश, अनंत, चित्तरंजन धन्यवाद.

चित्तरंजन साठी,
झुंज होते वादळाशी पण कुठे ना बातमी
बातमी आता पर्‍यांची येतसे घरच्याघरी
वादळाशी ज्या झुंजी होतात त्यांची बातमी कुठे नाही म्हणजे त्याबाबत फारसे कोणी बोलत नाही. पण, 'पर्‍यांची' म्हणजे केवळ बोलगप्पा असलेल्या बातम्या मात्र लोक घरच्या घरी पोहोचवितात.

वेदना होत्या जिवाला आज इतक्या चिकटुनी
कोणते भय घेतले त्यांनी जपायाला हरी
वेदना आज जिवाला इतक्या चिकटुन होत्या, असे कोणते भय त्यांनी घेतले आहे की हरी म्हणजे देव किंवा तारणारा याचा जप करावा? वेदना 'जिवाला' अर्थातच कवीच्या जिवाला चिकटुन होत्या आणि हरीही जपत होत्या. असे कोणते भय त्यांना वाटले?

भेटल्या होत्या नव्याने ज्या खुणा होत्या जुन्या
वाढते आहेच शंका ही बरी की ती बरी
ज्या खुणा जुन्या होत्या त्याच आता नव्याने भेटल्या. मनात अशी शंका येते आहे की, पूर्वी भेटलेली बरी होती कि आत्ता भेटलेली?

भेटली रंगात नवख्या आज माझी प्रेयसी
बोलली सारे जुनी ती कौतुके केली जरी
तीच प्रेयसी नवीन रंगात भेटली. याबद्दल तिचे कौतुक केले तरी ती जुने तेच बोलली.

धन्यवाद.

गडबड वाटते.

बोलली सारे जुनी ती कौतुके केली जरी
तीच प्रेयसी नवीन रंगात भेटली. याबद्दल तिचे कौतुक केले तरी ती जुने तेच बोलली.

'जुने तेच बोलली' अभिप्रेत असल्यास 'बोलली सारे जुने ती, कौतुके केली जरी' असे पाहिजे ना?

आपला दरीचा शेर आवडला.

काही शंका!

झुंज होते वादळाशी पण कुठे ना बातमी
बातमी आता पर्‍यांची येतसे घरच्याघरी
वादळाशी ज्या झुंजी होतात त्यांची बातमी कुठे नाही म्हणजे त्याबाबत फारसे कोणी बोलत नाही. पण, 'पर्‍यांची' म्हणजे केवळ बोलगप्पा असलेल्या बातम्या मात्र लोक घरच्या घरी पोहोचवितात.

'बोलगप्पा गाजती गावातल्या पारावरी' - हे स्पष्ट होईल काय?
किंवा
'गावगप्पा चालती साध्यासुध्या डासावरी' - हे स्पष्ट होईल काय?

वेदना होत्या जिवाला आज इतक्या चिकटुनी
कोणते भय घेतले त्यांनी जपायाला हरी
वेदना आज जिवाला इतक्या चिकटुन होत्या, असे कोणते भय त्यांनी घेतले आहे की हरी म्हणजे देव किंवा तारणारा याचा जप करावा? वेदना 'जिवाला' अर्थातच कवीच्या जिवाला चिकटुन होत्या आणि हरीही जपत होत्या. असे कोणते भय त्यांना वाटले?

वेदनांना भय वाटणे म्हणजे काय?

भेटल्या होत्या नव्याने ज्या खुणा होत्या जुन्या
वाढते आहेच शंका ही बरी की ती बरी
ज्या खुणा जुन्या होत्या त्याच आता नव्याने भेटल्या. मनात अशी शंका येते आहे की, पूर्वी भेटलेली बरी होती कि आत्ता भेटलेली?

ही बरी की ती बरी म्हणताना 'शंका' या शब्दाचे एकवचन पहिल्या ओळीत यायला हवे असे वाटले. 'भेटली होती नव्याने खूण जी होती जुनी' (यात 'खू' दीर्घ असायला गं. स. यांना हरकत नसावी ). पण 'माझी शंका' वेगळी आहे. जी जुनी खुण आहे तीच नव्याने भेटली. म्हणजे, बहुधा आपल्याला असे म्हणायचे असावे की 'तीच खुण वेगळ्या रुपात भेटली'. 'खुण नव्याने भेटणे' यात बहुधा 'पुन्हा तीच खुण वेगळ्या पद्धतीने पटणे' असे अभिप्रेत असावे. आता 'ही बरी की ती बरी' मधे आपल्याला असे म्हणायचे आहे काय की 'खुण पटण्याची जुनी व नवी पद्धत यातील कोणती बरी ही शंका वाढत आहे'?

मी विचारलेल्या शंकांसाठी मात्र या शेरातील दुसरी ओळ चांगली लागू पडताना दिसते. 'ही बरी की ती बरी'!

-बेफिकीर!

भेटली रंगात नवख्या आज माझी प्रेयसी
बोलली सारे जुनी ती कौतुके केली जरी

स्त्रीबद्दल संयमित लेखन.

बेफिकीर,
तुम्ही विचारलेल्या शंकांचे मी विचार मनावर घेत नाही आहे. कारण, तुम्ही शंका विचारणे या संकेतस्थळाला नवीन नाही. असो.
तरी तुम्ही प्रत्येक ओळ बारकाईने वाचता. वेळ काढून प्रतिसाद देता. हा तुमचा गूण अनेकांना घेण्यासारखा आहे.
आभार आणि धन्यवाद.

बेफिकीर,
तुम्ही विचारलेल्या शंकांचे मी विचार मनावर घेत नाही आहे

या संकेतस्थळावर असे नाही, मी तुम्हाला प्रत्यक्षातही याच शंका विचारल्या. माझा काही आग्रह असू शकत नाही.

छान गझल, सहजपणे गुणगुणता येईल अशी

मी भरावे कैक खड्डे रोज प्रेमाने तरी
मित्र ना कोणीच झाला वाढते आहे दरी

भेटल्या होत्या नव्याने ज्या खुणा होत्या जुन्या
वाढते आहेच शंका ही बरी की ती बरी

हे दोन मस्त जमलेत. फार आवडले