अन्यथा मृत्यूस साला

आज माझे मन सुखाला पाहिजे आहे म्हणे
चांगले काही बऱ्याला पाहिजे आहे म्हणे

मोल सांगावे किती हे माहिती आहे कुठे?
आज मी साऱ्या जगाला पाहिजे आहे म्हणे

चांदण्याच्या उत्सवाची पत्रिका आली मला
आपले मेहूण त्याला पाहिजे आहे म्हणे

रोजगारी पांडवांनो चाक काढा एवढे
कर्ण आता सारथ्याला पाहिजे आहे म्हणे

मीच गुलदस्त्यात जावे आणि सांगावे मला
'एकदा मीही स्वतःला पाहिजे आहे म्हणे'

या, रचा रामायणे, कलियूग आले याइथे
रोज सीता रावणाला पाहिजे आहे म्हणे

या जगाला 'बेफिकिर'ही शोभतो आहे, ... म्हणुन
अन्यथा मृत्यूस साला पाहिजे आहे म्हणे

गझल: 

प्रतिसाद

मोल सांगावे किती हे माहिती आहे कुठे?
आज मी साऱ्या जगाला पाहिजे आहे म्हणे

मीच गुलदस्त्यात जावे आणि सांगावे मला
'एकदा मीही स्वतःला पाहिजे आहे म्हणे'

वा! हे शेर आवडले. 'चांदण्याच्या उत्सवाचा' शेर कळला नाही. 'रोजगारी पांडवांनो चाक काढा एवढे' म्हणजे काय? रोजगारी हा शब्द असाही वापरतात हे माहीत नव्हते.

सर्वच शेर उत्तम आहेत ....खुप सुंदर.....

सर्वच शेर उत्तम आहेत ....खुप सुंदर.....

फारच छान लिह्ता आपण ..
पण बेफिकीर कुठे ही दिसत नाही

मोल सांगावे किती हे माहिती आहे कुठे?
आज मी साऱ्या जगाला पाहिजे आहे म्हणे
व्वा!
मीच गुलदस्त्यात जावे आणि सांगावे मला
'एकदा मीही स्वतःला पाहिजे आहे म्हणे'
व्वा!!

रोजगारी पांडवांनो चाक काढा एवढे
कर्ण आता सारथ्याला पाहिजे आहे म्हणे
ओढून ताणून प्रहार करू नका.

चुभूद्याघ्या.

चित्तरंजन व नेहा,

आभार!

अजय,

काय करा व काय करू नका हे सांगू नका. ते आपले आपण पाहिले जाईल.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

चांदण्याच्या उत्सवाची पत्रिका आली मला
आपले मेहूण त्याला पाहिजे आहे म्हणे

ज्या चांदण्यात आपण आपले प्रेम व्यक्त करून एकमेकांच्या सहवासात असायचो त्याला माहीत नाही की तू माझी झाली नाहीस, ते आजही आपली वाट पाहते. - एनीवेज - मला हा शेर रचल्याचा पश्चात्ताप नाही.

रोजगारी पांडवांनो चाक काढा एवढे
कर्ण आता सारथ्याला पाहिजे आहे म्हणे

'रोजगारी मजूर' असा शब्दप्रयोग आहे. देवाला आता अधर्माचीच ओढ लागलेली आहे असे दिसते. ( दहशतवाद, हुंडाबळी वगैरे वगैरे!) तेव्हा, पांडवांना आता 'धर्मसंस्थापनाच्या कार्यात' कृष्णाची मदत करण्याचे काम उरले नाही. ते बेरोजगार झाले आहेत. तेव्हा त्यांना सांगीतले जात आहे की 'रोजगारी व्हा, हे चाक काढण्याच्या कामाला लागा'!

-अगेन - एनीवेज - हाही शेर रचल्याचा मला पश्चात्ताप नाही.