संपेन मी नावानिशी.....

आलेच आहे होत, हो खंबीर माझ्यासारखा
संपेन मी नावानिशी, धर धीर माझ्यासारखा

खोटे खर्‍यांना मारण्यासाठी सदा शोधायचे
निर्जीव, घातक, गंजका, खंजीर माझ्यासारखा

वाघाप्रमाणे जाग येते, झोपताना वाटते
आहे कुठे दुनियेमधे उंदीर माझ्यासारखा?

होशील का तूही कधी अवखळ प्रवाहासारखी?
होईन का मीही कधी गंभीर माझ्यासारखा?

फेसाळणे, फुटणे पुन्हा, ते साहणे, हसणे पुन्हा
मी सागराच्यासारखा की तीर माझ्यासारखा?

मी कोण ते समजायला काहीच शतके राहिली
गालीब माझ्यासारखा ना मीर माझ्यासारखा

आडात नाही शांतता ती पोहर्‍यामध्ये तुझ्या
झालास आताशा मना तू वीर माझ्यासारखा

गीता पढवणे वेगळे, नाती विसरणे वेगळे
तू येच मैदानात या जाहीर माझ्यासारखा

मीही कधी होतो जसा तू 'बेफिकिर' आहेस.. पण
अंती तुला वाटेल, 'व्हावे पीर माझ्यासारखा'

-बेफिकीर!

गझल: 

प्रतिसाद

वाघाप्रमाणे जाग येते, झोपताना वाटते
आहे कुठे दुनियेमधे उंदीर माझ्यासारखा?

:) फार आवडला. मीर आणि तीरही चांगले झाले आहेत. एकंदर ओळी जोमदार आहेत. पण अनेक शेरांत माझ्यासारखाची गरज नाही. किंवा माझ्यासारखा का आला आहे ते कळत नाही, स्पष्ट होत नाही असे मला वाटले. प्रामुख्याने १,२,४ पाहा.

धन्यवाद चित्तरंजन,

खरे तर माझ्यामते त्या शेरांमधे 'माझ्यासारखाचे' प्रयोजन महत्वाचे आहे. लिहायचा प्रयत्न करतो. पण आपल्या स्पष्ट मताचा आदर आहेच. तसेच, त्या शेरांवर पुन्हा विचारही करून बघतो.

आलेच आहे होत, हो खंबीर माझ्यासारखा
संपेन मी नावानिशी, धर धीर माझ्यासारखा

मी कधी एकदा संपतो आहे याकडे इतरच नाहीत तर मीही डोळे लावून बसलो आहे. मी हितशत्रूला सांगत आहे की माझ्यासारखाच खंबीर हो, धीर धर, मी निश्चीत नावानिशी संपेन. आता कारभार आटोपायला आलाच आहे.

खोटे खर्‍यांना मारण्यासाठी सदा शोधायचे
निर्जीव, घातक, गंजका, खंजीर माझ्यासारखा

अभिप्रेत अर्थ - सुर्‍याला स्वतःची बुद्धी नसते. पण त्याचा वार घातक असतो. मी एक गंजलेला सुरा आहे. गंजलेला यासाठी की माझ्यात काहीच चांगुलपणा उरलेला नाही. असा सुरा कुणाच्या कामाचा? मग खोटे लोक खर्‍यांवर वार करण्यासाठी 'माझ्यासारख्याचा' वापर करतात.

होशील का तूही कधी अवखळ प्रवाहासारखी?
होईन का मीही कधी गंभीर माझ्यासारखा?

अभिप्रेत अर्थ - तू कधी अल्लडपणे, दिलखुलासपणे माझ्यावर भाळशील का? तुझ्यावर प्रेम करता करता व त्यात अयशस्वी ठरूनही पुन्हा त्याच प्रेमाची आत्यंतिक इच्छा बाळगताना मीच इतके विदुषकी चाळे करत आलो आहे की मी कधी गंभीर होतो हेच आठवत नाही आहे. मी पुन्हा तसा गंभीर होईन का?

अर्थात, स्पष्टीकरणाची आवश्यकता भासणे हे मी अपयश समजतो. आपल्या प्रतिसादाने बळ आले.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जी पाहिजे ती स्पष्टता नसली तरी 'माझे खरे'
आहे कुठे कोणी इथे माहीर माझ्यासारखा?

-सविनय
बेफिकीर!

छान झालीय....

आलेच आहे होत, हो खंबीर माझ्यासारखा
संपेन मी नावानिशी, धर धीर माझ्यासारखा

वाघाप्रमाणे जाग येते, झोपताना वाटते
आहे कुठे दुनियेमधे उंदीर माझ्यासारखा?

वा..!

मी कोण ते समजायला काहीच शतके राहिली
गालीब माझ्यासारखा ना मीर माझ्यासारखा

सुरेख !

हे दोन्ही शेर आवडले.

सर्वांचे आभार! (पुस्तकात या गझलेत अनेक बदल व काटछाटी केल्या, अर्थातच वकुबाप्रमाणे) :-))

ज्ञानेश शी सहमत... उंदीर, मीर आवडले