मी मिटून डोळे कविता जागत असतो

डोक्यावरती पंखा रोरावत असतो
मी मिटून डोळे कविता जागत असतो

पाऊस रांगडा कुठे बरसतो हल्ली ?
(तो रिमझिम रिमझिम पाट्या टाकत असतो )

बाजूला येतो कुणी, पाहतो, हसतो
इतक्यात अचानक सिग्नल लागत असतो !

जे म्हणायचे अंधूक जाणवत असते
तान्हुला कुणी आईस चाचपत असतो

येणारच नसते गाडी कुठली, कोणी
नुसताच फलाटावर रेंगाळत असतो

मी कधी रिकाम्या दुकानातला नोकर
एकटा स्वतःशी उगाच हासत असतो

अंधारच असतो ह्या खोलीत परंतू
एखादा क्षण घनदाट उजाळत असतो

मी आधी करतो आभाळाची माती
ती माती मग मी भाळी लावत असतो

प्रतिसाद

फलाट, दुकानातला नोकर, आभाळाची

फलाट, दुकानातला नोकर, आभाळाची माती, पाट्या टाकणे व तान्हुल्याने आईस चाचपणे हे शेर आवडले.

दुकानातला नोकर हा शेर फारच आवडला.

सहजरीत्या भिडणारे शेर आहेत.

तू वरून इतका शांत वाटशी मित्रा
आतुन कविता-लाव्हा झंझावत असतो

-सविनय
बेफिकीर!

पाट्या टाकणे, फलाट आणि शेवटचा

पाट्या टाकणे, फलाट आणि शेवटचा शेर फार फार आवडले. आभाळाची माती भाळी लावणे तर निव्वळ अप्रतिम!

वा वा! गझल फारच आवडली. नोकर,

वा वा! गझल फारच आवडली.
नोकर, माती आणि तान्हुला हे शेर तर खासच!!

सही गझल! सगळेच शेर आवडले!

सही गझल! सगळेच शेर आवडले!

वाह चित्तरंजन! कविता जगायला

वाह चित्तरंजन!
कविता जगायला मिळाली!

डोक्यावरती पंखा रोरावत

डोक्यावरती पंखा रोरावत असतो
मी मिटून डोळे कविता जागत असतो

- मिटून डोळे कविता जागणे... सुंदर कल्पना.

पाऊस रांगडा कुठे बरसतो हल्ली ?
(तो रिमझिम रिमझिम पाट्या टाकत असतो )

- वा...वा... रिमझिम रिमझिम पाट्या टाकणे...खूप आवडले. वेगळाच बाज.

बाजूला येतो कुणी, पाहतो, हसतो
इतक्यात अचानक सिग्नल लागत असतो !

- सुरेख. हा अनुभव तर प्रत्येकालाच बहुधा रोजच येत असावा. साध्या विषयाचा छान वापर.

जे म्हणायचे अंधूक जाणवत असते
तान्हुला कुणी आईस चाचपत असतो

- अप्रतिम. तान्हुल्याने जसे आईला हलकेच चाचपावे, तसे मनाने एखाद्या कल्पनेला अंदाज घेण्यासाठी चाचपावे...! छानच.

येणारच नसते गाडी कुठली, कोणी
नुसताच फलाटावर रेंगाळत असतो

- सुंदर. अतिशय सूक्ष्म, बारकावा टिपणारा शेर.

मी कधी रिकाम्या दुकानातला नोकर
एकटा स्वतःशी उगाच हासत असतो

- नवी कल्पना राबवावी, तर अशी. फारच छान.

अंधारच असतो ह्या खोलीत परंतू
एखादा क्षण घनदाट उजाळत असतो

- वा...वा...

मी आधी करतो आभाळाची माती
ती माती मग मी भाळी लावत असतो

- ओहो. अप्रतिम. खरोखरच कळसाध्यायाचा शेर.

एकंदर, अभिनव कल्पनांची खणखणीत गझल.
सौ सुनार की इक लुहार की, या म्हणीचा प्रत्यय तुमच्या गझला वाचून नेहमीच येतो. असा प्रत्यय वारंवार यावा !

चित्तरंजन -- तुमची गझल

चित्तरंजन -- तुमची गझल कल्पनांची दीपमाळ आहे! डोळे दिपले आणि सुखावलेही!

वा वा वा! मी आधी करतो आभाळाची

वा वा वा!
मी आधी करतो आभाळाची माती
ती माती मग मी भाळी लावत असतो
खर तर प्रत्येकच शेर अफलातूनच आहे. निरीक्षण, मांडणी, सहजता सगळेच ...अगदी नेमके यावे असे. वाचकाला वेगवेगळ्या संदर्भाते, वेगळ्या वातावरणात नेणारे तरीही एका गझलेत आले म्हणून न खटकणारे.

अप्रतिम गझल. अतिशय आवडली.
सोनाली

सर्व वाचकांचा आणि प्रतिसाद

सर्व वाचकांचा आणि प्रतिसाद देणार्‍यांचा आभारी आहे. प्रदीपराव, विशेष धन्यवाद. एवढीही स्तुती करू नका.

जे म्हणायचे अंधूक जाणवत

जे म्हणायचे अंधूक जाणवत असते
तान्हुला कुणी आईस चाचपत असतो.... अतिशय 'टेंडर' शेर.. हा दोन्ही म्हणजे आईच्या गर्भात असलेल्या अर्भकाला आणि अगदी नवजात अर्भकाला- म्हणजेच पर्यायाने मनात बीज रुपाने अवतरलेल्या शेराला आणि जन्माला आलेल्या, पर अभी जिसे तराशा नही है- अश्या दोन्ही शेराला लागू पडतो.. फारच नाजुक आणि गोड कल्पना आहे!
मतला , सिग्नल आणि विशेषतः फलाट एक मूड बनविणारे शेर वाटलेत.. मर्ढेकरी अंदाज आहे.. (गणपत वाणी -सारखा) एक वेगळी गझल वाचायचे समाधान लाभले..
-मानस६

प्रदीपराव, विशेष धन्यवाद.

प्रदीपराव, विशेष धन्यवाद. एवढीही स्तुती करू नका.
चालेल चालेल. नाही करणार.
पण तुमची ही डिश जरा जास्तच आवडली म्हणून चार घास मीही जास्त खाल्ले इतकेच. :)

मी आधी करतो आभाळाची माती ती

मी आधी करतो आभाळाची माती
ती माती मग मी भाळी लावत असतो
व्वा! उपरतीचा सुंदर शेर!

डोक्यावरती पंखा रोरावत असतो
हा.... हा.... जुन्या काळातल्या कवींची (...खरेतर पंख्यांची) आठवण झाली. (रोरावतमुळे)

मी मिटून डोळे कविता जागत असतो
व्वा! सुंदर कल्पना!
मला सुद्धा आत्ता 'म्याँव' करावेसे वाटले.

चुभूद्याघ्या.

मतला , सिग्नल आणि विशेषतः

मतला , सिग्नल आणि विशेषतः फलाट एक मूड बनविणारे शेर वाटलेत.. मर्ढेकरी अंदाज आहे.. (गणपत वाणी -सारखा) एक वेगळी गझल वाचायचे समाधान लाभले..

मानस, धन्यवाद. मर्ढेकरी सिग्नल आणि फलाट ह्या शब्दांवरून की काय ;)

मी आधी करतो आभाळाची माती
ती माती मग मी भाळी लावत असतो
व्वा! उपरतीचा सुंदर शेर!

अजय, धन्यवाद. केवळ उपरतीबद्दल नाही. तो एक अर्थ झाला. आत्मविश्वासाचा, उद्दामपणाचा, मूर्तिभंजनाचाही शेर आहे. हा शेर म्हटले तर माणूस नावाच्या प्राण्याबद्दलचाही आहे.

अप्रतिम गझल !!! अतिशय सुंदर.

अप्रतिम गझल !!! अतिशय सुंदर. एखाद्या शेराचा उल्लेख करणे म्हणजे दुसर्‍यावर अन्याय.
तो गुन्हा आम्ही करणार नाही. सर्व शेर आवडले.

लाभतो विसावा दोन क्षणांचा तेव्हा
मी येथे येउन गझला चाळत असतो

आपला,
(गझलप्रेमी) धोंडोपंत

गझल अत्यंत साध्या शब्दात

गझल अत्यंत साध्या शब्दात असूनही नेमके विचार मांडते. ही गोष्ट फार विचारांती जमत असावी.

बाकी:

धोंडोपंत - आपण एरवी कुठे असता?

मी आधी करतो आभाळाची माती ती

मी आधी करतो आभाळाची माती
ती माती मग मी भाळी लावत असतो
हा शेर मलाही "उद्दामपणाचा" वाटला होता. पण, मी ते लिहिले नाही. कारण, पुलंच्या भाषेत - शरीराप्रमाणे मनालाही कुबड आलेले काहीतरी बोलायचे. असो. उद्दाम व्यक्तीत आत्मविश्वास असतोच. जसा रावणातही होता. हा शेर नुसत्या आत्मविश्वासाचा वाटत नाही. तर, उद्दामपणाचाच वाटतो.
मूर्तिभंजन वगैरे म्हणाल तर पटले नाही. ठीक आहे, भगवंताची व्यापकता आणि आभाळ हे जुळते. मूर्ती आणि माती भाळी लावणे हे जुळते. पण, आभाळची माती करणे - याचा अर्थ असा होत नाही.
तरी शेर आवडला हे खरे !

धोंडोपंत,
लाभतो विसावा दोन क्षणांचा तेव्हा
मी येथे येउन गझला चाळत असतो
आपल्या चाळणीचा कधीतरी आम्हालाही अनुभव येऊ देत. हा हा हा...

चुभूद्याघ्या.

व्वा एकदंर मस्त आणि वेगळी

व्वा एकदंर मस्त आणि वेगळी गझल
तान्हुला आणि आभाळाची माती फार आवडले

सुंदर . त्यातही मतला ,

सुंदर . त्यातही मतला , तान्हुला आणि शेवटचा शेर अप्रतिम

श्री. अजय अनंत जोशी

श्री. अजय अनंत जोशी यांस,

धोंडोपंत,
लाभतो विसावा दोन क्षणांचा तेव्हा
मी येथे येउन गझला चाळत असतो
आपल्या चाळणीचा कधीतरी आम्हालाही अनुभव येऊ देत. हा हा हा...

तुम्हाला देऊ आमच्या "चाळणी"चा अनुभव.

भेटा एकदा.

धोंडोपंत

मी इथला प्रतिसाद काढून

मी इथला प्रतिसाद काढून टाकलेला आहे.

क्षमस्व!

त्यात तुम्हाला खेद

त्यात तुम्हाला खेद वाटण्यासारखे काही नाही हो . तुम्हाला कशाला खेद व्हायला पाहिजे?

त्यांनी जे काही म्हटले होते त्याला बरोबर उत्तर दिलाय.

धोंडोपंत

नुसताच फलाटावर रेंगाळत असतो

नुसताच फलाटावर रेंगाळत असतो - व्वा!

धोंडोपंत,
कुठे भेटायचे ते ठरवा. मी पुण्यात असतो. कोथरूडला.
माहितीसाठी माझा भ्रमणध्वनी : ९९२३८२०८४२
नको आता वाद, धन्यवाद!

जे म्हणायचे अंधूक जाणवत

जे म्हणायचे अंधूक जाणवत असते
तान्हुला कुणी आईस चाचपत असतो

फारच सुरेख

गझल आवडली. येणारच नसते गाडी

गझल आवडली.

येणारच नसते गाडी कुठली, कोणी
नुसताच फलाटावर रेंगाळत असतो

च्यायला, डोळ्यासमोर चित्र उभं राह्यलं.
'पाट्या टाकणे'ही आवडले.

-दिलीप बिरुटे

गझल नेहमीप्रमाणेच

गझल नेहमीप्रमाणेच सुरेख

तान्हुला व नोकर हे तर खूपच आवडले :)

जबर्दस्त गझल...

जबर्दस्त गझल...

जे म्हणायचे अंधूक जाणवत

जे म्हणायचे अंधूक जाणवत असते
तान्हुला कुणी आईस चाचपत असतो

मी आधी करतो आभाळाची माती
ती माती मग मी भाळी लावत असतो

हे दोन जास्तच आवडले.
गझल अप्रतिमच,

अप्रतिम !! सगळेच शेर अगदी थेट

अप्रतिम !!
सगळेच शेर अगदी थेट पोचले....... असं कधी लिहिता येईल ..............!!

आत्तापर्यंत दहा-बारा वेळा तरी

आत्तापर्यंत दहा-बारा वेळा तरी वाचली असेल ही गझल..
काय प्रतिसाद द्यावा तेच सुचत नाही!
एखादं ग्रेट नाटक पाहून थेटरच्या बाहेर पडल्यावर जे होतं ते होतंय!

गझल आणि तीवरचे प्रतिसाद -

गझल आणि तीवरचे प्रतिसाद - सर्वच आवडले.....

.......पण लयक्रम / लघु-गुरू

.......पण लयक्रम / लघु-गुरू क्रम कळला नाही... खरंच...!

लघु-गुरू जुळणार नाहीत. हे

लघु-गुरू जुळणार नाहीत. हे मात्रावृत्त आहे. पण लयबद्ध आहे हे नक्की.

आवडलेले शेर : पाऊस रांगडा

आवडलेले शेर :

पाऊस रांगडा कुठे बरसतो हल्ली ?
(तो रिमझिम रिमझिम पाट्या टाकत असतो )

अंधारच असतो ह्या खोलीत परंतू
एखादा क्षण घनदाट उजाळत असतो - या शेराचा म ला समजलेला अर्थ : तशी या खोलीकडून अंधाराचीच अपेक्षा असते पण एखाद्या कल्पनेची वीज अशी लखलखून जाते की खोलीत काहीतरी धवल/सत्य /उदात्त/ चांगलेही घडेल अशी आशा/विश्वास निर्माण होतो.

उत्क्रुष्ट रचना!

मतल्यातील दोन मिसर्‍यांचा

मतल्यातील दोन मिसर्‍यांचा एकमेकांशी संबंध असायला हवा असे मला वाटते.

बाकी रचना नावीन्यपूर्ण!

भन्नाट

भन्नाट

उत्तमस्य उत्तमः! (भविष्यात

उत्तमस्य उत्तमः!
(भविष्यात आमच्याकडून हिची विडंबीत आवृत्ती येण्याची शक्यता आहे.)