बातचीत भटांशी

महाराष्ट्रातील काही नामवंत लेख आणि कवी यांच्याशी अघळपघळ, तपशीलवार आणि बिनधास्त मोकळेपणाने "बातचीत" करणारे प्रा. श्री. भास्कर नंदनवार यांनी सुरेश भटांशीही तशीच बातचीत केली. त्या प्रदीर्घ बातचितीचा हा सारांश.

"भटसाहेब, कवी म्हणून तुम्ही साऱ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहात. पण, आपली वैयक्तिक माहिती फारशी उपलब्ध नाही."
"त्यामुळे काही बिघडले आहे काय?"
"काहीही नाही! तुमची गुणशाली कविता तुमचा परिचय करून द्यायला पुरेशी समर्थ आहे, असेच मी समजतो! तरीही विचारतो: आपला जन्म कुठे झाला?"
"अमरावतीला, दि. १५ एप्रिल १९३२ रोजी. आमचे घराणे सुखवस्तू होते. वडील तेव्हाचे 'फॉरेन रिटर्न्ड' डॉक्टर होते."
"वडिलांचे नाव? ते अनेकांना माहीत नाही!"
"श्रीधर. ते इंग्रजी वाङ्मयाचे मोठे रसिक होते. आईला काव्याची आवड. ती हिंगण्याची 'गृहितागमा' आहे. माझ्या लहानपणी तिने माझ्याकडून केशवसुत, तांबे आणि इतर काही कवींच्या कविता पाठ करवून घेतल्या होत्या. ती नसती, तर कदाचित मी कवीही झालो नसतो!"
"आपले शिक्षण?"
"बी. ए. पर्यंत. सारे शिक्षण अमरावतीलाच. एक सांगतो: कधीही मी हुशार विद्यार्थी म्हणून चमकलो नाही! मॅट्रिक परीक्षेत एकदा नापास झालो. पुढे जेमतेम पास झालो. इंटरमिजिएटच्या परीक्षेतही एकदा नापास झालो. बी.ए. च्या परीक्षेत तर दोनदा नापास. तिसऱ्या प्रयत्नात पास झालो. तोही तिसऱ्या श्रेणीत! अभिमान वाटावे असे माझ्या शैक्षणिक जीवनात काहीही नाही."
"पण, मराठीतील एक प्रमुख व तेही लोकप्रिय कवी आहात, याचा मात्र आम्हा वाचकांना फार अभिमान वाटतो! असा अभिमान आपल्या आई-वडिलांनाही वाटत असला पाहिजे--"
"माझ्या घरातील माणसांनी माझ्यातील कवीचे कौतुक फार उशीरा सुरू केले! माझे लग्न वगैरे झाल्यावर. मी बाप बनल्यानंतर. माझे वडील त्यांच्या दवाखान्यात येणाऱ्या पेशंटना माझ्या काव्यलेखनाविषयी मोठ्या अभिमानाने सांगू लागले. तोपर्यंत फारसे कौतुक त्यांनी केले नाही."
"का? ते रसिक नव्हते काय?"
"होते! चांगले रसिक होते. आईही काव्यप्रेमी होती. त्यांनी माझे कौतुक न करण्यामागे खरे कारण म्हणजे, त्यांच्या इतर अपेक्षा मी कधीच पूर्ण करू शकलो नाही."
" कोणत्या अपेक्षा?"
" माझा उजवा पाय, वयाच्या अडीचाव्या वर्षीच पोलियोने निकामी झाला. मी वडिलांचा पहिलाच मुलगा. त्यामुळे त्यांना फार मोठा धक्का बसला. ते स्वतः बहिरे होते व घरात त्यांचा एक वेडा लहान भाऊही होता. त्यातच माझ्या पायाच्या अधुपणाची भर पडली होती. या अधुपणामुळे कोणताही मैदानी खेळ मी कधीच खेळू शकलो नाही. त्यात पुन्हा भर पडली, शालेय-महाविद्यालयीन जीवनातील माझ्या अपयशाची! या अपयशामुळे तर, 'हा आपला मुलगा आता वाया गेला' याची वडिलांना खात्रीच पटली. त्यामुळे, नंतर घरातल्या घरात मला वेगळी वागणूक मिळू लागली. माझ्या घरातच मी एक दुय्यम दर्जाचा नागरिक व 'मागासवर्गीय' झालो... तो कडवट तपशील मी आता सांगत नाही. पण, इतकेच सांगतो-- निराशा, कटुता, न्यूनगंड यांनी पछाडलेल्या त्या माझ्या विचित्र स्थितीत मला माझ्या कवितेनेच धीर दिला, आधार दिला."

"आधार दिला म्हणजे?"
"म्हणजे कवितेने जीवनविषयक आत्मविश्वास माझ्यात निर्माण केला! १९५५ साली, बी. ए. झाल्यावर, वडिलांना स्पष्टपणे सांगून टाकले. 'मला आता शिकायचे नाही. तुमचा पैसा मला यापुढे बरबाद करायचा नाही.' बी. ए. झाल्यावर मी बेकार झालो. अधुनमधून खेड्यातील शाळांत शिक्षक म्हणून नोकऱ्या करीत होतो. नोकऱ्या मला एकामागून एक सोडून जात होत्या... माझे समकालीन आपापल्या नोकऱ्या सांभाळत सुखाचा संसार थाटत होते. कविताक्षेत्रात गाजत होते; पुण्या-मुंबईला नावे ठेवत ठेवत पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नियतकालिकांचे संपादक व समीक्षक यांच्याशी घरोबा जोडत होते; दरवर्षी अ. भा. कविसंमेलनात भाग घेत होते; आणि त्याच वेळी मला टाळत होते! मी त्यांच्या करमणुकीचा आणि थट्टेचा विषय झालो होतो... त्या काळी कुठल्या तरी खेड्यात, ठणठणत्या कंदिलाच्या पिवळ्या प्रकाशात, समोर टेबलासारखी लोखंडी पेटी ठेवून, मी कविता लिहीत होतो... मला नोकऱ्या सोडून देत होत्या; पण कविता मला सोडायला तयार नव्हती."
"त्या काळात आपण समकालीनांच्या करमणुकीचा विषय झालो होतो', असे आपण आताच म्हणालात. थोडे स्पष्टीकरण?"
" सांगू की नको? सांगतोच! त्या तशा अस्थिर काळात मी एकदा अमरावतीला गेलो होतो. प्रा. मधुकर केचे त्या रात्री स्टेशनवर भेटले. ते त्यावेळी सर्वार्थांनी फॉर्मात होते-- म्हणजे प्राध्यापकाची नोकरी होती; त्यांचे लग्न झाले होते; चोहीकडे त्यांचे नाव झाले होते; आणि त्या पार्श्वभूमीवर , ते त्यावेळी ते मला अत्यंत उपहासाने हिणवीत म्हणाले होते: 'सुरेश, तू आता कवी म्हणून संपलास! तू आता अशीच गावोगावी मास्तरकी कर!' मी त्यावेळी त्यांना इतकेच म्हणालो, 'ते  अजून ठरायचे आहे!'  नंदनवार, आता परिस्थिती बदलली आहे. पण, मागची परिस्थिती मी विसरलेलो नाही. काही काळापुरती मला जीवनाच्या मोर्च्यापासून माघार घ्यावी लागली; पण कविता जगण्याचे युद्ध मी जिंकलो आहे! हे युद्ध जिंकल्यामुळे मी जीवनाचे युद्ध जिंकले आहे... आता, हेच लोक माझ्याविषयी सवलत दिल्याप्रमाणे जरा व्यवस्थित बोलत आहेत. जणू काही त्यांना मी आताच कळायला लागलो आहे... त्या काळात समकालीनांकडून मला मिळालेली उपेक्षापूर्ण तुच्छ वागणूक व काही तथाकथित नातेवाईकांची सूज्ञ धोरणे मी विसरलो नाही... मी माझे अपमान विसरणारा माणूस नाही. मला प्रत्येक अपमानाचे उसने फेडता आलेले नाही, हे एक शल्य होते. आता नाही! कारण, माझ्याविषयी झालेली सर्व 'भाकिते' सपशेल नेस्तनाबूत करणे, हीच आता साऱ्या अपमानांची नुकसानभरपाई आहे!"
"भटसाहेब, साऱ्या रसिकांच्या वतीने मी सांगतो-- ती सर्व 'भाकिते' नेस्तनाबूत झालेली आहेत!"
"नंदनवार, कवी म्हणून मला मिळत असलेला हा प्रतिसाद आजचा नाही! गेल्या तीस वर्षांपासून तो मिळत आहे. आज साऱ्या महाराष्ट्रात मी उत्स्फूर्त आणि विराट प्रतिसाद मिळवीत आहे. पण, त्यासाठी मी माझ्या संपूर्ण आयुष्याची किंमत मोजलेली आहे व वयाची पन्नाशी गाठल्यानंतर आता मी पश्चिम महाराष्ट्रातही कार्यक्रम सुरू केले आहेत."
"आणि त्यामुळे कवी म्हणून आपले मोठेपण स्पष्ट व सिद्धही झालेले आहे. म्हणूनच, केव्हा काळी झालेली 'उपेक्षा' विसरून--"
"विसरून जाऊन मी खिलाडू वृत्तीने वागू? छे! माझ्या बहुसंख्य समकालीनांनी किंवा थोरामोठ्यांनी माझ्याकडून खिलाडूवृत्तीची अपेक्षा करू नये; मी ते टेंडर भरलेले नाही-- मी कोणा विद्वान समीक्षकांच्या किंवा आपापले साहित्यिक जोपासणाऱ्या वृत्तपत्रीय कंपूंच्या पाठबळावर 'सुरेश भट' झालेलो नाही! मला मराठी जनेतेने मोठे केलेले आहे."
"बरोबर आहे! भटसाहेब, आपले प्रकाशित कवितासंग्रह तीनच ना!"
"तीनच! १९६१ साली 'रूपगंधा' हा पहिला संग्रह अमरावतीच्या नागविदर्भ प्रकाशनाने प्रसिद्ध केला. १९७४ साली 'रंग माझा वेगळा' हा दुसरा संग्रह मौजने काढला. आणि १९८३ साली 'एल्गार' हा तिसरा संग्रह मीच स्वतः प्रकाशित केला."
"ही संपदा संख्येने कमी असली, तरी गुणाने मोठी आहे--"
"हे तुम्ही रसिकांनी म्हणावयाचे आहे. मी इतकेच सांगतो: 'रूपगंधा'ची व 'रंग माझा वेगळा'ची अनुक्रमे दुसरी व चौथी आवृत्ती लवकरच प्रकाशित होणार आहे.  'एल्गार'ची आवृत्ती पहिल्या नऊ महिन्यातच जवळपास खपली!"
"काव्यगायनाच्या कार्यक्रमातही 'एल्गार'ची विक्री करता ना?"
" करतो. काव्यगायनाचे कार्यक्रम आणि स्वतःच्या पुस्तकांचे प्रकाशन हा माझा व्यवसाय आहे. नोकरी मला देशद्रोहासारखी वाटते... या महागाईच्या काळात स्वतःच कवी व प्रकाशक असल्यावर माणसाला किती कटकटी व आर्थिक विवंचनांना तोंड द्यावे लागते, हे ज्याचे त्यालाच माहीत; आणि तरीही माझी पुढची पुस्तके मीच प्रकाशित करणार आहे."
"ती कोणती?"
"'जीवना तू तसा-- मी असा' (एक प्रकट मुक्तचिंतन),  'गझलनामा' (गझलच्या  बाबतीत एकमेव व उपयुक्त ग्रंथ),  'आकाशगंगा' (खंडकाव्य), 'मुक्तकमाला' (चार चार ओळींची वेचक मुक्तके) आणि 'रूपगंधा' व 'रंग माझा वेगळा' च्या पुनरावृत्त्या"

"भटसाहेब, आपल्या पहिल्या काव्यसंग्रहास राज्य शासनाचे पारितोषिक मिळालेले आहे ना?"
"आणि दुसऱ्या संग्रहालाही!  १९६१ साली 'रूपगंधा'ला दुसरे पारितोषिक विभागून मिळाले. दिलीप पुरुषोत्तम चित्रे हे भागीदार होते. त्यावर्षी पहिले पारितोषिक कुसुमाग्रजांना मिळाले होते. १९७४ साली 'रंग माझा वेगळा'ला केशवसुत पारितोषिक मिळाले. हा माझा संग्रह नंतर तीन विद्यापीठात, क्रमिक पुस्तक म्हणून, अभ्यासाला होता--, एम. ए. च्या"
"भटसाहेब, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, तुमच्या समकालीनांनी व समीक्षकांनीही आपल्यावर व आपल्या कवितेवर अन्याय केला असेल. समीक्षकांनी तर केलाच आहे! पण, आज मी माझ्या नव्या पिढीतर्फे सांगतोय-- आपण मराठीतील एक महत्त्वाचे प्रतिभावंत कवी आहात, केवळ प्रतिभावंतच नव्हे, रसिकमान्यही!"
"नंदनवार, मला समीक्षकांनी किंवा संपादकांनी मोठे केलेले नाही. मला मराठी जनतेने मोठे केले आहे, तिच्या खांद्यावर मी उभा आहे. माझी करिअरसाठी मी कोणत्याही कंपूचा, संघटनेचा व पक्षाचा उपयोग करून घेतलेला नाही.
कशास व्यासपीठ पाहिजे तुला?
घराघरात गीत गुणगुणून जा
कशास पाहिजे तुला परंपरा?
तुझीच तू परंपरा बनून जा
-- असे मी म्हणत असतोच."

--भास्कर नंदनवार

(दै. तरुण भारत नागपूर, डिसेंबर १९८६)

Taxonomy upgrade extras: