चाललो निघून मी

बंद घे करून दार...चाललो निघून मी
पावले न थांबणार..चाललो निघून मी

सारखा कसा फसेन हासण्यास त्या तुझ्या ?
मी बये तसा हुषार..चाललो निघून मी

हा तुझ्यामुळेच घोळ, तूच निस्तरून जा
फक्त तू जबाबदार --- चाललो निघून मी

राहिलीस तू अजिंक्य एवढे करुनही
चल, मला कबूल हार..चाललो निघून मी

मी पुन्हा न भेटणार, परतणारही न मी
फैसला न बदलणार..चाललो निघून मी

द्यायचा कसा निरोप आज सांगतो तुला
हास फक्त एकवार.......चाललो निघून मी

येथल्या फुलांमधे न गंध, रंग राहिले
शोधण्या नवी बहार..चाललो निघून मी

गझल: 

प्रतिसाद

व्वा! आपल्या गझला फार सहज असतात.
ही गझल खूप आवडली.

पाहिजेस तू इथेच, पाहिजे गझल तुझी
बदल यार हा विचार... 'चाललो निघून मी'

-सविनय
बेफिकीर!

वा! खासच गझल!

'बेफिकीर' द्विपदी पण मस्तच!

वा! गझल, तिची जमीन, तिची सहजता आणि मूड फार आकर्षक आहे. फार आवडली.

फारच सुन्दर !
सहज गझलांमधील उत्कृष्ट गझल!
व्वा!

चित्तंशी सहमत. गझल छान आहे; आवडली. 'बये तसा हुषार' मधला खोचकपणा/टोकदारपणा विशेष आवडला, लक्षात राहीलसा वाटला. निरोप देण्याचा शेरही फारच भावला. जियो!

फारच सुन्दर !

व्वा! व्वा! व्वा!

धन्यवाद, सर्वांना.