हास आयुष्या

सुरांनी मांडली दारी तुझ्या आरास आयुष्या
अरे, आता तरी सोडून चिंता हास आयुष्या !

कधी काट्यापरी सलणे, कधी गंधाळणे, फ़ुलणे
दिले तू वेदनेला चांदण्यांचे श्वास आयुष्या !

तुला माझी, मला त्याची सदा हुलकावणी चाले,
जिवाचा खेळखंडोबा पुन्हा केलास आयुष्या

जिथे होते तुझे घरटे, अता ती मोडली फांदी
तसे माझे तरी उरले कितीसे श्वास आयुष्या ?

कधी जन्मांतरीचे आपले नाते खरे होते ?
कधी होतास तू माझ्याचसाठी ख़ास आयुष्या ?

दिवे मंदावता येशील माझ्या सोबतीसाठी
मला तू एवढा देशील का विश्वास आयुष्या ?

गझल: 

प्रतिसाद

भन्नाट

तुला माझी, मला त्याची सदा हुलकावणी चाले,
जिवाचा खेळखंडोबा पुन्हा केलास आयुष्या

जिथे होते तुझे घरटे, अता ती मोडली फांदी
तसे माझे तरी उरले कितीसे श्वास आयुष्या ?

कधी जन्मांतरीचे आपले नाते खरे होते ?
कधी होतास तू माझ्याचसाठी ख़ास आयुष्या ?

छान गझल! आवडली. श्वास व खास हे शेर जास्त आवडले.

जगदीश व आपल्याप्रमाणे 'आयुष्या' ही रदीफ घेऊन मीही एक गझल केली होती. यानिमित्ताने ती गझल खाली देण्याचा मोह फुलफिल करून घेत आहे. येथेच, जगदीशनेही त्याची गझल पेस्ट करावी अशी इच्छा! त्यायोगे एकाच रदीफच्या गझला एका यादीत येतील. त्यापुर्वी, आपल्यासाठी एक शेर!

निराशा दाटते आता, क्षितीजे निकट आलेली
पुन्हा नाही अता येणार ते मधुमास आयुष्या

-सविनय
बेफिकीर!

अस्मादिकांचा एक जुना प्रयत्न!

तुझ्या नादास लागावे कुणी रमणीय आयुष्या?
सरे आयुष्य, करताना तुला सहनीय आयुष्या

इथे येणे, हवेसे वाटणे किंवा नको होणे
कुठे आहेस माझा सांग तू परकीय आयुष्या?

तुला जाणीव व्हावी याचसाठी प्रेम केले मी
पुन्हा जाऊ नको नरकामधे स्वर्गीय आयुष्या?

रचावी चांगली कविता, तुझा सल्ला खरा आहे
जसा आहेस ते मी मांडतो दयनीय आयुष्या

किती कंटाळलो, आता स्वतःशी दुष्मनी व्हावी
बुडाला लावतो आगी तुझ्या निष्क्रीय आयुष्या

इथे होतास तेव्हाची अवस्था माहिती आहे
कशाला व्हायचे मागून आदरणीय आयुष्या?

तुझे आहे बरे, येतोस अन जातोस केव्हाही
तुझ्याहीहून आहे मी अनाकलनीय आयुष्या

धन्यवाद दशरथ.
'बेफिकीर' आपली गझल खासच आहे. शेवटचा शेर खूप खूप आवडला.

निराशा दाटते आता, क्षितीजे निकट आलेली
पुन्हा नाही अता येणार ते मधुमास आयुष्या

हा शेर तर अप्रतिम!

गझल छानच. आवडली. शेवटचे तिन्ही शेर खास!

क्रांती मस्त आहे गझल...

शेवटचे दोन खूप आवडले

भूषण ह्यांनी सुचवलेला शेर पण आवडला

तुला माझी, मला त्याची सदा हुलकावणी चाले,
जिवाचा खेळखंडोबा पुन्हा केलास आयुष्या >>> दुसरा मिसरा मस्त आहे पण ह्यात त्याची म्हणजे कोणाची हे मला कळले नाही :( हे जर आयुष्यालाच उद्देशून असेल तर तुझी हवे ना तिथे?

धन्यवाद!
तुला माझी, मला त्याची सदा हुलकावणी चाले,
जिवाचा खेळखंडोबा पुन्हा केलास आयुष्या >>> दुसरा मिसरा मस्त आहे पण ह्यात त्याची म्हणजे कोणाची हे मला कळले नाही :( हे जर आयुष्यालाच उद्देशून असेल तर तुझी हवे ना तिथे?

त्याची म्हणजे जिवाची. ते जिवाला उद्देशून आहे.