कर्ज

उपकाराचे तुझ्या जीवना कर्ज जुने सांभाळत आले
चुकवाया मी तुझी तारणे, किती बंधने पाळत आले

किती टाळले तरिही त्यांना माझ्यावाचुन थारा नव्हता
तुझे भास सावलीसारखे पायांशी घोटाळत आले

नभछाया वा मळभकाजळी निष्प्रभ का करते सूर्याला ?
ग्रहण क्षणाचे सुटता त्याचे किरण पुन्हा तेजाळत आले

किती काळ या अधांतरी वाटेवर अजुनी प्रवास माझा ?
उत्तर या साध्या प्रश्नाचे प्राक्तन माझे टाळत आले

भलते होते वेड जिवाला राखेतुन अवतार घ्यायचे,
अतिरेकी हट्टापायी त्या, सर्वस्वाला जाळत आले

कुणी द्यायची साथ कुणाची, कधीच त्यांचे ठरले होते,
तुझी वाट शोधली सुखाने, मला दु:ख धुंडाळत आले

गझल: 

प्रतिसाद

क्रांती,
चांगली रचना.

वा..

नभछाया आणि शेवटचे दोन शेर खूपच आवडले.

शेवटाचे दोन वावावा....
फार आवडले..

कुणी द्यायची साथ कुणाची कधीच त्यांचे ठरले होते

हा शेर फार आवडला.

अभिनंदन!

कुणी द्यायची साथ कुणाची, कधीच त्यांचे ठरले होते,
तुझी वाट शोधली सुखाने, मला दु:ख धुंडाळत आले

वाव्वा! फार फार छान.

वा! भास आणि दु:ख हे शेर आवडले!!

नभछाया पासून सर्व शेर मस्त ! वा छानच !

किती काळ या अधांतरी वाटेवर अजुनी प्रवास माझा ?
उत्तर या साध्या प्रश्नाचे प्राक्तन माझे टाळत आले

व्वा! हाही फार सुंदर शेर क्रान्तीजी!

तशी मलाही घाई नव्हती पुढे काय हे तपासण्याची
टाळत आले मृत्यूला मी, जन्मावर रेंगाळत आले

सविनय
-'बेफिकीर'!

मस्त !

शेर आवडले

किती काळ या अधांतरी वाटेवर अजुनी प्रवास माझा ?
उत्तर या साध्या प्रश्नाचे प्राक्तन माझे टाळत आले

भलते होते वेड जिवाला राखेतुन अवतार घ्यायचे,
अतिरेकी हट्टापायी त्या, सर्वस्वाला जाळत आले

व्वा एकदम मस्त गझल
भास, प्राक्तन आणि शेवटचा शेर खूप आवडले

दुसरा व शेवटचा शेर फार फार आवडले.

सुंदर गझल. पुन्हा वाचली.

सही यार..... कमाल आहे गझल :)

गझल छानच. विशेषतः

तुझे भास सावलीसारखे पायांशी घोटाळत आले

किती काळ या अधांतरी वाटेवर अजुनी प्रवास माझा ?

तुझी वाट शोधली सुखाने, मला दु:ख धुंडाळत आले

वा ! वा ! सुरेख उतरल्या आहेत ह्या ओळी.

शुभेच्छा