कोण जाणे

कशाला तुझे व्हायचे कोण जाणे
किती गोजिरे व्हायचे कोण जाणे

'नकोसे न होणे' जगाने शिकवले
'हवेसे' कसे व्हायचे कोण जाणे

कधीचा मला रोग हा मीपणाचा
कधी मी बरे व्हायचे कोण जाणे

तुझा उंबराही लिलावात लाभे
कशाला पुढे व्हायचे कोण जाणे

तुझे नाव जेव्हा कधी घ्यायचो मी
कुणाचे भले व्हायचे कोण जाणे

पिढी खेचते मागची, आजचीही
नवे की जुने व्हायचे कोण जाणे

तिला मी नकोसा, मलाही नकोसा
कसे आमचे व्हायचे कोण जाणे

तुझ्याशी कशाला विरोधात राहू
तुझेही खरे व्हायचे... कोण जाणे

किती 'बेफिकिर' तू, तरी मार्ग सुचले
कसे काय ते व्हायचे कोण जाणे

गझल: 

प्रतिसाद

छान

तुझे नाव जेव्हा कधी घ्यायचो मी
कुणाचे भले व्हायचे कोण जाणे

पिढी खेचते मागची, आजचीही
नवे की जुने व्हायचे कोण जाणे

तिला मी नकोसा, मलाही नकोसा
कसे आमचे व्हायचे कोण जाणे

वा! मस्त गझल!

पिढी खेचते मागची, आजचीही
नवे की जुने व्हायचे कोण जाणे

तिला मी नकोसा, मलाही नकोसा
कसे आमचे व्हायचे कोण जाणे

तुझ्याशी कशाला विरोधात राहू
तुझेही खरे व्हायचे... कोण जाणे

हे शेर खासच!

आवडली...
सरळ आत शिरते..

तिला मी नकोसा, मलाही नकोसा
कसे आमचे व्हायचे कोण जाणे
:-)

तुझा उंबराही लिलावात लाभे
कशाला पुढे व्हायचे कोण जाणे
वावा...

कधीचा मला रोग हा मीपणाचा
कधी मी बरे व्हायचे कोण जाणे
हा ही थेट..
पुलेशु..

पिढी खेचते मागची, आजचीही
नवे की जुने व्हायचे कोण जाणे

तिला मी नकोसा, मलाही नकोसा
कसे आमचे व्हायचे कोण जाणे

:) आवडले.. खासकरून 'कसे आमचे व्हायचे कोण जाणे' मधला लहजा मस्त आहे.
काही शेरात मात्र 'कोण जाणे' चे येणे तितके सहज वाटले नाही..

प्रतिसादांनी उत्साह आला.

आभारी आहे.

'नकोसे न होणे' जगाने शिकवले
'हवेसे' कसे व्हायचे कोण जाणे
म्हणजे काय?

सगळीच गझल फार सुंदर!

गझल सुंदर

पिढी खेचते मागची, आजचीही
नवे की जुने व्हायचे कोण जाणे

तिला मी नकोसा, मलाही नकोसा
कसे आमचे व्हायचे कोण जाणे

'नकोसे न होणे' जगाने शिकवले
'हवेसे' कसे व्हायचे कोण जाणे

वा!

तिला मी नकोसा, मलाही नकोसा
कसे आमचे व्हायचे कोण जाणे

वा! वरील दोन्ही द्विपदी विशेष आहेत.

एकंदर चांगली आहे गझल. माझ्यामते उंबरा आणि मक्ता संदिग्ध वाटतो आहे.

अजय,

'नकोसे न होणे' जगाने शिकवले
हवेसे कसे व्हायचे कोण जाणे

अर्थ -

मी कसे वागू नये हे सांगती सारे मला
पण 'कसे वागायचे' ते माहिती कोठे मला?

श्री. चित्तरंजन,

आपल्या प्रोत्साहनाने बळ आले.

ते शेर संदिग्ध झाले आहेत खरे. बदलायचा प्रयत्न करतो.

उंबरा - देवाच्या गाभार्‍याकडे जायला रांग असते. त्यातही गाभार्‍यापाशी बसलेला माणूस श्रीमंतांची हार फुले आधी वाहून त्यांना जास्त प्रसाद वगैरे देतो. हे मी कोल्हापुरला गेल्या महिन्यात एका मारुती मंदिरात पाहिले.
त्यावरून सुचले होते. शब्दरचना कदाचित जास्त तपासायला हवी!

मक्ता - केअरलेस असूनही, माणसांशी वाटेल तसे वागूनही, काही ना काही मार्ग सुचायचे, लोक चांगले होते म्हणून ते मदत करायचे, मी कसाही असलो तरी! आता वाटते की 'ते कसे काय व्हायचे कोण जाणे'! खरे तर, मी कसाही वागूनही लोक मात्र चांगले वागायचे हे मला आता मागे वळून पाहिल्यावर समजत आहे. आही शेर बदलायचा प्रयत्न करतो.

दशरथजी,

आपल्या दोन प्रतिसादांनी आणखीनच बरे वाटले.

सर्वांचे आभार!

'नकोसे न होणे' जगाने शिकवले --- शिकविले या शब्दातून अर्थ स्पष्ट होतो आहे. तो
मी कसे वागू नये हे सांगती सारे मला -- असा होत नाही आहे. जरा जास्त होतो आहे. सांगणे आणि शिकविणे या शब्दांच्या अर्थात बराच फरक आहे.
नकोसे न होणे जगाने शिकविले -- म्हणजेच हवेसे होणे शिकविले. शिकविले हा शब्द आणि नकोसे न होणे हा प्रयोग बदलता आला तर पहा...
अर्थात एवढा विचार नाही केला तर...
उत्तमच आहे यात शंका नाही.

'एवढा विचार नाही केला तर...'

अजय,

कृपया आपले वरील विधान बदलता आले तर पहावेत.

नकोसे न होणे म्हणजेच हवेसे होणे हे आपले गृहीत मला योग्य वाटत नाही.

नकोसे न होणे - असे वागलास तर शिक्षा मिळेल

हवेसे होणे - असे वागलास तर बक्षीस मिळेल

हा फरक आहे. पुर्ण विचारांती रचलेला शेर आहे. तसेच, अर्थ स्पष्ट करण्यासाठी दिलेले शेर हे हुबेहूब त्याच अर्थाचे नव्हतेच. आपल्या 'म्हणजे काय' या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी जरा एलॅबोरेट केलेले शेर होते ते!

मनी आज शंका अशी भेडसावे
कुणाचे 'पिणे' व्हायचे कोण जाणे

-सविनय
बेफिकीर!

नकोसे न होणे - यातील छटा नक्कीच वेगळी आहे. 'होणे' मध्ये मुळातच शिकवण आहे. 'नकोसे न होणे' याचाच अर्थ हवेसे होणे असा होतो. 'होणे' मध्ये आदेश, सूचना, इच्छा असा गन्ध येत नाही...

असे केले तर तुम्ही म्हणता तसे होईल...
'नकोसे न व्हावे' ...जगाने शिकवले
हवेसे कसे व्हायचे कोण जाणे ..!
व्हावे या शब्दातून आदेश, इच्छा, सूचना आदि. भविष्यकाळाशी निगडीत गोष्टी जुळू शकतात.
अर्थात अधिकार कवीचाच.
मी हा विषय माझ्यासाठी इथेच संपला असे मानतो.
कलोअ. चुभूद्याघ्या.

सुंदर गझल भूषण

कधीचा मला रोग हा मीपणाचा
कधी मी बरे व्हायचे कोण जाणे

तिला मी नकोसा, मलाही नकोसा
कसे आमचे व्हायचे कोण जाणे

तुझ्याशी कशाला विरोधात राहू
तुझेही खरे व्हायचे... कोण जाणे
>>> व्वा हे तर फार आवडले

कसे आमचे व्हायचे कोण जाणे
क्या बात है! या ओळी एकदम मस्त जमून आल्या आहेत.
सोनाली

मस्त...

आवडली...