आयुष्या

आणशी इतके कुठोनी पेच आयुष्या?
रोजचे जगणे तुझे का हेच आयुष्या?

आज आनंदात थोडेसे जगू दे रे
मग उद्याला जायचे आहेच आयुष्या?

'दु:ख तू देऊ नको' हे सांगणे नाही
पाउली प्रत्येक का पण ठेच आयुष्या?

एकतर्फी प्रेम करण्याचा गुन्हा झाला
मी खुळा अन् प्रेमही वेडेच आयुष्या?

श्वासही नियमीत मी घेतो तुझ्यासाठी
भासती का स्पंदने ठोकेच आयुष्या?

फारशी चिंता अता माझी नको तुजला
घाव नेमाने तरीही देच आयुष्या

तू मला सोडून जाण्याची भिती नाही
चालले आहे जिणे नुसतेच आयुष्या

चाळता पाने जुनी पाणावले डोळे
हाय, झाले काय हे भलतेच आयुष्या

ठोकरा देतोस त्या खाऊनही हसतो
आजही म्हणतो तुला माझेच आयुष्या

जगदिश

गझल: 

प्रतिसाद

जगदीश, गझल चांगली झाली आहे. फार आवडली.

श्वासही नियमीत मी घेतो तुझ्यासाठी
भासती का स्पंदने ठोकेच आयुष्या?
वाव्वा!

चाळता पाने जुनी पाणावले डोळे
हाय, झाले काय हे भलतेच आयुष्या
वाव्वा!

जगदीश,

शेवटचा शेर अधिक आवडला.

शेरागणिक आशयाचे वैविध्य यावे असे वाटले. १, २, ३, ६, ७, ९ या शेरांचा आशय जवळ जवळ तोच आहे असे वाटले. शुभेच्छा!

सुरेख गझल.
'दु:ख तू देऊ नको' हे सांगणे नाही
पाउली प्रत्येक का पण ठेच आयुष्या?

चाळता पाने जुनी पाणावले डोळे
हाय, झाले काय हे भलतेच आयुष्या

ठोकरा देतोस त्या खाऊनही हसतो
आजही म्हणतो तुला माझेच आयुष्या

हे शेर खूप आवडले.

'दु:ख तू देऊ नको' हे सांगणे नाही
पाउली प्रत्येक का पण ठेच आयुष्या?

चाळता पाने जुनी पाणावले डोळे
हाय, झाले काय हे भलतेच आयुष्या (हा शेर मस्त..! भलताच आवडला. :)

हे शेर जास्त आवडले.

@ भुषण
मी सर्व शेरांचा आशय अगदीच वेगळा आहे असे म्हणणार नाही. पण आयुष्याने दिलेल्या व्यथांची वेगळी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

१, २, ३, ६, ७, ९ या शेरांचा माझा लिहितानाचा दृष्टीकोन थोडक्यात इथे देण्याचा प्रयत्न करतो.
१ आयुष्यात इतके प्रश्न कुठून येतात?
२ आयुष्य संपण्याआधी सुख मिळावं
३ दु:खाला ना नाही. पण प्रत्येक क्षणी दु:ख का?
६ माझी चिंता करू नको. पण वेदना देत रहा.
७ आयुष्यात काही उरले नाही. कधीही संपले तरी चालेल. भीती नाही.
९ काहीही झालं तरी जगण्यावरचं प्रेम संपत नाही.

खरं तर ७ आणि ९ विरूद्ध अर्थाचे आहेत.

तरीही आपली सुचना लक्षात ठेवेन.

सर्वांचे आभार !!

आवडली.
'दु:ख तू देऊ नको' हे सांगणे नाही
पाउली प्रत्येक का पण ठेच आयुष्या?
वावा! छान! येथे 'पावली' हवेसे वाटले; चू.भू.द्या.घ्या.
शेवटचा शेरही छान आहे; आवडला.
काही ओळी विधानात्मक वाटल्या. जसे - एकतर्फी प्रेम करण्याचा गुन्हा झाला, तू मला सोडून जाण्याची भिती नाही ... पर्यायी शब्दयोजनेतून या विधानात्मक ओळींत काव्यात्मकता आणता आली असती, असे वाटते.
पुढील लेखनासाठी अनेकोत्तम शुभेच्छा!

तू मला सोडून जाण्याची भिती नाही
चालले आहे जिणे नुसतेच आयुष्या

वा!

चाळता पाने जुनी पाणावले डोळे
हाय, झाले काय हे भलतेच आयुष्या

(दुसर्‍या ओळीत 'हाय,' ऐवजी काय घेऊन पहा , जसे:
काय झाले! काय हे भलतेच आयुष्या
)

गझल आवडली