आजही स्मरणात सारे

आजही स्मरणात सारे काल घडलेले
उंबर्‍यापाशी तिचे पाऊल अडलेले

ओल श्वासांना कसा पाऊस नसताना?
आठवांना आसवांचे थेंब जडलेले

वाटते येऊ नये आता पहाटेने
झोपले नुकतेच डोळे रात रडलेले

उत्तरे शोधायची धडपड कशासाठी?
उत्तरांनाही हजारो प्रश्न पडलेले

पाहतो आहे उपेक्षाही अपेक्षांची,
वेदनांचे हुंदके हास्यात दडलेले

खातरी नाही अताशा फारशी माझी
स्पंदनांचे धावणे पुरते बिघडलेले

जगदिश

गझल: 

प्रतिसाद

आजही स्मरणात सारे काल घडलेले
उंबर्‍यापाशी तिचे पाऊल अडलेले - वा वा!

ओल श्वासांना कसा पाऊस नसताना?
आठवांना आसवांचे थेंब जडलेले - वा वा! फारच सुंदर शेर... अभिनंदन!

वाटते येऊ नये आता पहाटेने
झोपले नुकतेच डोळे रात रडलेले - व्वा! वाटले येऊ नये आता पहाटेने.. सुंदर!

उत्तरे शोधायची धडपड कशासाठी?
उत्तरांनाही हजारो प्रश्न पडलेले - सुंदर शेर!

अभिनंदन! सुंदर गझल केलीस...
 

वा !
जगदीश,
उत्तम रचना.

कृपया,
खालील बदल कसे वाटतात, पहावे

ओल श्वासांना कशी पाऊस नसताना?
आठवांना आसवांचे थेंब जडलेले

वाटते येऊ नये आता पहाटेने
झोपले नुकतेच, रात्री नयन रडलेले



.केदार पाटणकर

केदार,

माझे मत!

झोपले नुकतेच, रात्री नयन रडलेले

यात आपण अर्थ तोच ठेवला आहेत हे खरे! मात्र, नयन हा शब्द बोलीभाषेतला कमी वाटतो व कवितेचा जास्त वाटतो. 'एक रात्र रडलेले डोळे नुकतेच झोपले' व 'रात्री रडलेले नयन नुकतेच झोपले' यात मला तरी डोळे जास्त भावले.

आपले मत समजावे.

धन्यवाद!


गझल आवडली.

क्रान्ति
{रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर |
अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}

उत्तम गझल आहे.
केदारशी थोडा सहमत.
ओल श्वासांना कशी पाऊस नसताना? सहमत
रात्री नयन - असहमत.
कलोअ
चूभूद्याघ्या

भूषण,

मनातील बोललात. रडण्याच्याबाबतीत डोळेच जास्त भावतात.
बदल करताना देखील माझी हीच भावना होती.

'रात रडलेले' किंचित खटकले म्हणून बदल सुचविला.

मूळ शेर जसाच्या तसा ठेवावा..

.केदार पाटणकर

बा़कीचे शेर नि त्यायोगे एकंदर गझल आवडली. उपेक्षा-अपेक्षांचा शेर (मला तरी) अस्पष्ट वाटतो आहे.
- चक्रपाणि जीवन चिटणीस

आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांबद्द धन्यवाद !

केदार,
ओला श्वासांना. मधे कसा ऐवजी कशी हवं होतं हे मान्य.
मात्र डोळे आणि नयन यामधे मात्र बदल करावा असे वाटत नाही.

त्याबाबतीत भुषण यांच मत अगदी योग्य.
मला रात्रभर रडलेले डोळे नुकतेच झोपले असेच म्हणायचे आहे.
(अर्थात तुम्हीही त्याला सहमती दर्शवली आहेच !)

चक्रपाणि
तुमच्या सुचनेनुसार, उपेक्षांवर विचार सुरू आहे.

मला म्हणायचे आहे की
' अपेक्षा पूर्ण होत नाहीत हे समोर पाहूनही हसावे लागत आहे '
काही सुचवता आलं तर जरूर सुचवा.

कळावे. लोभ असावा.
चु. भू. द्या. घ्या.

शेर आवडले.

शेर आवडले.

पाहतो आहे उपेक्षाही अपेक्षांची>>> हाच मिसरा जास्त आवडला. जबरी!