उ:शाप


स्वप्नवेड्या पापण्यांना आसवांचा शाप का?
पुण्यवंतांच्या जगी या पुण्य ठरते पाप का?

फूलवेड्या त्या गुलाबाचे जिणे काट्यांमध्ये,
गंधवेड्या चंदनाला वेढलेले साप का?

कोणते हे जीवघेणे दु:ख गासी कोकिळे?
भासती भेसूर रडणे हे तुझे आलाप का?

तू स्वतः स्वीकारली ही वंचना, ही बंधने,
व्यर्थ हा त्रागा कशाला? व्यर्थ हा संताप का?

तू दिलेला जीवनाचा शाप मी स्वीकारला,
का तुझ्या ओठी न येई अजुनही उ:शाप, का?


गझल: 

प्रतिसाद

खूपच  छान  गझल  आहे. सगळेच्या  सगळे  शेर  आवडले.
त्यातही  कोकीळा, संताप  अप्रतिम.
शेवटची  ओळीत  'उ:शाप'  नंतर  पण  प्रश्नचिन्ह  द्यावे.
(का तुझ्या ओठी न येई अजुनही उ:शाप?का?)
पु.ले.शु.

छान....

फूलवेड्या त्या गुलाबाचे जिणे काट्यांमध्ये,
गंधवेड्या चंदनाला वेढलेले साप का?

तू दिलेला जीवनाचा शाप मी स्वीकारला,
का तुझ्या ओठी न येई अजुनही उ:शाप, का?

मतला एकदम जबरदस्त..!!

स्वप्नवेड्या पापण्यांना आसवांचा शाप का?
पुण्यवंतांच्या जगी या पुण्य ठरते पाप का?

तू स्वतः स्वीकारली ही वंचना, ही बंधने,
व्यर्थ हा त्रागा कशाला? व्यर्थ हा संताप का?
very True...
चुभूद्याघ्या...
***********************
वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!!