चार ओळी

===========
खरडल्या  चार  ओळी,
रखडल्या  फार  ओळी..

जिवाला  त्रास  झाला,
अता  सुचणार  ओळी

कसे  एकाग्र  होऊ?
मनावर  स्वार  ओळी

किती  त्वेषात  म्हटल्या
तिने  लाचार  ओळी

व्यथेची  वाफ  झाली..
बरसल्या  गार  ओळी

लिहूया  चल; जिथे  ना-
कुणी  पुसणार ओळी..!

 

 

-ज्ञानेश.
============

गझल: 

प्रतिसाद

लहान बहरातील चांगली गझल..
लिहूया  चल; जिथे  ना-
कुणी  पुसणार ओळी..!.. वा!
-मानस६

गझल आवडली. लाचार आणि पुसणार हे शेर तर विशेष!!


जिवाला  त्रास  झाला,
अता  सुचणार  ओळी
मध्ये एक हलकासा बदल सुचवतो.
जिवाला  त्रास  नाही -
कशा  सुचणार  ओळी?
चु.भू.दे.घे.

बदल छान आहे.
छोट्या बहरातील गझल आवडली.
- चक्रपाणि जीवन चिटणीस

लिहूया  चल; जिथे  ना-
कुणी  पुसणार ओळी..!

खासच खास गझल!क्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}

मित्रा ज्ञानेश,
मनापासून मुकर्र र!
दिल खुश!
खरडल्या  चार  ओळी,
रखडल्या  फार  ओळी..
जिवाला  त्रास  झाला,
अता  सुचणार  ओळी
किती  त्वेषात  म्हटल्या
तिने  लाचार  ओळी
वरील शेर खास!
 

मानस६, पुलस्ति, चक्रपाणि, क्रान्ति- सर्वांचे  आभार!
@पुलस्ति- बदल  छान  वाटतो. मंजूर  आहे ! :)

कशा सुचणार ओळी हा पुलस्तींनी सुचवलेला बदलही छान आहे. पण त्यात खेद आहे. अता सुचणार ओळी ह्या ओळीत बहुधा आनंद आहे, अटळ गोष्टीची प्रतीक्षा आहे. चूभूद्याघ्या.

एकंदर छानशी गझल.

हा शेर खास आवडला..
लिहूया  चल; जिथे  ना-
कुणी  पुसणार ओळी..!