रात्र आली....


रात्र आली चांदण्याना माळुनी
अन पुन्हा गेली जिवाला जाळुनी

देत आलो मी जगाला उत्तरे
प्रश्न माझा राहिला रेंगाळुनी

यामुळे ना मांडला प्रस्ताव मी
वाटले देशील तू फेटाळुनी

वर्षु दे पाऊस स्पर्शाचा तुझ्या
रात्र सारी जाउ दे गंधाळुनी

सौख्य ना आले कधी भेटावया
घेतले दुःखास मी कवटाळुनी

तू दग्याने प्राण माझा घेतला
मी दिला असता तुला ओवाळुनी

                            -वैभव देशमुख


गझल: 

प्रतिसाद

देत आलो मी जगाला उत्तरे
प्रश्न माझा राहिला रे॑गाळुनी

तू दग्याने प्राण माझा घेतला
मी दिला असता तुला ओवाळुनी

विशेष आवडले. प्राण ऐवजी जीव हा शब्द अधिक भावला/खुलला असता असे वाटते. चू.भू.द्या.घ्या.
- चक्रपाणि जीवन चिटणीस

शेर आवडले...
देत आलो मी जगाला उत्तरे
प्रश्न माझा राहिला रे॑गाळुनी

तू दग्याने प्राण माझा घेतला
मी दिला असता तुला ओवाळुनी

ओवाळुनी आणि गंधाळुनी हे शेर फार आवडले!

देत आलो मी जगाला उत्तरे
प्रश्न माझा राहिला रेंगाळुनी

यामुळे ना मांडला प्रस्ताव मी
वाटले देशील तू फेटाळुनी
>> आवडले

गझल आवडली. विशेष आवडलेले शेर
देत आलो मी जगाला उत्तरे
प्रश्न माझा राहिला रेंगाळुनी
सौख्य ना आले कधी भेटावया
घेतले दुःखास मी कवटाळुनी

क्रान्ति