वेडा


देवळाच्या पायरीवर रोज मजला दिसतो वेडा
'पावला का दगड दोस्ता' रोज मजला पुसतो वेडा


देववेड्या सोवळ्यांची मांदियाळी देवापाशी
भरजरी त्या सोवळ्यांना फाटक्याने हसतो वेडा


सांजवेळी रेकतो मी आरतीची कवने काही
मारव्याची तान घेतो सूर लावत बसतो वेडा


पूर सरता भाविकांचा दर्शनाच्या नुरती रांगा
प्रेमवेगे धाव घेतो, देव दिसता रुसतो वेडा


भंगलेल्या देवळाची बंद होता सारी दारे
'देव आला देव आला' भास होतो फसतो वेडा


शोधता मी आज त्याला पायरीवर नव्हते कोणी
दर्शनांती उमगले मग माझियातच वसतो वेडा

गझल: 

प्रतिसाद

'देव आला देव आला' भास होतो फसतो वेडा
ही ओळ छान.
कलोअ चूभूद्याघ्या

कल्पना चांगली आहे.
सांजवेळी रेकतो मी आरतीची कवने काही
मारव्याची तान घेतो सूर लावत बसतो वेडा
छान.

पूर सरता भाविकांचा दर्शनाच्या नुरती रांगा
प्रेमवेगे धाव घेतो देव दिसता रुसतो वेडा
दुसर्‍या ओळीत योग्य ती विरामचिन्हे हवीत, असे वाटले.
शुभेच्छा.

धन्यवाद ज्ञानेश, अजय.
विरामचिन्हांचा बदल केला आहे.

छान....वा..
देवळाच्या पायरीवर रोज मजला दिसतो वेडा
'पावला का दगड दोस्ता' रोज मजला पुसतो वेडा