परीक्षा

कशाला अपेक्षा पुन्हा भेटण्याची?
नको ती परीक्षा पुन्हा विलगण्याची


कितीदा जगाला पुन्हा तेच सांगू?
कुणा काळजी सत्य ते ऐकण्याची?


चव्हाट्यावरी कोणते दु:ख आले?
सवय लागली दु:ख सांभाळण्याची?


अबोल्यात लपले खरे प्रेम होते
चढाओढ होती नजर टाळण्याची


अता भिस्त तुझिया समंजसपणावर
अता फक्त आशा तुझ्या परतण्याची


उभा मीच माझ्या सवे आणि मागे
न भीती मला सावली हरवण्याची


कुणी लाज सोडून फिरतेच आहे
तयारी स्वतःला करा झाकण्याची


उशीरा कळे, चूक माझीच झाली
पुन्हा चेहरा हा खरा मानण्याची


तुझे दाटणेही अवेळीच होते
गरज काय होती तुला बरसण्याची?

गझल: 

प्रतिसाद

चव्हाट्यावरी कोणते दु:ख आले?
सवय लागली दु:ख सांभाळण्याची...

सुंदर कल्पना.
अता भिस्त तुझिया समंजसपणावर
अता फक्त आशा तुझ्या परतण्याची

कुणी लाज सोडून फिरतेच आहे
तयारी स्वतःला करा झाकण्याची

हे ही  छान.
शुभेच्छा.

उभा मीच माझ्या सवे आणि मागे
न भीती मला सावली हरवण्याची

सुंदर !!

प्रसन्न शेंबेकर
"तुझी जागण्याची अदा पाहिली
फुले आरतीला उभी राहिली"

वाह..! सुंदर गझल.
हा शेर मस्तच.
तुझे दाटणेही अवेळीच होते
गरज काय होती तुला बरसण्याची?

उभा मीच माझ्या सवे आणि मागे
न भीती मला सावली हरवण्याची
खास शेर!

प्रसन्न, चांदणी, क्रांती,
धन्यवाद....
चुभूद्याघ्या...
***********************
वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!!