मराठी गझलचे 'तंत्र’-काही प्रश्न.

'कुसुमाकर’च्या जून 2008 च्या अंकात, 'पुस्तक परिचय'सदरात श्री. डी. एन्. गांगण ह्यांनी माझ्या 'खयाल’संग्रहावर आस्वादक लिहिले आहे. त्यांचा व संपादकांचा मी आभारी आहे. कविवर्य पाडगावकर म्हणतात त्याप्रमाणे, एका कवीने दुसऱया कवीला दाद देणे अवघड असते! श्री. गांगण स्वतः गझल लिहीत असूनही त्यांनी अशी दाद दिली आहे माझा प्रस्तुत लेख काही तांत्रिक मुद्यांसंदर्भातच आहे.

त्यावर अधिक चर्चा व्हायला हवी. ह्या मुद्यावर संपादकांनी ज्येष्ठ गझलकार/समीक्षक ह्यांच्याकडून लेख मागविल्यास चांगले विचारमंथन होऊ शकेल महत्वाचे तीन मुद्दे असे आहेत-
1. मराठी मात्रिक छंदात'- गझल लिहिणे मान्य आहे का? (कै. भटांसह अनेक कवीनी लिहिल्या आहेत. हिंदी व गुजराथीत सुद्धा लिहिल्या जातात.) - जर मान्य असेल तरच हा मुद्दा उपस्थित होतो- जर कवीने मात्रिक छंदातगझल लिहिली, व योगायोगाने, 'मतला’, एखाद्या फारसी 'बहर'मध्येही ('ल. ग'क्रम सांभाळणाऱया) असला, तर गझलकाराला पुढील शेरात मात्रिक - छंद वापरण्याची मुभा आहे की नाही? की फारसी- 'बहर'वापरणेच अनिवार्य आहे? असल्यास का? (हा मुद्दा उदाहरणाने पुढे स्पष्ट होईल.)

2. मतल्याच्या दोन्ही ओळीतल्या काफियात, एकापेक्षा अधिक अक्षरे 'प्रस्थापित'(establish) झाली तर, ती सगळी अक्षरे पुढील सर्व काफियात establish व्हायलाच पाहिजेत का? उदा. 'प्रवास/निवास'असे काफिये मतल्यात असतील
तर 'हास'हा काफिया मराठीत चालत नाही उर्दूत चालतो असे का? अनेक उर्दू शायरांनी व प्रस्थापित मराठी कवींनी हा नियम डावलला आहे- त्याचे स्पष्टीकरण काय? 3. उर्दू गझलमध्ये - पूर्वापार 'स्वरांचा काफिया'सर्रास वापरला
जातो. उदा. मतल्यात '....रोषणाई करा / दिवाळी करा'असे असेल तर'रोषणाई/दिवाळी'हे काफिया उर्दुप्रमाणेयोग्य ठरतात. इथे 'ई'स्वर हाच काफिया झाला. (अलामतीचे बंधन नाही.) ह्याला काही मंडळी 'सौती काफिया’ही म्हणतात. कै.भटांनी मान्यता दिली नाही एवढेच कारण सयुक्तिक व पुरेसे आहे काय? अन्य कारणें असल्यास कोणती? इथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी की, वरील मुद्दे, पद्धतशीर (systematic) शब्दांकन करून मी मांडले आहेत. खरे तर चर्चेसाठी मला जे मुद्दे उपस्थित करायचे आहेत, ते झाले आहेत. त्यामुळे ह्या लेखाचे प्रयोजन इथेच पूर्ण होते. मात्र ह्या मुद्यांवर सोदाहरण चर्चा झाली तर अधिक बरे असेही वाटते.


पहिला मुद्दा : आक्षेप

“... एका गझलमध्ये असं आढळून आलं की, मतल्याच्या शेरात व त्यानंतर आलेल्या शेरात जे व़ृत्त 'सिद्ध'(एस्टॅब्लीश झालेलं) आहे, ते त्यापुढील शेरांतून सांभाळलेलं नाही. वाचकांच्या माहितीसाठी त्या गझलचा मतला व तिसराशेर देतो
मतला:
'मी असंख्य चेहऱयात विखरलो असा
आरशासमोर एक आरसा जसा।’

शेर :
'चांदण्यात चाफ्याचे झाड असावे
गंध तुझा आसपास दर्वळे तसा।’

आक्षेपात वृत्त हा शब्द वापरला आहे. 'व़ृत्त'हा शब्द सहसा' अक्षरगणव़ृत्ताचे'लघुरुप म्हणून वापरतात. मराठी अक्षरगणवृत्तात +(किंवा 'वृत्तात’) तीन अक्षरांचाच 'गण'असतो. (जसे 'य’गण म्हणजे 'यमाचा’- लगागा) त्याचप्रमाणे अक्षरसंख्या व 'ल-ग'क्रम निश्चित असतो. एका 'गुरू'ऐवजी 'दोन लघु’-अक्षरगणवृत्तात घेता येत नाहीत. कारण उघड आहे की, तसे केल्याने अक्षरसंख्या वाढते, पर्यायाने 'गण'बदलतात व त्यामुळे 'वृत्त'बदलते किंवा चुकते! वरील मतल्यात 'विखरलो'ह्या शब्दात एका 'गुरु’ऐवजी दोन लघु घेतले आहेत. त्यामुळे पहिल्या ओळीत 14 अक्षरे आहेत. दुसऱया ओळीत 13 अक्षरे आहेत, 'ल-ग क्रम
वेगळा आहे, त्यामुळे 'अक्षरगणवृत्त'किंवा 'वृत्त'सिद्धच होत नाही! मात्र मात्रांची संख्या 'वीस’च असल्याने छंद सिद्ध होतो असो. हा केवळ युक्तीवादाचा भाग झाला.
आक्षेपातत 'वृत्त'ह्या शब्दाने - 'फारसी’- 'बहर'अभिप्रेत आहे. हे आपण मान्य करु या. ते मान्य केल्यास वरजो शेर दिला आहे. त्यातले 'चाफ्याचे झाड'हे शब्द योंग्य ठरणार नाहीत. 'गाल गाल...'ह्या क्रमात चार 'गा'असा 'क्रम'येऊ शकणार नाही.
आता कवीच्या बाजूने विचार करु. 'मी असंख्य चेहऱयात विखरलो असा'- ही ओळ मला 'सुचली'त्या ओळीशी आणि 'खयालाशी'मनाने खेळतांना त्याचे 'वजन'6-6-8 म्हणजे एकूण 20 म़ात्रा असल्याचं जाणवलं. ते वजन आणि 'लय'मनात घोळवत मी गझल पूर्ण केली. आपण मात्रिक छंदात लिहितो आहोत, एवढीच माझी धारणा होती. त्यामुळे अक्षरसंख्या किंवा 'ल-ग'क्रम ह्यांचे कधीही बंधन मला नव्हते. बंधन होते फक्त एकूण मात्रा व यती ह्यांचे. ते मी सांभाळले.
(यतीभंग हा मोठा दोष मानला जात नाही.) मात्रिक छंदात (ज्याचे नाव 'धवलचंद्रिका'आहे- हे मला डॉ. राम पंडितांकडून कळले-त्याबद्दल त्यांना धन्यवाद!) छंददृष्टांना ही गझल निर्दोष आहे, असे माझे ठाम मत आहे. चित्रकलेत काही गमतीदार रेखाटने असतात. त्याला 'पॅरॅडाइम'किंवा 'गिमिक'म्हणतात- ज्यात एका रेखाटनात दोन चित्रे दडलेली असतात. उदा. एका कोनातून त्या चित्रात 'सुंदर राजकन्या'दिसते, तर कोन जरा बदलला की, 'म्हातारी चेटकीण'दिसते! (मात्र एकाचवेळी दोन्ही चित्र कधीच दिसत नाहीत.) वरील मतला तसाच आहे. मग ह्यावर उपाय काय? मला एक उपाय सुचतो आहे, गेल्या शतकातील कवींप्रमाणे कवितेच्या शीर्षकाखाली,
कंसात छंद/वृत्त वगैरे नमूद करायचे. प्रस्तुत गझल सोबत मी 'मात्रिक छंद : धवलचंद्रिका'असे छापले असते- तर मतभेदाचा प्रश्र उपस्थित झाला नसता! (मात्रिक छंदात -गझल मान्यच न करणारी काही मंडळी आहेत.)


दुसरा मुद्दा : आक्षेप


काही इतर दोषही (म्हणजे 'काफियांची जमीन'पुढील शेरात न सांभाळणे, असे) आढळले. उदा. पृष्ठ. 23, 33, 34 वरील गझला पहाव्यात. पण आशयाच्या दृष्टीने इतर गझलांसारख्याच त्या चांगल्या आहेत.संदर्भित गझलांचे दोन-दोन शेर नमूद केल्याशिवाय चर्चा होणार नाही. ते नमूद करून हा मुद्दा बघू या.
पृ.23 मतला :
 'हे जिणेही मौज आहे मानले तर
दीर्घ हे आयुष्य आहे ताणले तर
शेर :
बंद या खिडक्या मनाच्या उघड आता
वाहु दे वारे नवे हे वाहिले तर
काफियाचे अक्षर - 'ले’- अलामत 'अ'प्रचलित नियमाप्रमाणे 'अ''इ''उ’- असे अलामतीचे स्वर घेता येतात- फक्त ते मतल्यात (एस्टॅब्लिश) व्हायला हवे. कै. सुरेश भटांनी सुरुवातीला हे पाळले नाही, नंतर चूक मान्यही केली. मीही मान्य
करतो. फक्त एकच म्हणेन की- 'ताणले'हया ऐवजी 'पाहिले'हा शब्द मी वापरू शकत होतो- पण ही चूक जाणीवपूर्वक आहे,
कारण 'आयुष्य पाहिले तर'आणि '... आयुष्य ताणले तर'ह्यात फरक आहे. 'ताणण्याचा'भाव नष्ट झाला तर 'खयाल'हवा तो येत नाही. आपल्या 'खयालाशी'इमान राखायचे की तंत्राशी ? हा ज्या / त्या कवीचा प्रश्र आहे. एकूणच 'अलामती'संदर्भात आपण फार हळवे आहोत का? मी 'गालिब’चे एक चक्रावून टाकणारे उदाहरण देतो. गालिबचा मतला :
'इश्क तासीर से नोमीद नहीं
जां-सुपारी शजरे-बेद नहीं’
(तासीर म्हणजे प्रभाव. नोमीद म्हणजे निराश. जा-सुपारी म्हणजे जान निछावर
करना. शजरे बेद म्हणजे बेद का पेड, निष्फळ वृक्ष)
इथे 'नोमीद'आणि 'बेद'काफिये आहेत. तर 'नहीं’रदीफ आहे. अलामत सकृतदर्शनी तर 'ई'(नोमीद) व 'ए'आहे. ('बेद’) हे कसे? पुढील शेरांत काफिये आहेत. 'जमशेद नहीं’, 'खुर्शीद नहीं’, 'जावेद नहीं’, 'उम्मीद नहीं'ह्या काफियांमध्ये
असे दिसेल की अलामत म्हणून 'ई'किंवा 'ए'सांभाळले आहेत. कदाचित माझ्या समजण्यात काही चूक असेल. कदाचित देवनागरीतलिप्यंतर केल्याने असे होत असेल 'गालिब'चूक नाहीच. पण इथे नियमांचे काही बारकावे आहेत का? जाणकारांनी ह्यावर प्रकाश टाकावा. पर्शियन लिपीत- 'उमीयद/बयद'असे लिहिले
जाते का?
आता वरील न्यायाने जर मी मराठीत मतला लिहिलाः-
'मी तुला ताकीद देतो
वल्गनेला छेद देतो-’
तर तो मान्य होईल का?-अर्थातच नाही!- 'आधी तुम्ही गालिब व्हा, मग चुका करा!'-असं मी स्वतःलाच बिनदिक्कत सांगेन! पण-गझल -तंत्राचा कीस पाडणाऱयांसाठी - प्रश्र शिल्लक राहतोच! असो.
पृष्ठ 33 : मतला :
'षडज् पंचम छेडता मी जागला गंधार हा
विरघळाया लागला अन् आतला अंधार हा’
अन्य काफिये : जोहार, उद्गार, होकार, ओंकार
पृष्ठ 34 : मतला :
'सांजवेळी सावल्यांचा मारवा’
गात जातो दूर कोठे कारवा
अन्य काफिये : दुवा, थवा, नवा, दिवावरील
दोन्ही उदाहरणांवर मुख्य आक्षेप असा की, पहिल्या उदाहरणात 'धार'establish झाले व (अं) ही अलामत आहे, म्हणजे पुढील काफिये 'बंधार''कंधार'अशा प्रकारचेचहवेत. दुसऱया उदाहरणात 'रवा'establish झाले, अलामत 'आ'आहे. म्हणजे पुढील काफिये 'आरवा''सारवा'असेच हवेत. या नियमातून पळवाट म्हणजे मी मतल्यातच अनुक्रमे 'गंधार/होकार'असे आणि 'मारवा/थवा'असे करायचे. म्हणजे कवी व त्याची गझल दोषमुक्त होईल! आपल्या खयालाचा गळाघोटायचा की दोष पत्कारायचा हे ज्याचे त्याने ठरवावे. मात्र रपहिल्या उदाहरणात अनुस्वार युक्त काफिया असल्याने ही पळवाट उपयोगी नाही. कै. सुरेश भटांची अशी उदाहरणे, जी आपण चूक मानीत नाही, तीच (कै.) आनंद आडे ह्यांच्या मते चूक आहेत. ती अशी-
1. 'सोडून तुझा गेलो संसार तुझ्यासाठी
माझी न हवा झाली आधार तुझ्यासाठी’
2. 'एकमेकांना कसे चावती कुत्रे’
हाडकासाठी कसे भांडती कुत्रे’
तेव्हा एका नियमातून सुटलेला कवी, दुसऱया नियमात अडकणार त्यापेक्षा तंत्राचा दोष पत्करून - कवीने अंतःप्रेरणेशी इमान राखावे- हे बरे! अर्थात वाद नको म्हणून किंवा वादापुरते म्हणून मी हे मान्य करतो आहे. मतल्यातल्या काफियात establish होणारी सर्व अक्षरे जशीच्या तशी आली पाहिजेत हा आग्रह चुकीचा
आहे. कारण इन्शा, मीर, गालिब ह्यांच्या काळापासून (17 वे शतक) - म्हणजे जेव्हा नियम झाला असेल, तेव्हापासून हा नियम मोडायलाही सुरुवात झाली आहे! मी दोन ऐतिहासिक उर्दू कवी, दोन विद्यमान उर्दू कवी व दोन विद्यमान मराठी कवींची उदाहरणे देतो. ही वानगीदाखल आहेत- उदाहरणे अनेक आहेत.
ज्यामुळे ह्या नियमावर प्रश्रचिन्ह लागते.
(१) इन्शा (इ. स. 1756 ते 1917)
मतला :
'कमर बांधे हुए चलने को यां सब यार बैठे है’
बहुत आगे गए, बाकी जो है तैयार बैठे है
इथे 'यार'establish झालं म्हटलं तर अलामत चुकते. ती मान्य करु. कारण पुढील काफिये आहेत- 'बेजार, मयस्वार, दीवार, दो चार'इ. माझ्यामते इथे फक्त 'र'establish झाला- अलामत 'आ’; म्हणजे चूक नाही- मराठीत मात्र अलामत चुकली असे म्हणतात.

(२) गालिब (इ. स. 1797 ते 1869)
मतला :
'नुक्ताची है गमे-दिल'उसको सुनाए न बने
क्या बने बात जहां बात बनाए न बने
इथे 'नाए'establish झाला, (अ) - (उ) ही अलामत योग्य आहे. पुढील काफिये आहेत- 'बिन आए, सताए, छुपाए, लगाए, बुलाए'इ. म्हणजे 'नाए'establish होऊनही पाळले नाही. ह्याचा अर्थ 'नाए’- पुढे सांभाळला नाही.

(३) निदा फाजली (विद्यमान) :
'अपना गम ले के कहीं और न जाया जाये’
घरमें बिखरी हुई चीजोंको सजाया जाये
इथे 'जाया'establish झाले. अलामत (अ) पुढील काफिये- 'रुलाया, बचाया, उडाया, सताया, हंसाया'इथे 'जाया'सांभाळलेले नाही. अर्थात नियमभंग मराठी मंडळीच्या मते. उर्दू मध्ये ही गझल निर्दोष असावी.
(४) शहरयार (विद्यमान)
'इस जगह ठहरूँ या वहाँ से सुनूँ
मैं तेरे जिस्म को कहाँ से सुनूँ’
काफिया : वहाँ, कहाँ म्हणजे 'हाँ' establish झाले. अलामत 'अ’.
पुढील काफिये : दरमियाँ, कमाँ, आसमाँ, जवाँ, अर्थात ही गझल 'सौती काफियाची आहे असे म्हणता येईल, पण मग मतल्यात 'वहाँ से/ कहाँ से'मेजंइसपी झाले त्याचे काय? निदा फाजली व शहरयार दोघेही साहित्य अकादमी पुरस्कृत
आहेत.
(5) मनोहर रणपिसे : (विद्यमान-मराठी)
मतला :
 'मी असा शब्दांविणा बोलायला शिकलोय आता
पापण्यांवर आंसवे तोलायला शिकलोय आता’
मतल्याच्या काफियात- 'लायला'प्रस्थापित. अलामत -
'ओ'अन्य काफिये- वाचायला, सजवायला, विझवायला,
बुजवायला... इ.
(6) दिलीप पांढरपट्टे : (विद्यमान-मराठी)
मतला :
'कालचा प्रवास पुन्हा
तोच विजनवास पुन्हा’
'वास'प्रस्थापित झाले आहे. अलामत- 'अ’अन्य काफिये : हास, पास, त्रास. आता वरील सर्व उदाहरणात- गालिबपासून - पांढरपट्टेंपर्यंतसर्व शायर चूक! असे कोणीही नियम दाखवून म्हणू शकेल. पण जर 17 व्या शतकापासून, प्रसंगोपात हा नियम मोडला जात असेल, तर 'हा नियम मोडणे क्षम्य आहे'असा उपनियमही असेल, जो आम्हाला माहीत नाही. जाणकारांनी ह्यावर मार्गदशन करावे. माझ्यामते, दोन कारणांनी हा नियम मोडणे क्षम्य ठरले असावे.

पहिले कारण :
हे सर्व काफिये (त्या त्या गझलचे) एकाच 'संचातले'आहेत. म्हणजे फक्त मतल्यातल्या एका काफियाची कुठल्याही शेरातल्या एका काफियाशी 'अदलाबदल'केली तरगझल निर्दोष होते! काफियाचा 'संच'तोच राहतो! म्हणजे 'स्थान’
चुकले- काफिया चुकलेला नाही!
दुसरे कारण : establish झालेली सर्व अक्षरे सांभाळली नसलीतरी, शेवटचे अक्षर व त्याआधीचा 'स्वर'(अलामत) सर्व उदाहरणात सांभाळली आहे. म्हणजे 'जाया/सजाया'काफिया असेल तर 'रुलाया/सताया'आहे. 'सैया''खोया'असे नाही!
ज्यांना आवश्यक वाटत असेल त्यांनी शोध घेऊन काही 'उपनियम'आहे का हे सांगावे. 'अ'अलामत असेल तर 'इ.'किंवा 'उ'चालते- तशीच ही सवलतही मान्य असावी, नव्हे आहे- हे उर्दूतल्या अनेक उदाहरणांवरून सिद्ध होते!

तिसरा मुद्दा :स्वरांचा काफिया, सौती काफिया किंवा 'सौती अहंग'उर्दूमध्ये ऐतिहासिक कालापासून रुढ आहे. आज उर्दूतलीबव्हंश गझल तशी लिहिली जाते. मराठीने तो प्रकार स्वीकारायला हरकत नाही. ज्यांना पसंत नसेल त्यांनी स्वीकारू नये. पण जे कोणी वापरत असतील, त्यांना 'चूक'ठरवायची घाई करू नयेमराठी
गझलच्या प्रारंभ काळात, तो न स्वीकारणे योग्यही असेल. न स्वीकारण्याचे कारण कै. सुरेश भटांनी, एकदा प्रस्तुत लेखकाशी बोलतांना स्पष्ट केले होते, पण त्यावेळी साक्षीदार म्हणून तिसरा कोणी उपस्थित नव्हता, किंवा त्यांचे लेखी पत्रही माझ्याकडे नाही, तसेच गुरुवर्य भट आज हयात नाहीत- त्यामुळे मी मौन पाळणे योग्य.


प्रतिसाद

सौती काफिया न स्वीकारण्याचे कारण कै. सुरेश भटांनी, एकदा प्रस्तुत लेखकाशी बोलतांना
स्पष्ट केले होते, पण त्यावेळी साक्षीदार म्हणून तिसरा कोणी उपस्थित
नव्हता, किंवा त्यांचे लेखी पत्रही माझ्याकडे नाही, तसेच गुरुवर्य भट आज
हयात नाहीत- त्यामुळे मी मौन पाळणे योग्य.

त्यांनी कोणचे कारण सांगीतले होते ते समजल्यास आभारी राहीन.

धन्यवाद!

नमस्कार,
लेखा ची विषय  वस्तु छान तशीच आवश्यक आहे.
नियम आणी अपवाद ह्यां साठी  खालील पुस्तके पहावी त.
१. Persian Prosody by Krishnalal zavery ( In Persian - Rare Book. Out of publication now)
2. Armughan-e-Aruuz. by Kundan Lal Kundan ( In Urdu )- ISBN - 81-901709-3-7.
You may get it from any recognised book store from Delhi.
* The art of developing meters is well explained with examples here.
नियाझमंद,
` खलिश ' - विठ्ठल  घारपुरे / अहमदाबाद / २०-०६-२००९.