वर्तुळाबाहेर माझ्या...

................................
वर्तुळाबाहेर माझ्या...
.................................

गायचे आहे; तरीही गात नाही मी !
तेवढा झंकारलेला आत नाही मी !

चालला खोलात माझा पाय; जाऊ द्या...
(का दिला तेव्हा कुणाला हात नाही मी ?)

मी न मृत्यू पावलो वा जन्मलो नाही...
अंतही नाही; तशी सुरुवात नाही मी !

ही चकाकी फार पूर्वीचीच नाही का...?
टाकली इतक्यात माझी कात नाही मी ! 

ओळखू येतात माझेही मला कावे...!
तेवढा आता मला अज्ञात नाही मी !!

बोललो नाही तुझ्याशी चूक ही झाली...
का म्हणू -`चुकलो कधी अजिबात नाही मी !`

मोडल्या केव्हाच साऱ्या चौकटी; आता -
- वर्तुळाबाहेर माझ्या जात नाही मी !

- प्रदीप कुलकर्णी
गझल: 

प्रतिसाद

भन्नाट.....
गायचे आहे; तरीही गात नाही मी !
तेवढा झंकारलेला आत नाही मी !

मक्ता अप्रतिम. गझल आवडली.
सोनाली


ओळखू येतात माझेही मला कावे...!
तेवढा आता मला अज्ञात नाही मी !!
वाव्वा

मोडल्या केव्हाच साऱ्या चौकटी; आता -
- वर्तुळाबाहेर माझ्या जात नाही मी !
भले शाब्बास..

गझल अगदी आवडली.

सुरेख  गझल.
ओळखू येतात माझेही मला कावे...!
तेवढा आता मला अज्ञात नाही मी !!

मोडल्या केव्हाच साऱ्या चौकटी; आता -
- वर्तुळाबाहेर माझ्या जात नाही मी !


 

म्हणतो.
वरील दोन शेर चमकदार.

दिलखुलास प्रतिसादांबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. लोभ आहेच; असाच राहू द्यावा.

हात आणि चौकटी हे शेर फार आवडले. मतलाही फारच सहजसुंदर!!

प्रदीपराव,

नेहमीप्रमाणेच अत्त्युत्तम