तू परतून यावे

ती भल्या पहाटे कधी भेटली नाही
पण रात्र कधीही तिने टाळली नाही


'ती भेटे मज' हे पाहुन काही रडले
उरलेल्यांना ती तार पोचली नाही


ती टींगल होती नव्हते सांत्वन काही
मज कळण्याइतकी नशा साधली नाही


मी रक्त ओकले मनोरंजनासाठी
पण तहान त्यांची तरी भागली नाही


तू परतुन यावे घराकडे आईच्या
ही साद कुणी आईस घातली नाही


वेदना तुझी जगवत नाही कोणाला
कारण, तितकी रक्तांत मिसळली नाही


तो शब्दांमागे धावुन संपुन गेला
पण तिथे जराही गझल थांबली नाही


ते जोडत बसले लघू-गुरूंच्या माळा
पण गाठ कुणी 'अर्थास' बांधली नाही


प्रतिभेला मिळती शेले - पाहुन कुढता
तुमची का तुम्ही अजून दावली नाही


मी शब्द कुणा दुसर्‍याचे चघळत नाही
मज भूक तशीही कधी लागली नाही

गझल: 

प्रतिसाद

गझल आवडली. पण शीर्षकात परतून आणि द्विपदीत परतुन हे कसे?
sarvacyaa sarva sher aavaDale.