...वजन एखादे नवे !

......................................
...वजन एखादे नवे !
......................................


दुःख तू केलेस कोठे सहन एखादे नवे ?
सांग ना तुज का सुचावे कवन एखादे नवे ?


या जुन्या आकाशगंगा; चंद्र-तारेही जुने...
शोधतो आता मला मी गगन एखादे नवे !


झिंग एखादी अशी की, जी कधी उतरू नये...
पाहिजे माझ्या मनाला व्यसन एखादे नवे !


नाव आधीचे तसे जाईल का पुसले कधी ?
नाव तू केलेस कोठे मनन एखादे नवे ?


क्षीणसा आवाज आला जीर्ण कायेतून या -
`पाहिजे मज पांघराया वसन एखादे नवे ! `


उत्तरे मिळतीलही त्यातून तुज काही जुनी ...
घाल तू दुनियेस कोडे गहन एखादे नवे !


शब्द सारे भासती मज मोडकी-पडकी घरे....
पाहिजे अर्थांस माझ्या सदन एखादे नवे !


काय मी मागून आता मागतो आहे तुला ?
मो़डण्यासाठी तरी दे वचन एखादे नवे !!


आजच्या छंदात कविता वाटते हलकी मला...
मी उद्या शोधीनसुद्धा वजन एखादे नवे !


- प्रदीप कुलकर्णी


 


 


 


 


 


 


 


 


 


  

गझल: 

प्रतिसाद

छान आहे गझल..
दुःख तू केलेस कोठे सहन एखादे नवे ?
सांग ना तुज का सुचावे कवन एखादे नवे ?
शब्द सारे भासती मज मोडकी-पडकी घरे....
पाहिजे अर्थांस माझ्या सदन एखादे नवे !
उत्तरे मिळतीलही त्यातून तुज काही जुनी ...
घाल तू दुनियेस कोडे गहन एखादे नवे !
या जुन्या आकाशगंगा; चंद्र-तारेही जुने...
शोधतो आहे अता मी गगन एखादे नवे !
हे खास!!
शेवटचा शेर नाही समजला..
 

प्रत्येक शेर अगदी आरपार..... !!
एक कडक सॅल्यूट !!

मस्त गझल! कोडे आणि वजन शेर तर फारच आवडले!!

शेवटचे दोन अतिशय आवडले. मस्त गझल!

मतला, व्यसन, सदन, गहन  हे  शेर  आवडले.
धन्यवाद.

काय मी मागून आता मागतो आहे तुला ?
मो़डण्यासाठी तरी दे वचन एखादे नवे !!
वा! व्वा!
आजच्या छंदात कविता वाटते हलकी मला...
मी उद्या शोधीनसुद्धा वजन एखादे नवे !
व्वा!
मनापासून आवडले.
कलोअ चूभूद्याघ्या

अख्खी गझल नेहमीप्रमाणेच वजनदार.

या जुन्या आकाशगंगा; चंद्र-तारेही जुने...
शोधतो आता मला मी गगन एखादे नवे !
वाव्वा..

आजच्या छंदात कविता वाटते हलकी मला...
मी उद्या शोधीनसुद्धा वजन एखादे नवे !
वाव्वा

काय मी मागून आता मागतो आहे तुला ?
मोडण्यासाठी तरी दे वचन एखादे नवे !!
वाव्वा.. सध्या हे शेर गुणगुणतो आहे.

या जुन्या आकाशगंगा; चंद्र-तारेही जुने...
शोधतो आता मला मी गगन एखादे नवे !
आजच्या छंदात कविता वाटते हलकी मला...
मी उद्या शोधीनसुद्धा वजन एखादे नवे !
 
हे दोन खूप आवडले

भन्नाट...
या जुन्या आकाशगंगा; चंद्र-तारेही जुने...
शोधतो आता मला मी गगन एखादे नवे !

कवन आणि वसन या शब्दान्चा अर्थ?
सगळेच शेर छान. शेवटचा वेगळा आणि फारच छान
 Dhananjay