...मी नवा-निराळा आशय !

.......................................................
...मी नवा-निराळा आशय !
.......................................................

एवढीच ओळख माझी; एवढाच माझा परिचय !
रोजच्याच शब्दांमधला मी नवा-निराळा आशय !

सोस का तुला हा इतका ? थांबवून करशी सांत्वन...
सोसण्यात माझ्या आता हा तुझा असा का व्यत्यय ?

कोरडे तुम्ही अश्रूंनो ! दाखवा जरा अपुलेपण...
वाळवंट आयुष्याचे मी करू कशाने जलमय ?

वाकवू बघे मज दुनिया...वाकणार नाही मी पण...
मोडलो़; तरीही केला मी पुन्हा पुन्हा हा निश्चय !

ऐकवे न दारावरची सारखी मलाही टकटक...
पाहिजे तिथे दुःखाला शेवटी मिळाला आश्रय !

तू सदेह यावे हृदयी काढता तुझा मी आठव...!
मी तुझ्या निराकाराला पाहण्यात व्हावे तन्मय !!

जे घडायचे त्याची का बांधता न आली अटकळ ?
का घडून गेले त्याचा लावता न आला अन्वय ?

नेहमीच विश्वासाने बोलतो जरी दोघे जण....
का तरी तुलाही माझा अन् तुझा मलाही संशय ?

वाटते तसे हे सोपे; पण तसे किती हे अवघड...!
नेटके असावे लिहिणे...रोकडा असावा प्रत्यय... !!

- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

प्रदीपजी, अप्रतिम गझल !! तुमच्या  काही  सर्वश्रेष्ठ  गझलांत हिचा समावेश होईल.
सोसण्यात माझ्या आता हा तुझा असा का व्यत्यय ?
सुरेख!
हे शेर  फारच आवडले-
ऐकवे न दारावरची सारखी मलाही टकटक...
पाहिजे तिथे दुःखाला शेवटी मिळाला आश्रय !
तू सदेह यावे हृदयी काढता तुझा मी आठव...!
मी तुझ्या निराकाराला पाहण्यात व्हावे तन्मय !!
जे घडायचे त्याची का बांधता न आली अटकळ ?
का घडून गेले त्याचा लावता न आला अन्वय ?
नेहमीच विश्वासाने बोलतो जरी दोघे जण....
का तरी तुलाही माझा अन् तुझा मलाही संशय ?

वाटते तसे हे सोपे; पण तसे किती हे अवघड...!
सहमत!!!

ऐकवे न दारावरची सारखी मलाही टकटक...
पाहिजे तिथे दुःखाला शेवटी मिळाला आश्रय !वा!
जे घडायचे त्याची का बांधता न आली अटकळ ?
का घडून गेले त्याचा लावता न आला अन्वय ?चांगला आहे.

नेहमीच विश्वासाने बोलतो जरी दोघे जण....
का तरी तुलाही माझा अन् तुझा मलाही संशय ?वाव्वा! मस्त!

दमदार गझल..प्रत्येक शेर खणखणीत.
भटांच्या गझलांची जशी एक खासियत आहे तशीच आपल्या गझलांची सुध्दा आहे.
 
मतला आणि टकटक सुंदर.    टकटक = मस्तच.
मात्र, बाकी सर्व मला तरी विरोधाभासची (कि विरोधी शब्दांची) जुळवाजुळव वाटली.
अगदी जसेच्या तसे सुचले असेल तर उत्तमच.
कलोअ चूभूद्याघ्या

अख्खी गझल फारफार आवडली. "नेटके असावे लिहिणे रोकडा असावा प्रत्यय" ह्याची प्रचीती देणारी :). 

नेहमीच विश्वासाने बोलतो जरी दोघे जण....
का तरी तुलाही माझा अन् तुझा मलाही संशय ?
वा!

ऐकवे न दारावरची सारखी मलाही टकटक...
पाहिजे तिथे दुःखाला शेवटी मिळाला आश्रय !
फारच सुरेख! क्या बात है.

सोस का तुला हा इतका ? थांबवून करशी सांत्वन...
सोसण्यात माझ्या आता हा तुझा असा का व्यत्यय ?
फारच सुरेख!

प्रदीप, गझल अतिशय आवडली.
आश्रय, संशय आणि मक्ता तर फार अप्रतिम आहेत.
सोनाली

दमदार मतला व मक्ता
सोस का तुला हा इतका ? थांबवून करशी सांत्वन...
सोसण्यात माझ्या आता हा तुझा असा का व्यत्यय ?.. वा!

तू सदेह यावे हृदयी काढता तुझा मी आठव...!
मी तुझ्या निराकाराला पाहण्यात व्हावे तन्मय !!.. सर्वांचा प्रवास निरंतर ह्याच दिशेने होत रहावा.. ही द्विपदी अतिशय आवडली..

ऐकवे न दारावरची सारखी मलाही टकटक...
पाहिजे तिथे दुःखाला शेवटी मिळाला आश्रय !... वा!

जे घडायचे त्याची का बांधता न आली अटकळ ?
का घडून गेले त्याचा लावता न आला अन्वय ?.... ह्याचे संदर्भ तर काळाच्याही पलिकडील आहेत... वा!-मानस६प्रतिसाद देणाऱ्या सगळ्यांचे मनापासून आभार. लोभ आहेच; असाच राहू द्यावा.

पुर्ण गझल खणखणीत!!

नेहमीच विश्वासाने बोलतो जरी दोघे जण....
का तरी तुलाही माझा अन् तुझा मलाही संशय ?

वाटते तसे हे सोपे; पण तसे किती हे अवघड...!
नेटके असावे लिहिणे...रोकडा असावा प्रत्यय... !!
 
वाह ! वाह ! . सुंदर

टकटक, अटकळ आणि प्रत्यय हे शेर फार आवडले!!

अप्रतिम....
सोसण्यात माझ्या आता हा तुझा असा का व्यत्यय ? 
पाहिजे तिथे दुःखाला शेवटी मिळाला आश्रय!
बढिया!!!!!!!!! 
- नचिकेत

सगळेच शेर सुरेख
 
आश्रय ..आणि संशय........ हे दोन खूप आवडले

पूर्ण सहमत!

जयन्ता५२

...उत्तम !(नेहमीप्रमाणे)