सखे ठोठावते आहेस कुठले दार देहाचे?

तुझ्यावाचून संध्याकाळ माझी लांबली होती
तुझ्या पदरात सोनेरी उन्हे मी बांधली होती

सुखाची काळजी काही करावी लागली नाही
मुळी दु़:खेच माझी दीनवाणी, गांजली होती

भले झाली असावी वेळ झोपेची, कसा झोपू?
तुझ्या डोळ्यांतली स्वप्ने मगाशी भांडली होती

सखे ठोठावते आहेस कुठले दार देहाचे?
अशी ही कोणती इछा? कुठे मी डांबली होती?

सुदैवाने तिला प्रेमात हे कळलेच नाही की
बरा होतो जरासा मी, तशी ती चांगली होती

खरे तर चंद्र केव्हाचा मला विसरून गेलेला
कधीची चांदणी दारात माझ्या टांगली होती

तुझ्या सोईप्रमाणे हातचे धरलेस तू मजला
स्वतःची आकडेवारी कुठे मी मांडली होती?

गझल: 

प्रतिसाद

अनेक दिवसांनी आपली ताजी ताजी गझल वाचायला मिळाली.




व्वा..छान..
सखे ठोठावते आहेस कुठले दार देहाचे?
अशी ही कोणती इछा? कुठे मी डांबली होती?

सुरेख.
कलोअ चूभूद्याघ्या

तुझ्या सोईप्रमाणे हातचे धरलेस तू मजला
स्वतःची आकडेवारी कुठे मी मांडली होती?
वा! छान. काही सुट्या ओळी तर फार लाघवी झाल्या आहेत. गझलही छान.
जमायचे न एक हातचेच राखणे
(जमायच्या तशा मला कठीण बेरजा!)
ह्या अस्मादिकांच्या ओळी आठवल्या.



सुखाची काळजी काही करावी लागली नाही
मुळी दु़:खेच माझी दीनवाणी, गांजली होती

भले झाली असावी वेळ झोपेची, कसा झोपू?
तुझ्या डोळ्यांतली स्वप्ने मगाशी भांडली होती
आवडले.


तुझ्यावाचून संध्याकाळ माझी लांबली होती
तुझ्या पदरात सोनेरी उन्हे मी बांधली होती
- छान. विशेषतः पहिली ओळ.
सुखाची काळजी काही करावी लागली नाही
मुळी दु़:खेच माझी दीनवाणी, गांजली होती
- वा...
भले झाली असावी वेळ झोपेची, कसा झोपू?
तुझ्या डोळ्यांतली स्वप्ने मगाशी भांडली होती
- वा... वा...
भटसाहेबांचा शेर आठवला.  
थांबवा हा वाद स्वप्नांनो हळू बोला
झोपले आहेत माझे सभ्य शेजारी

सखे ठोठावते आहेस कुठले दार देहाचे?
अशी ही कोणती इछा? कुठे मी डांबली होती?
- चमकदार कल्पना.
तुझ्या सोईप्रमाणे हातचे धरलेस तू मजला
स्वतःची आकडेवारी कुठे मी मांडली होती?
-  सुरेख
एकंदरीत छान. शुभेच्छा.

अचानक सगळे गझलकार सुट्टीवर गेले काय? दोन अडीच दिवस पाहतोय काही बदलच घडत नाहीये. ही एक जुनी परंतू अतिशय सुरेख गझल कृपया वाचा.

सर्वच शेर तगडे आहेत.. त्यातही  भांडली, गांजली, मांडली आवडले..
भूषणजी धन्यवाद ह्या गझलला वर आणल्याबद्दल