श्वासात ताल आहे

प्रत्येक शब्द माझा जळती मशाल आहे
प्रत्येक अक्षराचा हेतू कराल आहे


तलवार चालवावी दुसर्‍या कुणीहि येथे
माझी सदाचसाठी हातात ढाल आहे


भक्ती स्वतःच करता मूर्तीस जान देता
वरती तिलाच नमता तुमची कमाल आहे


जितका जमेल तितका उपभोग घेत जावा
'परवा' असे 'उद्या' जो, तो आज  'काल' आहे


मदिरा खराब आहे जो सांगण्यास आला
तोही पिऊन गेला सगळी धमाल आहे


'जाणे तिचे नि येणे' सारे थिजून पाही
दुर्मीळ फार हल्ली 'कातील चाल आहे'


भेटो कितीक येथे पण गीतकार माना
त्यालाच सत्य ज्याच्या श्वासात ताल आहे


हिरवा गुलाल येथे दंग्यास मूळ होतो
पण रंग दोन्हिकडच्या रक्तास लाल आहे


बाजार हा कवींचा, सवलत हजार टक्के
करणार काय सांगा? बकवास माल आहे


चाळीस वर्ष माझी चालू असे परीक्षा
माहीत ना कुणाला 'केव्हा निकाल आहे'


या लोचनात लाली, ओठात धूर काळा
हिरवे विचार, माझा, रंगीन हाल आहे


प्रत्येक शेर माझा खाऊन भाव जातो
कंगाल राहतो मी गिळतो दलाल आहे


तो आठवे जमाना मधुनी उगाच, बाकी...
ती ही खुशाल आहे मी ही खुशाल आहे


झाले जगून ज्याचे सोडून जात आहे
मृत्यूस जिंदगी ही अवघी बहाल आहे


 


 


 



 



 


 

गझल: 

प्रतिसाद

मदिरा खराब आहे जो सांगण्यास आला
तोही पिऊन गेला सगळी धमाल आहे

तीन  शेर  फार  आवडले-
प्रत्येक शब्द माझा जळती मशाल आहे
प्रत्येक अक्षराचा हेतू कराल आहे


तलवार चालवावी दुसर्‍या कुणीहि येथे
माझी सदाचसाठी हातात ढाल आहे..  आणि  'खुशाल' हा  शेरही  मस्त.
बाकीचे  शेर  नको  तितके  वैविध्यपूर्ण  आहेत. त्यामुळे  एकंदर  गझलेचा  'मूड' बनत  नाही.(हा  तुमचाच  मुद्दा  आहे, हे  मी  जाणतो.)
चूभूद्याघ्या.

तलवार चालवावी दुसर्‍या कुणीहि येथे
माझी सदाचसाठी हातात ढाल आहे
प्रत्येक शेर माझा खाऊन भाव जातो
कंगाल राहतो मी गिळतो दलाल आहे
वरील दोन शेर चांगले. बाकी ठीक वाटते. धारदार वाटत नाही.
भेटो कितीक येथे पण गीतकार माना
त्यालाच सत्य ज्याच्या श्वासात ताल आहे
इथे मात्र शाब्दिक फेक जमली नाही असे वाटते. राग नसावा.

कलोअ चूभूद्याघ्या

कातील चाल अन मी ही खुशाल हे आवडले.

या लोचनात लाली, ओठात धूर काळा
हिरवे विचार, माझा, रंगीन हाल आहे

या लोचनात लाली ऐवजी डोळ्यांत लाल ज्वाळा ... पहा :)