असा श्वासांत येतो प्रास

अताशा चांदण्याशी भांडण्यातच रात्र जाते त्रास होतो त्रास नुसता
पहाटे मात्र जाणवते पुरे आहे जगाया पौर्णिमेचा भास नुसता

तुझा थरकाप नाही होत का पाहून टिकल्यांची अशी रेघाळ नक्षी
मला तर आपला हा आरसा दिसताच दिसतो क्रूर कारावास नुसता

तिने कित्येकदा संधी दिली पण प्रश्न मी उच्चारला नाही कधीही
परीक्षा द्यायची नव्हती हवा होता मला आयुष्यभर अभ्यास नुसता

अशाने काय होते की फुलावे , ना फुलावे स्पष्ट काही कळत नाही
ऋतूच्या बोलण्यामध्येच जेव्हा शब्द येऊ लागतो "सायास नुसता !"

तुम्हाला काय सांगू मी किती आतूर होतो बरसण्यासाठी अवेळी
अरेरे वेधशाळांनो तुम्ही काढायचा होतात रे अदमास नुसता

असे होते , असे होतेच बाबांनो अशी वेडीपिशी असते असोशी
असा श्वासांत येतो प्रास अन जगण्यात कवितेचा सुरीला न्यास नुसता

गझल: 

प्रतिसाद

व्वा...छान....
तुम्हाला काय सांगू मी किती आतूर होतो बरसण्यासाठी अवेळी
अरेरे वेधशाळांनो तुम्ही काढायचा होतात रे अदमास नुसता

तिने कित्येकदा संधी दिली पण प्रश्न मी उच्चारला नाही कधीही
परीक्षा द्यायची नव्हती हवा होता मला आयुष्यभर अभ्यास नुसता

तिने कित्येकदा संधी दिली पण प्रश्न मी उच्चारला नाही कधीही
परीक्षा द्यायची नव्हती हवा होता मला आयुष्यभर अभ्यास नुसता
- गालिब कायम प्रेमाच्या उपासनेमधेच गुंग असायचा. प्रेमाच्या लाभाबाबतीत तो इतका हव्यासी नसायचा. त्या मनस्थितीची आठवण करून देणारा शेर! अप्रतिम शेर!
तुम्हाला काय सांगू मी किती आतूर होतो बरसण्यासाठी अवेळी
अरेरे वेधशाळांनो तुम्ही काढायचा होतात रे अदमास नुसता
-नावीन्यपूर्ण शेर! 'अवेळी' या शब्दाचे महत्व सर्वात जास्त! वेधशाळा स्त्रीलिंगी शब्द असल्यामुळे 'होतात रे' मधील 'रे' जरासा खटकला.
आणखीन एक मुद्दा!
वैभवसाहेबांच्या गझलेतील अनुभवाचा पूर्ण आदर ठेवून!
हे वृत्त फारच लांबलचक वाटले.
तिने संधी दिली होती तरी नाहीच पुसले
नको होती परीक्षा , आवडे अभ्यास नुसता
माफ करा. वैभवसाहेबांच्या शेराला एडिट करण्याची माझी पात्रता नाही. पण मनात आला तो मुद्दा विचारला. मोठे वृत्त घेण्याचे बेसिक कारण समजावे या हेतूने मी हे विचारत आहे.

तुझा थरकाप नाही होत का पाहून टिकल्यांची अशी रेघाळ नक्षी
मला तर आपला हा आरसा दिसताच दिसतो क्रूर कारावास नुसता
तिने कित्येकदा संधी दिली पण प्रश्न मी उच्चारला नाही कधीही
परीक्षा द्यायची नव्हती हवा होता मला आयुष्यभर अभ्यास नुसता
तुम्हाला काय सांगू मी किती आतूर होतो बरसण्यासाठी अवेळी
अरेरे वेधशाळांनो तुम्ही काढायचा होतात रे अदमास नुसता
भूषणशी सहमत. तरीही...
भूषण, आपण सुचविलेल्या ओळींमध्ये तो फील येत नाही जो लांबलचक ओळीत आहे.
नको होती परीक्षा मध्ये परीक्षा द्यायचीच नव्हती चा फील येत नाही.
आयुष्यभर अभ्यास का हवा होता   - सांगणे न लगे. इथे आवड-निवड नसून आसुस आहे असे मला तरी वाटते. असो.
कलोअ चूभूद्याघ्या

तिने कित्येकदा संधी दिली पण प्रश्न मी उच्चारला नाही कधीही
परीक्षा द्यायची नव्हती हवा होता मला आयुष्यभर अभ्यास नुसता
वाव्वा! सुरेख! अदमास आणि कारावासही.  गझल एकंदर आवडली. लांबलचक वृत्त असूनही ओळी ओघवत्या झाल्या आहेत. उदा. अशाने काय होते की फुलावे , ना फुलावे स्पष्ट काही कळत नाही ही ओळ.

सगळी गझल आवडली
वेधशाळांना "रे"  खरोखरच बरोबर वाटत नाही "
रे च्या ऐवजी ना चालेल का? होतात ना अदमास नुसता असे?

अताशा चांदण्याशी भांडण्यातच रात्र जाते त्रास होतो त्रास नुसता
पहाटे मात्र जाणवते पुरे आहे जगाया पौर्णिमेचा भास नुसता

अशाने काय होते की फुलावे , ना फुलावे स्पष्ट काही कळत नाही
ऋतूच्या बोलण्यामध्येच जेव्हा शब्द येऊ लागतो "सायास नुसता !"
तुझी परवानगी आहे असे समजून मी तरही लिहितो आहे...
 
एकदम खुष!
 
तिने कित्येकदा संधी दिली पण प्रश्न मी उच्चारला नाही कधीही
परीक्षा द्यायची नव्हती हवा होता मला आयुष्यभर अभ्यास नुसता

जबरदस्त  गझल... प्रश्नच  नाही.
सगळेच  शेर  आवडले.
वैभव (जोशी  आणि देशमुख, दोन्ही..) हे  या  साईटचे  'वैभव'  आहेत.

ही फरच सुरेख गझल वाटली.

पुन्हा पुन्हा वाचली.

गझल अतिशय आवडली!

तुम्हाला काय सांगू मी किती आतूर होतो बरसण्यासाठी अवेळी
अरेरे वेधशाळांनो तुम्ही काढायचा होतात रे अदमास नुसता
हाच आवडला सगळ्यात जास्त...
- नचिकेत

सर्वांचे मन:पूर्वक आभार. हो वृत्त लांब आहे पण काटछाट करून मजा येईना म्हणून सुचले तसेच ठेवले.

अदमास आणि सायास शेर फारच आवडले वैभव!!