ठुमरी



बोलायाला मित्र कुणीही उरला जिगरी नाही
पूर्वी होती तितकी आता 'ती'ही उपरी नाही
जखमा सगळ्या भरल्या किंवा मी जखमांनी भरलो
एक खरे की आता कुठली जागा दुखरी नाही
मास्तर विझलेले अन बेचव चोथापाणी शिक्षण
घडते रडके जगणे जेथे शाळा हसरी नाही
मॉल उभा झाला अन बसला त्याचा कुडमुड धंदा
प्रगतीच्या व्याख्येमध्ये म्हादूची टपरी नाही
जगणे आता झापडलेले; लेझिमतालावरचे
ख्याल, तराना नाही किंवा टप्पा ठुमरी नाही
गझल: 

प्रतिसाद

पुलस्तिसाहेब,
बास! मतला वाचला अन खलास झालो. अप्रतिम गझल आहे. मान गये.

बोलायाला मित्र कुणीही उरला जिगरी नाही
पूर्वी होती तितकी आता 'ती'ही उपरी नाही - ती ही उपरी नाही हा उच्च शेर आहे.

जखमा सगळ्या भरल्या किंवा मी जखमांनी भरलो
एक खरे की आता कुठली जागा दुखरी नाही - ग्रेट!

मास्तर विझलेले अन बेचव चोथापाणी शिक्षण
घडते रडके जगणे जेथे शाळा हसरी नाही - रडके जगणे..व्वा!

मॉल उभा झाला अन बसला त्याचा कुडमुड धंदा
प्रगतीच्या व्याख्येमध्ये म्हादूची टपरी नाही - आपण मराठी गझलेत इंग्लीश शब्द किती योग्यपणे घेतला आहेत! सुंदर! प्रगतीच्या व्याख्येमध्ये म्हादूची टपरी नाही. अप्रतिम!

जगणे आता झापडलेले; लेझिमतालावरचे
ख्याल, तराना नाही किंवा टप्पा ठुमरी नाही - झापडलेले अन लेझिमतालावरचे जगणे..व्वा!
 
पुलस्तिसाहेब, आपल्या या गझेल्च्या प्रेमात पडावेसे वाटत आहे. मला यावरून जगजीत सिंगांनी गायलेली 'कागझ की कश्ती..बारिश का पानी' पण आठवली.
 
जिंकलेत!

बोलायाला मित्र कुणीही उरला जिगरी नाही
पूर्वी होती तितकी आता 'ती'ही उपरी नाही

अतिशय भिडणार्‍या शेराने गझलेची सुरुवात! कवी भूषणशी आम्ही सहमत आहोत. कवी पुलस्तिने जिंकले. प्रत्येक शब्दाला एक प्रयोजन असायला पाहिजे. जे इथे फार मनापासून निभावले गेले आहे. मित्र भरपूर असतील, पण 'जिगरी' मित्र एकही नाही. काळाच्या ओघात माणूस आपापल्या संसारात, विवंचनांमधे गुरफटतो. कधीतरी मधेच जुने दिवस आठवतात. हृदयात कळ येते. 'गेला तो काळ' असे म्हणुन किंचित डोळे पाणावतात. कुठे असतील ते मित्र आता? असा प्रश्न मनात येतो. त्याचक्षणी सगळ्यांना परत भेटायची इच्छा होते. पण ते जमणारे नसते. काळ हा जसा जखमा भरवतो तसा खपल्या काढतोही. मनातले सांगावे तरी कुणाला? व्वा! कवी पुलस्तिची पहिली ओळच गझलेच्या धुंदीमधे घेऊन जाते. पुर्वी होती ती ही आता इतकी उपरी नाही. या ओळीत तर कमालच झाली आहे. 'उपरी' असण्यामधली मजा सर्वस्व लाभल्यानंतर मिळणार्‍या मजेपेक्षा फारच सामान्य दर्जाची आहे असे ते विधान आहे. चोरून केलेलेया प्रेमाची लज्जत ज्यांना ठाउक असेल त्यांना हा शेर अतिशय आवडेल. पती पती म्हणुन वावरताना ज्या गोष्टी 'गृहीत' धरल्या जातात त्या नाते समाजमान्य होण्याआधी धरल्या जाऊ शकत नाहीत. तेहा खरे एक आसूसणे असते, एक वेदना अन एक उर्मी असते. व्वा!


जखमा सगळ्या भरल्या किंवा मी जखमांनी भरलो
एक खरे की आता कुठली जागा दुखरी नाही

जर जखमांशिवाय असलेली जागाच उरली नाही तर एखादी जागा दुखरी आहे असे कसे म्हणता येईल? फार सुंदर! व्यथा प्रकट करणे अन तेही नेहमीच्याच वापरातल्या शब्दात पण तीव्रपणे हे वैशिष्ट्य अत्यंत छानपणे निभावले आहे.  मी जखमांनी भरलो आहे की माझ्या जखमा भरल्या आहेत असा प्रश्न पडणे हे बेहोशीचे ते लक्षण आहे जे येथील कवींमधे फार दुर्मीळपणे आढळून येते. जखमा भरणे किंवा सारे शरीर ( मन हा अर्थ अभिप्रेत ) जखमांनी भरणे या दोन्ही गोष्टी समान वाटणे यात विरोधाभास, वेदनेची तीव्रता, सहजता हे सर्व आले.

 


मास्तर विझलेले अन बेचव चोथापाणी शिक्षण
घडते रडके जगणे जेथे शाळा हसरी नाही

शाळा ही उपमा जगासाठी लावून पहा! देवात आता जीव इरलेला नाही, माणसे म्हणजे सारे विद्यार्थी तेच तेच त्याच त्याच पद्धतीने शिकतायत ( जगतायत ). तसेच शाळा ही उपमा संसाराला लावून पहा. कर्त्या व्यक्तीच्या मनात आता पुर्वीसारख्या महत्वाकांक्षा नाहीत, कदाचित टक्केटोणपे खाल्यामुळे अथवा जोडीदारापासून पूर्ण साथ मिळण्याची शक्यता मावळल्यामुळे! मग उरत ते तेच तेच जगणे! शाळा ही उपमा मराठी गझलकारांना लावून पहा! भट हयात नाहीत. मग इथल्या गझलेचे अन गझलकारांचे काय होणार? व्वा! 


मॉल उभा झाला अन बसला त्याचा कुडमुड धंदा
प्रगतीच्या व्याख्येमध्ये म्हादूची टपरी नाही
 
अतिसुंदर शेर! मात्र सामाजिक शेर! गझलेत सामाजिक शेर घेताना इतक्या सुंदर पद्धतीने घेतलेला फारसा पहायला मिळत नाही.


जगणे आता झापडलेले; लेझिमतालावरचे
ख्याल, तराना नाही किंवा टप्पा ठुमरी नाही
 
शाळा अन हा शेर यात अर्थामध्ये किंवा निर्मीतीच्या कारणांमधे फारसा फरक असेल असे वाटत नाही.
 
एकंदर फारच सुंदर गझल!
 
गुण देणे अपरिपक्व वाटते असे कुणीतरी म्हंटल्यामुळे ते थांबवले होते. पण जर द्यायचेच झाले तर १०० पैकी ८५!

प्रिय मित्र पुलस्ति,
असे नाही करू. अशी चांगली गझल केल्यावर वाचून रडू येते की नाही मन भरून आल्यामुळे? मग का बरे इतकी भावनांना चाळवणारी गझल करायची? कित्ती कित्ती आठवणी निघाल्या माझ्या! आमच्या गल्लीपाशी एक म्हातारा माणूस चपला विकायला बसायचा. तिथे आता ब्रँडेड शूजचे दुकान निघाले आहे. बिचारा घरी बसतो. त्या गल्लीतच आमचा वाडा होता. त्याच्यावर मी 'वाडा पडून गेला' म्हणुन गझल केली. खरच रडू येते.

बोलायाला मित्र कुणीही उरला जिगरी नाही
पूर्वी होती तितकी आता 'ती'ही उपरी   नाही

जगणे आता झापडलेले; लेझिमतालावरचे
ख्याल, तराना नाही किंवा टप्पा ठुमरी नाही.

धन्यवाद

कुडमुड धंदा आणि ठुमरी जरा एवढे भरीव नाही वाटले.
पुलस्तिंचे यश : समीक्षकाला मास्तर, शाळा या उपमा वाटू(कि पटू) लागल्या हे विशेष.
मास्तर विझलेले अन बेचव चोथापाणी शिक्षण
घडते रडके जगणे जेथे शाळा हसरी नाही

वरवर पाहता हे साधेच विधान वाटते.
ख्याल, तराना, टप्पा, ठुमरी   याचे उल्लेख उल्लेखनीय. तुमचे माझे जमेल.
मतला सुरेखच आहे.
कलोअ चूभूद्याघ्या

 
 
 
जखमा सगळ्या भरल्या किंवा मी जखमांनी भरलो
एक खरे की आता कुठली जागा दुखरी नाही
छा न

मॉल उभा झाला अन बसला त्याचा कुडमुड धंदा
प्रगतीच्या व्याख्येमध्ये म्हादूची टपरी नाही
छान. वेगळा शेर.
[ ....मी रोज पाहत असलेले दृश्य असे -  उभ्या राहिलेल्या त्याच मॉलमधले अनेक कर्मचारी; झालंच तर शेजारच्याच झकपक काचेरी काचेरी इमारतीमधील आयटीयन्स (यू नो !!!) रस्त्यात उभे राहून (वाहतूककोंडीला `पायभार` लावीत !)  आमच्या `म्हादू`च्या टपरीमधील स्पेशल चहा मोठ्या झोकात पीत असतात.
या `म्हादू`ला मी एकदा उत्सुकतेपोटी विचारले -  `तुझे दिवसाकाठचे उत्पन्न किती ? `
त्याने उत्तर दिले - `भांडवल वगळता हजार ते बाराशे रुपये !`
अर्थात, तुमच्या म्हादूचे, मर्ढेकरांच्या गणपत वाण्यासाऱखे, किराणा दुकान असेल तर मात्र कुणास ठाऊक हां ! ) 

मतला खूप आवडला !

जखमा सगळ्या भरल्या किंवा मी जखमांनी भरलो
एक खरे की आता कुठली जागा दुखरी नाही.. वा क्या बात है!!
-मानस६

प्रतिसादांबद्दल सर्वांचे मनापासून आभार


जखमा सगळ्या भरल्या किंवा मी जखमांनी भरलो
एक खरे की आता कुठली जागा दुखरी नाही
वाव्वा. फारफार आवडला हा शेर.


मॉल आणि म्हादू छान. पण ऐवजी सूचकता आली असती तर?जिगरी नेहमीचा असला तरी छान.

जगणे आता झापडलेले; लेझिमतालावरचे
ख्याल, तराना नाही किंवा टप्पा ठुमरी नाही
पहिल्या वाचनात मजा आली. दुसर्‍या वाचनात मात्र वाटले की जसा लेझिमताल आणि ख्याल तराना ह्यांनाही ताल लागतोच. मग त्या तालात आणि लेझिमतालात फरक काय? शेवटी कुठल्यातरी तालावर नाचणे आलेच.

सर्वच शेर आवडले !