संध्याकाळ झाली

लक्ष माझे वेधण्याला तारकांची माळ झाली
एक होती चांदणी, माझे अता आभाळ झाली

रोज रात्री तीच स्वप्ने नाचली माझ्यासवे, अन
आज ती दिवसा उजेडीही मनाचा चाळ झाली


आस भलती ह्या मना, ते आजही वेडावलेले
सावरावे मी जरी, त्याची किती आबाळ झाली


आज रस्ता सापडेना, मी तसा बेहोश नाही
काल येथे वाट होती, आज तीच गहाळ झाली


चोरट्यांना मान येथे, गाव हे सोडून जातो 
सावल्या मोठ्या खुज्यांच्या, समज संध्याकाळ झाली

गझल: 

प्रतिसाद

वा..वा...
छान शेर आहे.........

आस भलती ह्या मना, ते आजही वेडावलेले
सावरावे मी जरी, त्याची किती आबाळ झाली

आस भलती या मना,त्याची किती आबाळ झाली..
या दोन ओळी छानच आल्या आहेत,

सगळी गझल सुरेख
 
विशेष करून, पहिला, तिसरा व पाचवा शेर खूपच छान आहेत

सगळी  गझल  सुरेख  आहे. "आबाळ" शेर सर्वाधिक आवडला.
काल येथे वाट होती, आज तीच गहाळ झाली.. या मिसर्‍यात काहीतरी  बदल  करावा  लागेल!

ठीक रचना

सुंदर गझल. सगळेच शेर आवडले. गहाळच्या बाबतीत ज्ञानेशशी सहमत!

भूषण, दशरथ, अच्युत, ज्ञानेश, सोनालीजी..... प्रतिसादाकरता धन्यवाद,
 
गहाळ शेरात मात्रा जमवायला ( वृत्त जमवायला ) तसे घेतलेले आहे, काही सुचले तर लिहीन

'गहाळ' च्या बाबतीत काहीही करता येणार नाही. 'गहाळ' शब्द वापरायचा असेल तर आहे तसेच घ्यावे लागेल.
म्हणताना तीच गहाळ यामध्ये ती वर पूर्ण आणि वर अर्धा जोर वाढवावा लागत आहे इतकेच.
बाकी सुंदर.
कलोअ चूभूद्याघ्या