आयुष्याला अमुच्या.......

आयुष्याला अमुच्या हिरवे हिरवे केले
अमुच्यासाठी तू जन्माचे खुरपे केले

त्यांच्या तत्वांच्याच नेमके उलटे केले
ज्यांचे ज्यांचे आम्ही येथे पुतळे केले

सामान्यांचे मुंडके घेउन आला राजा
मग त्याच्या राण्यांनी त्याचे गजरे केले

पैसा, सत्ता, देहवासना या सार्‍यांनी
नाती प्रीती माणुसकीला कुजके केले

तू येणार कळाले तेव्हा वेडा झालो
मी माझ्या सार्‍या देहाचे डोळे केले

कुणीच नव्हते अंधार्‍या रातीला सोबत
मग मी अपुल्या आठवणी॑चे तारे केले

मी रचलेल्या कविता म्हणजे काय आणखी
काळिज सोलुन स्पंदन माझे उघडे केले...........

                    -वैभव देशमुख

 

 

 

 

गझल: 

प्रतिसाद

माझ्यामते आपली ही गझल अत्यंत उत्कृष्ट आहे. आपल्या या गझलेवर काहीच प्रतिसाद का नाहीत काही समजत नाही, पण अतिशय भावणारी गझल आहे. विशेषतः पुतळे, गजरे व वेडा झालो हे शेर अप्रतिमच आहेत.

तू येणार कळाले तेव्हा वेडा झालो
मी माझ्या सार्‍या देहाचे डोळे केले
कुणीच नव्हते अंधार्‍या रातीला सोबत
मग मी अपुल्या आठवणी॑चे तारे केले
 
...... सुरेख


आयुष्याला अमुच्या हिरवे हिरवे केले
अमुच्यासाठी तू जन्माचे खुरपे केलेवा...
तू येणार कळाले तेव्हा वेडा झालो
मी माझ्या सार्‍या देहाचे डोळे केले
वा..

कुणीच नव्हते अंधार्‍या रातीला सोबत
मग मी अपुल्या आठवणी॑चे तारे केले
वा..छान..

मी रचलेल्या कविता म्हणजे काय आणखी
काळिज सोलुन स्पंदन माझे उघडे केले...........
छान..वैभव, वरील तिन्ही शेर आवडले. देहाचे डोळे आणि आठवणींचे तारे करणे विशेष.


त्यांच्या तत्वांच्याच नेमके उलटे केले
ज्यांचे ज्यांचे आम्ही येथे पुतळे केले

पैसा, सत्ता, देहवासना या सार्‍यांनी
नाती प्रीती माणुसकीला कुजके केले ह्या द्विपदी थोड्या एखाद्या भाषणातल्या विधानांसारख्या झाल्यासारख्या वाटल्या.


सामान्यांचे मुंडके घेउन आला राजा
मग त्याच्या राण्यांनी त्याचे गजरे केलेएका मुंडक्याचे गजरे कसे होणार? 'मुंडकी' हवे असे वाटते. अर्थात शेवटी पोएटिक लिबर्टी आहेच..
'पुतळे ' आवडला.

आपल्या मताशी मी एकदम सहमत आहे...
 

सामान्यांचे मुंडके घेउन आला राजा
मग त्याच्या राण्यांनी त्याचे गजरे केले

यामधे मी सामान्यांचे असे लिहिले म्हणजे मला अनेक असेच सुचवायचे होते
पण   मुंडकी एवजी  मुंडके असे लिहिल्यामुळे हा घोळ झाला....
दुसरे दोन शेर आपण म्हणता त्याप्रमाणे एखाद्या भाषणातल्या विधानांसारखेच आहेत
पण ते मला आता कळतय........
आरसा दाखवल्याबद्दल धन्यवाद.......... 

 

वैभव,
आपली  गझल   खूपच  छान  आहे.  भविष्यात  आपण  उत्कृष्ट  गझलकार  म्हणून  ओळखले  जाल.खूप  खूप  शुभेच्छा.

आयुष्याला अमुच्या हिरवे हिरवे केले
अमुच्यासाठी तू जन्माचे खुरपे केले..
सुंदरच...
 

नवा प्रवाह येत आहे, रुजत आहे,
अनंतची उजाड माळावरती हिरवळ शोधत गेलो
केदारची लोकांमध्ल्या प्रतिमेला सांभाळत बसलो,
वरील आयुष्याला अमुच्या हिरवे हिरवे केले,
तसेच माझी, तोच्पणाच्या दलदलीत सापडला कोणी
या एकाच पठडीतल्या वाटतात...अर्थातच हे वैयक्तिक मत आहे.सामान्यांचे मुंडके घेउन आला राजा
मग त्याच्या राण्यांनी त्याचे गजरे केले.. जहाल.. जबरी.. (मुंडकी हवे.. त्याने व्याकरण ही अचूक होईल आणि अर्थ ही व्यापक.. म्हणजे एकाहून अधिक जणांवर अत्याचार)..युगांडा देशाचा राजा इदी अमीन ह्याची याद झाली..
-मानस६

कुणीच नव्हते अंधार्‍या रातीला सोबत
मग मी अपुल्या आठवणी॑चे तारे केले
मी रचलेल्या कविता म्हणजे काय आणखी
काळिज सोलुन स्पंदन माझे उघडे केले...........
या दोनही द्विपदी आवडल्या.
सामान्यांचे मुंडके घेउन आला राजा
मग त्याच्या राण्यांनी त्याचे गजरे केले
या द्विपदीसाठी एक शंका...
मुंडके किंवा मुंडकी यातील मात्रा ४ होतील की ५. माझ्यामते ५ व्हायला हव्यात.
तसे केले तर मात्रांच्या दृष्टीने जुळत नाही असे मला वाटते.
कल्पना चांगल्या मांडल्या आहेत. पण तरी आपली ही गझल मला तरी फार ग्रेट वगैरे वाटली नाही. तरी राग नसावा.
कलोअ चूभूद्याघ्या

सगळ्या॑चे धन्यवाद.....

गझल आवडली

मत्ला कोणाला समर्पित आहे ते कळाले नाही.
वरील चार शेर मुसलसिल वाटतात्,मात्र त्याखालिल तिन शेर वेगळे आहेत..........
काव्य चान्ग्ले.......................
                               शुभचिन्तक