दळण

टीप- खालील गझलेत अक्षरांवर दिलेले टिंब हे अनुस्वार नाहीत. 'माझे घर',  'माझं घर' यातील 'झ' वर येणारा अनुस्वार जसा वाचण्यात लय येण्यासाठी असतो, तसे आहेत.

 

दळंण  दळणं  सरलंगं
घुमंत  जगणं  सरलंगं

अवचितं  सुटलं  ग्रहंणं
कुढंत  बसणं  सरलंगं

धुणं  बडंवणं  सुकंवणं
वरंण  हटणं  सरलंगं

चुकणं  बिकणं  असतंचं
पंण  बिचंकणं  सरलंगं

हरणं  कमळं  मृगजळं
पळणं  फसणं  सरलंगं

जलंद फिरंव करवंतं
सरंण रचणं सरलंगं

रमंण करतं खटखटं
भिणं भिववणं सरलंगं

गझल: 

प्रतिसाद

चुकणं  बिकणं  असतंचं
पंण  बिचंकणं  सरलंगं
ंचांगलं  observation आहे.
शुभेच्छा.

हरणं  कमळं  मृगजळं
पळणं  फसणं  सरलंगं
ही द्विपदी आवडली. तसेच बिचकण मधलं, समीर म्हणतात तसं, observation आवडलं.
पण टिंबं खटकलीच. "ए" हा स्वराच्या ऐवजी "." वापरणं हा बोली भाषेतला प्रयोग करायला नक्कीच काही हरकत नसावी. पण बर्‍याच टिंबांच्या प्रयोगामागे तो तर्क आढळत नाही. निदान मला तरी तो तसा कळला नाही.
उदा.  "धुणं" कळले; "बडंवणं" "सुकंवणं" यातले ड आणि क वरची टिंबं कळली नाहीत. तेच घुमंत, अवचितं, वरंण, पंण इ.इ. बाबत. आपल्याला टिंब हे - उच्चार लघु नका तर दीर्घ करा - असं सुचवण्यासाठी वापरायचा असेल ते मात्र फारसं पटत नाही.
चु.भू.दे.घे.

पुलस्ति यांच्य़ाशी सहमत.
टिंबांचा विचार महत्वाचा आहेच. जागा सोडणेही महत्वाचे आहे. शेर अधिक सफाईदार हवेत. शेरांमधील विचार चांगले.
मान्यवरांचे मार्गदर्शन घ्यावे.
कृ. असे करून पाहावे-

दळण  दळणं  सरलं गं
घुमत   जगणं  सरलं गं
ग्रहण सुटलं अवचित अन्
कुढत  बसणं  सरलं गं


---
जीवनभर स्त्री जे सहन करते त्याचे सार या रचनेत ओतले गेले आहे.  स्त्रीच्या , विशेषतः ग्रामीण भागातील  स्त्रियांच्या जीवनातील दैनंदिन प्रसंगांची नेमकी नोंद शेरात झाली आहे.  
कुढत बसण्याच्या शेराच्या संदर्भात ग्रामीण व शहरी प्रसंग डोळ्यांसमोर आणता येऊ शकतात.
ग्रामीणः गावातल्या त्या कोवळ्या पोरीचं नुकतंच लग्न झालेलं आहे. ती गुलाबी स्वप्नं  पाहत आहे. खूप खूप गोष्टी तिला आपल्या शेतकरी धन्याशी बोलायच्या आहेत, त्यातली एक गोष्ट तर खूपच असोशीनं मनाशी तिनं जपून ठेवली आहे.  तिला काही केल्या त्याच्याशी बोलता येत नाही. त्याच्या जरब बसवणा-या रांगडेपणामुळे, स्वतःच्या लाजाळूपणामुळे किंवा  भरल्या सासरच्या घरात सतत पाहुण्यारावळ्यांमुळे तिला त्याच्याशी दोन घटकाही निवांत मिळत नाहीत. एकीकडे चहा-पाणी करावं लागतंय, एक लक्ष आपला गडी आपल्याला केव्हा मिळतोय याच्याकडे आहे, तिसरीकडे नुसत्याच मिरवणा-या सासूच्या सूचना ऐकाव्या लागत आहेत.  तगमग, बेचैनी आणि कुढणं सुरू झालं आहे..
आणि अचानक सांजच्या येळंला  क्षणभराची का होईना उसंत मिळते, भोवताली कोणीच नसतं आणि ती त्याच्याशी सर्व बोलून टाकते. कोंडमा-याचं ग्रहण असं सुटतं.पुढचे क्षण स्वच्छ, मोकळे होतात...    
शहरी ः ती तिशीतील हुषार मुलगी पण नवरा नोकरी करायला परवानगी देत नाही. नोकरीच काय पण स्वतःचं काहीच करू देत नाही. तू फक्त घराकडे बघ, अशी त्याची अादेशवजा सूचना. तो मित्राप्रमाणे वागत नाही. कर्तृत्व वाया चालल्याची खंत तिला आहे. एकामागून एक दिवस मागे पडत आहेत. मैत्रिणीशी, माहेरीही बोलून प्रश्न सुटत नाही. तिची अदृश्य तडफड, कुढणं वाढत आहे...
पण एक दिवस ती स्वतःच्याच नकळत त्याला सांगते, 'उद्यापासून मी नोकरीवर जाणार आहे. हा माझा अंतिम निर्णय आहे'.
...अचानक झालेल्या विस्फोटामुळे ती मुक्त श्वास घेऊ शकते आणि तिला लागलेलं घरगुती बंधनाचं ग्रहण सुटतं. 
तत्वज्ञानात्मकः स्त्रीचा मृत्यू हा मित्राप्रमाणे येतो आणि जीवनाला लागलेलं अन्यायाचं ग्रहण सोडवतो. तिला मुक्त करतो. कुढण्याप्रमाणे असलेले श्वासोच्छवास थांबतात...

शुभेच्छा.

मा. समीर चव्हाण व मा. पुलस्ति,
मनापासुन आभार.
टिंबांच्या  बाबतीत  जाणकारांचा  सल्ला मिळायला  हवा असे मला ही वाटते.
मा. केदार,
आपण  केलेला  रसास्वाद  छानच  आहे. धन्यवाद

मला काही प्रामाणिक प्रश्न पडले आहेत.
१. यातील 'ग' म्हणजे कोण?
२. या रचनेतील मात्रा कशा मोजल्या जाव्यात असे कवीला अभिप्रेत आहे?
३. ही गझल जर प्रकाशित होणे मान्य असेल तर प्रकाशित करताना गझलेचे फक्त तंत्र बघितले जाते असे माझे नम्रपणे म्हणणे आहे.  म्हणजे असे, की उद्या जर एखाद्याने संपूर्ण गझल 'ईश्वर', 'जातीपाती', 'हॉटेल ताज २६/११', 'जागतिक आर्थिक मंदी' ' मनसेचे बिहारींविरुद्धचे आंदोलन', 'बी पी ओ मधील स्त्रियांना भेडसावणारे प्रश्न', 'एक्स्प्रेस वे वरील अपघातग्रस्तांचे मनोगत',  वगैरे अशा विषयावर  केली तर ती मुळात गझल आहे किंवा नाही यावर आधी निर्णय घेतला जावा असे माझे स्पष्ट मत आहे.  प्रश्न असा आहे की हे माझे मत इथे कुणाला मान्य आहे काय? अमान्य आहे काय? कृपया कळवावे.
सन्माननीय सुनेत्रा सुभाष,
आपल्या या रचनेवर इतक्या पोटतिडकीने लिहिताना आपल्याला उद्देशून काहीच न लिहिणे योग्य होणार नाही.
आपण एक तर 'गझल' या काव्यप्रकाराला एक अत्यंत वेगळे वळण तरी लावत आहात किंवा आपण करत असलेल्या रचना या 'गझल' या काव्यप्रकारापासून थोड्याश्याच, पण,  अंतरावर आहेत असे माझे मत आहे. परत एकदा आपल्याला न आवडणारा प्रतिसाद दिल्याबद्दल माफ करावेत. परंतू आपल्या रचनेच्या बाबतीत तिचे तंत्र, मंत्र व इतर बाबींवर चर्चा होणार असे गृहीत धरुनच आपण रचना प्रकाशित करायला देत असणार व दिलदारपणे  प्रतिसाद स्वीकारणार याची खात्री वाटली म्हणुन हा सर्व प्रपंच!

मा.भूषण,
आपले प्रतिसाद नेहमीच प्रमाणिक असतात व म्हणून मला ते आवडतात.
धन्यवाद.