राहिले न आजकाल वाचण्यासारखे...

"राहिले न आजकाल वाचण्यासारखे" ...
वाचले कधीतरी, न वाचल्यासारखे


वेदना म्हणे सुखास, "काय रे बाधले? "
पाहिलेस तू मला न पाहिल्यासारखे


वाटुनी जमीन काय साधले पुण्य मी ?
बीज एकही न आज उगविण्यासारखे


एकदा मिठीत दु:ख घेतले अन् पुन्हा -
राहिले न बाहुपाश बिलगण्यासारखे


ताठ मान घेवुनी फिरे जगी, पण तिथे -
रोज येत जात तोंड लपविल्यासारखे


वादळे मला बघून गोठली, पण तरी -
माजले विचार आत वादळासारखे


मोकळ्या हवेत चल फिरून येऊ सखे
फार ठेविशी मनात सांगण्यासारखे


दोन प्रेमशब्द दे, उगाच टाळू नको -
आणि ते नकोत थाप मारल्यासारखे


माणसे अता कमीच राहिली भूवरी
वागले पशू कळून माणसासारखे

गझल: 

प्रतिसाद

वाटुनी जमीन काय साधले पुण्य मी ?
बीज एकही न आज उगविण्यासारखे
स्वतंत्ररीत्याही उत्तम शेर व सवाल-जवाब थाटाच्या कलाविष्कारालाही शोभणारा!
अकराव्या व बाराव्या अक्षरांमधे एक लघु अक्षर अधिक घेतल्यास ठेका व गेयता उंचीवर जावी.

एकदा मिठीत दु:ख घेतले अन् पुन्हा -
राहिले न बाहुपाश बिलगण्यासारखे

वादळे मला बघून गोठली, पण तरी -
माजले विचार आत वादळासारखे

मोकळ्या हवेत चल फिरून येऊ सखे
फार ठेविशी मनात सांगण्यासारखे..

हे  शेर  विशेष  आवडले. धन्यवाद.

वादळे मला बघून गोठली, पण तरी -
माजले विचार आत वादळासारखे


मोकळ्या हवेत चल फिरून येऊ सखे
फार ठेविशी मनात सांगण्यासारखे


दोन प्रेमशब्द दे, उगाच टाळू नको -
आणि ते नकोत थाप मारल्यासारखे


माणसे अता कमीच राहिली भूवरी
वागले पशू कळून माणसासारखे
वरील सर्व शेर आवडले.

मोकळ्या हवेत चल फिरून येऊ सखे
फार ठेविशी मनात सांगण्यासारखे..

व्वा, मस्त !
 

सर्वांना मनापासून धन्यवाद.
कलोअ चूभूद्याघ्या

भूषण,
मी रिमिक्स करायचा प्रयत्न केला आहे. मला माहित नाही की असे वृत्त असते का.

गा ल गा ल गा ल गा ल गा ल गा ल गा      =   चामरी वृत्त
राधिका राधिका राधिका राधिका = (मला वाटते) स्त्रग्विणी वृत्त
या दोनही वृत्तांचे रिमिक्स करण्याचा प्रयत्न केला आहे.
गा ल गा ल गा ल गा ल गालगा गालगा
चामरीतील पहिली ८ आणि स्त्रग्विणीतील २ गण असा प्रयत्न केला आहे.
कलोअ चूभूद्याघ्या

वृत्त तुम्ही कराल तसे!
वाटुनी जमीन काय साधले पुण्य मी ?
बीज एकही न आज उगविण्यासारखे
हा शेर एकदा 'भटांच्या'तोंडी घालून बघा! मग भन्नाट वाटेल.
 
 

माणसे अता कमीच राहिली भूवरी
वागले पशू कळून माणसासारखे
बाकी शेरही उत्तम.