फुलांचा रस्ता....


पायाशी आला होता धावून फुलांचा  रस्ता
वेडात तुझ्या मी आलो टाळून फुलांचा  रस्ता

बरसून तुझ्या अंगावर पाऊस सुगंधी झाला
अन गंध स्वताचा गेला विसरून फुलांचा  रस्ता

या जन्मी ओळख नाही होणार तुझी काट्यांशी
तू भाळावरती आली  गोंदून फुलांचा  रस्ता

ते वेड तुझ्या प्रीतीचे ती ओढ तुझ्या भेटीची
आगीतुन चालत होतो समजून फुलांचा  रस्ता

(चालाया तुझिया सोबत प्रेमाला वेळच नाही
तू काय मिळवले आहे मिळवून फुलांचा  रस्ता)

हाताला देवुन हिसका ते दिवस पळाले मागे
अन पायाखालुन गेला निसटून फुलांचा  रस्ता.....

--वैभव देशमुख



गझल: 

प्रतिसाद

पायाशी आला होता धावून फुलांचा  रस्ता
वेडात तुझ्या मी आलो टाळून फुलांचा  रस्ता
प्रेम व्यक्त होत आहे. प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग म्हणजे त्याग किती केला हे सांगणे. तो मार्ग इथे अवलंबला आहे. मला बरीच सुखे लाभली असती पण तुझ्यासाठी ती सर्व टाळून मी तुझ्याकडे आलो. प्रेयसीशी प्रत्यक्ष भेटीत असे बोलल्यास 'समर्थना'साठी बोलले जात आहे असे वाटू शकेल. मात्र गझलेत ही ओळ ऐकवली तर स्वगत वाटू शकेल. एक चांगला मतला!

बरसून तुझ्या अंगावर पाऊस सुगंधी झाला
अन गंध स्वताचा गेला विसरून फुलांचा  रस्ता
इथे जरा मतल्याने निर्माण केलेला दर्जा आणखीन वर नेला जात आहे. इथे एक 'विचार' आहे की तू भिजल्यामुळे जो काही एक सुगंध आला. पाऊस सुगंधी झाला म्हणजे म्हणजे तिला बिलगून पाऊस सुगंधी होत मग रस्त्यावर पडला व फुलांच्या रस्त्याला पावसामुळे तिचा सुगंध समजला व फुलांचा रस्ता स्वतःचा गंध विसरून गेला.  हा विचार म्हणजे एक कवीकल्पना असल्यामुळे हा शेर मतल्यापेक्षा जास्त उंचीवर गेला आहे.

या जन्मी ओळख नाही होणार तुझी काट्यांशी
तू भाळावरती आली  गोंदून फुलांचा  रस्ता
'आली' चे 'आलीस' होणे आवश्यक आहेच. पण कवीची इच्छा! 'आलीस कपाळावरती' चालावे. एक मुद्दा सर्वांनी विचारात घेण्यासारखा म्हणजे 'शुद्ध भाषा' किंवा 'प्रमाण भाषा' या गोष्टीचा पुरस्कार कवीने केलाच पाहिजे. आशयाच्या दृष्टीने तसा साधा शेर! कवीला प्रेयसीची ओळख काट्यांशी कधीच होणार नाही यातून 'खात्री देणे', भग्नहृदयी माणसाची व्यथा व्यक्त करणे' 'स्तुती करणे' यातील काय करायचे असावे हे ठरवावे लागते, हे एक थोडेसे अपयश. म्हणजे तसे शेरातून एकापेक्षा जास्त अर्थ निघाले तर तो शेर श्रेष्ठ समजला जातो हे खरे आहे. पण इथे एकापेक्षा जास्त अर्थ निघत नसून अर्थाबाबत संदिग्धता निर्माण होण्याचि शक्यता वाटत आहे. लक्षात घ्यावेत की खात्री देणे, स्तुती करणे वा व्यथा व्यक्त करणे या तीन पूर्णपणे भिन्न क्रिया असून त्याने शेराचा अर्थ आमुलाग्र बदलेल. रसिकाने काय अर्थ घ्यायचा आहे हे रसिकावर सोडणे समीक्षक म्हणुन आम्हाला मान्य नाही.

ते वेड तुझ्या प्रीतीचे ती ओढ तुझ्या भेटीची
आगीतुन चालत होतो समजून फुलांचा  रस्ता
चांगला शेर! किंचितसा मतल्याचाच अर्थ परत सांगीतला आहे. पण हाही कवीचाच चॉईस. गझल असल्यामुळे प्रत्येक शेर वेगळा असू शकतो असे असले तरी असलाच पाहिजे असे नाही. मात्र आम्हाला असे वाटते की जराशी वेगळी छटा अर्थामध्ये आणावी. त्याने एक वेग़ळी भावना निर्माण होऊ शकते. किंवा तीच भावना वेगळ्या रुपात भेटते. जसे: यातील 'समजून' या शब्दामुळे या शेराचा अर्थ जरासा मतल्यातल्या 'फील' सारखा होत आहे. 'आगीला समजत होतो ( म्हणजे आग म्हणजे काय ते कळायला लागले होते ) समजून फुलांचा रस्ता ( म्हणजे फुलांचा रस्ता कसा असतो हे कळल्यामुळे )! असे काहीतरी जरा वेगळी छटा आणू शकेल. गझलेचा फायदा कवीला हाच असतो की विविध भावना एकाच रचनेत मांडता येतात.

(चालाया तुझिया सोबत प्रेमाला वेळच नाही
तू काय मिळवले आहे मिळवून फुलांचा  रस्ता)
'आहे' च्या ऐवजी 'आहेस' असायला हवे होते. सानी मिसर्‍याच्यापुढे प्रश्नचिन्ह दिल्यास चांगले वाटावे. कंसाची आवश्यकता आहे असे वाटत नाही. इथे काही गडबड झाल्यासारखे का बरे वाटत आहे? इथे वेळ कुणाला नाहीये? प्रेमाला की तिला? वास्तविकपणे तिला प्रेमासाठी वेळ नाही असे म्हणायचे असावे, जे यातून म्हंटले जाते असे वाटत नाही. 'प्रेमाची सोबत घेण्या..फुरसतही तुजला नाही' अशा अर्थाचे विधान करायचे आहे काय? तसे असल्यास आमचे मत चुकीचे ठरेल.

हाताला देवुन हिसका ते दिवस पळाले मागे
अन पायाखालुन गेला निसटून फुलांचा  रस्ता.....
हासिल-ए-गझल शेर! खरे तर हा एकच शेर अख्खी गझल खाऊन टाकतो. व्वाह! अनुभुती? आहे. व्यथा? आहे. संवादात्मकता? आहे. बोजडपणा घ्यावा लागला? अजिबात नाही. साधे शब्द वापरलेत. हासिल-ए-गझल!
आता गुण देणे बंद केले आहे. ते उथळ वाटते असा एक फीडबॅक मिळाला म्हणुन! 

वेगळा रदीफ, वेगळे खयाल... उत्कृष्ट गझल.
या जन्मी ओळख नाही होणार तुझी काट्यांशी
तू भाळावरती आली  गोंदून फुलांचा  रस्ता ...

कायम लक्षात राहणार आहे हा शेर.
धन्यवाद.

उत्कृष्ट गझल आहे.  सगळेच शेर आवडले.

या जन्मी ओळख नाही होणार तुझी काट्यांशी
तू भाळावरती आली  गोंदून फुलांचा  रस्ता ...

हा तर फारच मस्त!

खूपच छान गझल आहे. अभिनंदन!

सर्वांशी सहमत. प्रेम हा विषयच गोड असतो. उत्तम.
कलोअ चूभूद्याघ्या

हाताला देवुन हिसका ते दिवस पळाले मागे
अन पायाखालुन गेला निसटून फुलांचा  रस्ता.....
 
सुंदर......

धन्यवाद..........
चालाया तुझिया सोबत प्रेमाला वेळच नाही...
प्रेमाला च्या ठिकाणी कोणाला अस॑ खर तर मला म्हणायचे होते....
ध्न्यवाद.....

बरसून तुझ्या अंगावर पाऊस सुगंधी झाला
अन गंध स्वताचा गेला विसरून फुलांचा  रस्ता
- सुंदर
या जन्मी ओळख नाही होणार तुझी काट्यांशी
तू भाळावरती आली गोंदून फुलांचा  रस्ता
- सुरेख कल्पना... (आलीस तुझ्या तू भाळी गोंदून फुलांचा रस्ता....)
ते वेड तुझ्या प्रीतीचे ती ओढ तुझ्या भेटीची
आगीतुन चालत होतो समजून फुलांचा  रस्ता
-वा...वा...
हाताला देवुन हिसका ते दिवस पळाले मागे
अन पायाखालुन गेला निसटून फुलांचा  रस्ता.....
- ओहो...! फार फार छान...

हाताला देवुन हिसका ते दिवस पळाले मागे
अन पायाखालुन गेला निसटून फुलांचा  रस्ता.....

 वैभव,
गझल सुंदरच. हळुवार पण प्रभावी. तरलही आणि आश्वासक / विधानात्मकही. (प्रेमाच्या विषयावर चक्क उद् बोधकही. ) प्रेमावर काही भाष्यही करणारी.
आवडले नाही तर सोडून दे (आणि सूचनेअगोदरचाच प्रतिसाद फक्त स्मरणात राहू दे) पण एक सूचना. भाषेच्या बाबतीत अधिक निर्दोषतेकडे गझलकाराइतके कुणी लक्ष देणार नाही या श्रेयाचा मानकरी सदैव रहावे.
(चालाया तुझिया सोबत प्रेमाला वेळच नाही
तू काय मिळवले आहे मिळवून फुलांचा  रस्ता)
या शेरात 'आहे' हा शब्द बदलावास असे मला वाटते. 'येथे' लिहिलास तर ? त्यामुळे 'या दुनियेत' हा अभिप्रेत अर्थ निर्माण होवून वेगळे परिमाण लाभू शकते.
बाकी. इथे का होईना तुझ्याशी वार्तालाप झाला याचा आनंद मी घेतला.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

एकूण एक मतांशी ...
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

भन्नाट्...व्वा
हाताला देवुन हिसका ते दिवस पळाले मागे
अन पायाखालुन गेला निसटून फुलांचा  रस्ता.....