दिशा गातात ह्या जेव्हा ...


दिशा गातात ह्या जेव्हा तुझ्या थाटात अंगाई
मला जाणीव होते की इथे नाहीस तू आई

..तरीही राहिले होते हजारो अर्थ स्पर्शांना
मला समजून घेण्याची किती केलीस तू घाई

इथे बहुतेक लोकांना अताशा वाचता येते
दिसावी फक्त एकाला अशी मिळते कुठे शाई

रिते आकाश निरखावे तसा माझा तुला चाळा
उद्या येईल कंटाळा .. उद्या संपेल नवलाई

सुट्या नाण्यांपरी आले नशीबी श्वास हे काही
अशाने सात जन्मांची कधी होणार भरपाई

तुला पाहून आयुष्या पसरले हात मी जेव्हा
मला तू सांग ना तेव्हा कुठे झाली दिरंगाईगझल: 

प्रतिसाद

..तरीही राहिले होते हजारो अर्थ स्पर्शांना
मला समजून घेण्याची किती केलीस तू घाई
वा वा......

माझा 'वैभव जोशी' व 'वैभव देशमुख' मधे फारच गोंधळ झाला होता.
अफाट गझल आहे. अक्षरशः अफाट! एक एक शेर अप्रतिम!

नुसत्या शब्दांनी नाही सांगता येणार.
कलोअ चूभूद्याघ्या

इतकी  सुंदर गझल लिहू शकणारी  शाई  मिळते तरी  कुठे?
..तरीही राहिले होते हजारो अर्थ स्पर्शांना
मला समजून घेण्याची किती केलीस तू घाई .... अप्रतिम!!

गझल खूप खूप आवडली.
 
 

 

वा! वैभवराव, सुरेख गझल आहे.
..तरीही राहिले होते हजारो अर्थ स्पर्शांना
मला समजून घेण्याची किती केलीस तू घाई
वाव्वा!


इथे बहुतेक लोकांना अताशा वाचता येते
दिसावी फक्त एकाला अशी मिळते कुठे शाई
वाव्वा! कल्पना आणि शेर फारफार आवडला.

'रिते आकाश निरखावे तसा माझा तुला चाळा' ही ओळ अतिशय सुरेख आहे! 'सुट्या नाण्यांपरी आले नशीबी श्वास हे काही' ही ओळदेखील. अनेकदा पहिल्या ओळीत सगळेच काही सांगून होते. त्याची उदाहरणे! शेवटच्या तिन्ही द्विपदींत पहिल्या ओळींशी अधिक चांगला न्याय व्हायला हवे असे मला वाटते.

रिते आकाश निरखावे तसा माझा तुला चाळा
उद्या येईल कंटाळा .. उद्या संपेल नवलाई
 
अप्रतिम !!

विशेष्करूनः

तरीही राहिले होते हजारो अर्थ स्पर्शांना
मला समजून घेण्याची किती केलीस तू घाई

रिते आकाश निरखावे तसा माझा तुला चाळा
उद्या येईल कंटाळा .. उद्या संपेल नवलाई


सुट्या नाण्यांपरी आले नशीबी श्वास हे काही
अशाने सात जन्मांची कधी होणार भरपाई

..तरीही राहिले होते हजारो अर्थ स्पर्शांना
मला समजून घेण्याची किती केलीस तू घाई
वा... वा वा. ! दुसरी ओळ अप्रतिम.
 
इथे बहुतेक लोकांना अताशा वाचता येते
दिसावी फक्त एकाला अशी मिळते कुठे शाई
उत्तम...उत्तम...!

रिते आकाश निरखावे तसा माझा तुला चाळा
उद्या येईल कंटाळा .. उद्या संपेल नवलाई
सु रे ख !
 
सुट्या नाण्यांपरी आले नशीबी श्वास हे काही
अशाने सात जन्मांची कधी होणार भरपाई
सुंदर कल्पना

शुभेच्छा.

सर्व शेर आवडले.
इथे बहुतेक लोकांना अताशा वाचता येते
दिसावी फक्त एकाला अशी मिळते कुठे शाई

हा शेर सर्वोत्तम.

लिहावयाला शब्द न उरले
मी लिहू काय आता!
अप्रतिम गझल...

वैभव, अप्रतिम गझल! सगळेच शेर मस्त.
रिते आकाश, सुटी नाणी आणि शाई हे शेर तर मला फार फार आवडले!!

ही गझल अतिशय भावली. साईटवरील इतर व या गझलकाराच्या गुणवत्तेमधील फरक सहजपणे जाणवतो असे स्तुतीपर म्हणावेसे वाटले.
मनात आलेले काही मुद्दे: ( खालील शेरांवर )
रिते आकाश निरखावे तसा माझा तुला चाळा
उद्या येईल कंटाळा .. उद्या संपेल नवलाई


सुट्या नाण्यांपरी आले नशीबी श्वास हे काही
अशाने सात जन्मांची कधी होणार भरपाई


तुला पाहून आयुष्या पसरले हात मी जेव्हा
मला तू सांग ना तेव्हा कुठे झाली दिरंगाई
(अ.) चित्त यांचे म्हणणे ( दोन्ही ओळीत आशय समसमान विभागला जावा याकडे बघणे ) - मला असे वाटते की रिते आकाश ही पहिली ओळ वाचल्यावर प्रेमातील चांगल्या भागाचा उल्लेख होत आहे असे व वाटते तर दुसर्‍या ओळीत तो अंदाज खोटा ठरून एक निगेटीव्ह बाजू व्यक्त केली जाते. अशा पद्धतीने तो आशय विभागला गेला आहे. बाकी शेवटच्या दोन द्विपदींमधे मात्र तो मुद्दा मान्य होतो.
(ब.) सुट्या नाण्यांच्या द्विपदीमधे आशयबाबत माझा काहीतरी घोळ होत आहे. या जन्मात नशिबात मोजकेच श्वास आल्यामुळे जे आधीच्या जन्मातील उरलेले श्वास मला घ्यायचे होते ते तर राहोच मुळात या जन्मातीलच श्वास पूर्ण होणार नाहीत असे दिसते असा शब्दार्थ आहे काय?  कुणीतरी किंवा स्वतः गझलकाराने स्पष्ट केल्यास मी आभार मानीन.
(क.)  हात पसरणे हे इथे प्रेमाभराने कवेत घेण्याच्या अर्थाने वापरले असावे किंवा दान मागण्याच्या अर्थाने वापरले असावे. पण त्याच्यात दिरंगाई कुठे झाली या प्रश्नाचा अर्थ आयुष्याने ते दान दिले नाही किंवा मिठी मारली नाही असा जर होत असेल तर हा शेर एक साधे विधान आहे असे माझे मत आहे. ज्या पातळीवर 'शाई' किंवा 'नवलाई' गेले आहेत तेथे हा शेर जात नाही. शंका अशी की गझलकाराला हेच अभिप्रेत होते की काही वेगळे? 
 

गझल.

गझल अतिशय आवडली. छानच!