मी ही तुझ्यात आहे
जे जे मला हवे ते सारे जगात आहे
पण दोष एवढा की, शंका मनात आहे
कोणांस काय मिळते चिंता तुला कशाला?
फुलवून टाक आधी जे जे तुझ्यात आहे
शोधून फार थकले हे बुद्धिमान सारे
नाकारले तयाला जो काळजात आहे
आसावल्या ढगातुन काहीच पाझरेना
हा दोष कोणता जो या सागरात आहे?
पाहू नकोस काटे, फोडू नकोस फाटे
घे तू सुगंध सारा जो या फुलात आहे
गुर्रावतो तरीही भीती न आज उरली
हा 'शेर' जंगलाचा, पण पिंज-यात आहे
ही वेदना म्हणाली, 'राहू कशी चिरंतन?'
समजाविले सुखाने, 'मी ही तुझ्यात आहे'
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
गुरु, 04/12/2008 - 12:16
Permalink
अजय, १. छान
अजय,
१. छान गझल!
२. आपल्याला मक्त्यावरून मला माझ्या ओळी आठवल्या. 'वेदनेच्या आतली सुविधा कळावी लागते, होत जख्मी वाट कवितेची मळावी लागते. सुंदर मक्ता आहे आपल्या गझलेचा! 'समजाविले सुखाने, मी ही तुझ्यात आहे'.
३. एक तरी अध्यात्मिक शेर आपण रचताच, जसा नाकारले तयाला जो काळजात आहे हा शेर!
४. ढग आसावणे म्हणजे काय? तसेच फुलाचे काटे पाहू नको नंतर फाटे फोडू नको म्हणजे काय ते कृपया सांगावेत.
५. पिंजर्याच्या शेराचाही संदर्भ कृपया सांगावात!
चांगली गझल. साधे साधे शब्द घेऊन आनंदकंदात गझल केली की ती खूप आनंद देते.
शुभेच्छा!
अजय अनंत जोशी
गुरु, 04/12/2008 - 12:57
Permalink
सर्वच देतो.
१. आपल्याला हवे असलेले सर्व जगात उपलब्ध असते. पण आपल्याच मनात शंका असते - मिळेल की नाही?
२. दुस-याला काय मिळते ते चटकन बघितले जाते. त्यामुळे स्वतःचे गूण विकसित करायला बाधा येते.
३. जो हृदयांत असेल त्याला भौतिक जगात शोधता येत नाही.
एक शेर या संदर्भात आहे - कोणाचा ते आठवत नाही
रस्तेभर रो रो के हमसे पूछा पांव के छालों ने
बस्ती कितनी दूर बसा ली दिल मे रहनेवालों ने
४. आसावलेले डोळे म्हणजे ज्यातून अश्रू आता गळणारच आहे असे. तसेच पाऊस पडण्यासाठी ढग तयार आहे पण पडत नाही असे का? सागराच्या पाण्याची वाफ होऊन त्याचे ढग तयार होतात आणि पाऊस पडतो असे शास्त्र आहे. मग पाऊस का पडत नाही? कारण कदाचित या सागराच्या पाण्यातही इतकी आर्द्रता नसेल कदाचित.
५. एखादी गोष्ट लांबून चांगली वाटते - जसा फुलातला सुगंध. पण जवळ गेल्यावर फुलाच्या आजुबाजुला काटे दिसल्यावर ते फूल घेण्यासाठी आपण तयार नसतो. त्यासाठी उगाचच काहीतरी कारणे सांगत बसतो (फाटे फोडणे). (जसे कोल्ह्याला द्राक्षे आंबट)
६. जंगलातील सिंह समोर आला तर भीतीने गाळणच उडेल. पण मला भीती वाटत नाही. कारण तो पिंज-यात आहे. (भेदकता-आक्रमकता मर्यादेत असेल तर सहन होते.)
७. वेदना कोणालाच नको असते. म्हणून ती विचारते की मी चिरंतन कशी राहणार? तेंव्हा सूख - जे तिचे मित्र आहे ते तिला सांगते - बघ मीच तुझ्यात आलो आहे. सर्वजण सुखाला बोलावितात - म्हणजेच माझ्याबरोबर तू ही अमर आहेस.
आणखीही बरेच सांगता येईल.
कलोअ चूभूद्याघ्या
ज्ञानेश.
गुरु, 04/12/2008 - 17:23
Permalink
छानच.
मतला, मक्ता अगदी सुरेख.
हा शेरही छान-
कोणांस काय मिळते चिंता तुला कशाला?
फुलवून टाक आधी जे जे तुझ्यात आहे
धन्यवाद.
श्रीनिवास (not verified)
शनि, 20/12/2008 - 23:55
Permalink
मी ही तुझ्यात आहे
तसे सगळेच शेर आवडले. पण त्यातल्या त्यात हा शेर आवडला.
ही वेदना म्हणाली, 'राहू कशी चिरंतन?'
समजाविले सुखाने, 'मी ही तुझ्यात आहे'
छानच आहे. अशी सोप्या शब्दांत आणखीन द्या.