रक्तातल्या रसांनो

वेचा नवीन आशा माझ्या नसानसांनो
बदल्यात व्हा प्रवाही रक्तातल्या रसांनो


कोणीच जन्म घेण्या केला न अर्ज येथे
रागावता कशाला विक्षिप्त माणसांनो?


मी तर तयार होतो सोडायला जगाला
ना एकजूट झाली तुमचीच साहसांनो


आनंद शोधताना उत्साह आळसावा
इतका न दाखवावा उत्साह आळसांनो


मी ओसरी भटाला देऊन चूक केली
फोफावता किती रे हृदयात आकसांनो?


कवितारसास अजुनी मी शोषणार आहे
चोरू नका घराणी  इतक्यात वारसांनो


आशा, अधीर इच्छा अन वासना, अपेक्षा
पोषाख गोंडसांचे अंगात राक्षसांनो?


 


 


 

गझल: 

प्रतिसाद

मी तर तयार होतो सोडायला जगाला
ना एकजूट झाली तुमचीच साहसांनो

आनंद शोधताना उत्साह आळसावा
इतका न दाखवावा उत्साह आळसांनो..
हे दोन शेर फार आवडले. त्यातही  आळसाचा शेर तर खतरनाक आहे. पहिल्यांदा कळलाच नाही. थोडा विचार केल्यानंतर अर्थ समजला.

आनंद शोधताना उत्साह आळसावा
इतका न दाखवावा उत्साह आळसांनो

भुषणजी....
वेचा नवीन आशा माझ्या नसानसांनो
बदल्यात व्हा प्रवाही रक्तातल्या रसांनो....
वाचुनच रक्त सळ्सळ्ते ....
नविन आशा वेचण्याशिवाय गझल येउच शकत नाही ना...! सही शेर.....
कोणीच जन्म घेण्या केला न अर्ज येथे
रागावता कशाला विक्षिप्त माणसांनो?
अगदी खरे आहे...
आणि ..
आनंद शोधताना उत्साह आळसावा
इतका न दाखवावा उत्साह आळसांनो
१० उंगलिया घी मे और सर कढई मे... !
....जमीर....

कोणीच जन्म घेण्या केला न अर्ज येथे
रागावता कशाला विक्षिप्त माणसांनो?
यातली गंमतच वेगळी !!

मतला आणि शेवटचा शेर खूप आवडला.